esakal | अग्रलेख : म्यानाचा खणखणाट!

बोलून बातमी शोधा

aarey tree cutting

शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते.

अग्रलेख : म्यानाचा खणखणाट!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते.

हातात तलवार घेऊन युद्ध करणारे योद्धे आपणांस माहीत आहेत. परंतु काही नेते केवळ तलवारीच्या म्यानाने युद्ध करतात. त्याचे फायदे दोन. एक तर त्यामुळे समोरच्याला कोणतीही इजा होत नाही. आणि दुसरी बाब म्हणजे त्यातून आपल्याला लढण्याचे अपार समाधान मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून उभ्या महाराष्ट्राला हे म्यानाने लढण्याचे प्रात्यक्षिक दाखवतच होते. त्यात आता आदित्य ठाकरे यांचीही भर पडली आहे. कोकणातील नाणार येथील तेलशुद्धिकरण प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेनेच्या म्यानांचा खणखणाट सर्वांनीच ऐकला. आता शिवसेनेची तशीच आक्रमकता ‘आरे’तील वृक्षतोड प्रकरणातून दिसून येत आहे. खरे तर ‘आरे’तील मेट्रोची कारशेड आणि त्याकरिता होणारी वृक्षतोड हा पक्षीय सत्ताकारणाचा विषय नाही. त्याचा संबंध पर्यावरणाशी आणि थेट मुंबईच्या आरोग्याशी आहे. तरीही एकीकडे त्यात राज्य सरकार आणि त्यांचे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ इरेला पेटले आहे, तर दुसरीकडे त्याचा राजकीय फायदा उठविण्याचे प्रयत्न शिवसेनेसह विविध पक्ष करीत आहेत.

सरकारचे म्हणणे असे, की मुंबईसाठी मेट्रो आवश्‍यक आहे. त्यासाठी कारशेड हवी. आरे वसाहतीतील जागा त्यासाठी आदर्श आहे. तेथेच नंतर २२ मजल्यांचे मेट्रोभवनही बांधण्यात येणार आहे. पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे, की मेट्रो व्हावी. मेट्रोभवनही उभारावे. पण ते ‘आरे’मधील झाडे तोडून नको. तसे केल्यास मुंबईचे ‘दिल्ली’ होण्यास वेळ लागणार नाही. मग कारशेडचे काय; तर कांजूरमार्ग येथे चांगली पर्यायी जागा आहे. तेथे ती हलवावी. त्यावर सरकारची भूमिका अशी की कांजूरला कारशेड नेणे परवडणारे नाही. शिवाय आरे हे काही जंगल नाही. तेव्हा तेथील झाडे तोडली तर हरकत काय? शिवाय आम्हीही पर्यावरणप्रेमी आहोत व राज्यभर कोट्यवधी रोपटी लावतच आहोत. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने आरे हे जंगल नसल्याने तेथील झाडे तोडण्यास हरकत नाही, असा निकाल दिला. आता प्रश्न असा येईल, की यात शिवसेनेचा संबंध येतोच कुठे?

कारण अगदी पर्यावरणमंत्रीपद वाट्याला आलेले असले, तरी पर्यावरणाशी शिवसेनेचा संबंध तसा छायाचित्रे काढणे आणि मग प्लॅस्टिकमुक्तीचा कदमताल एवढ्यापुरताच. नाही म्हणायला ‘आरे’तील वृक्षतोडीला पहिल्यांदा परवानगी दिली होती ती शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई पालिकेतील वृक्षप्राधिकरणानेच. परंतु मग कधीतरी इंग्रजी-कवीमनाचे युवानेते आदित्य ठाकरे यांना झाडांची ‘किंमत’ समजली आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेने कारशेडविरुद्ध कालवा सुरू केला. तो एका म्यानाने तीन वार करण्याचा डाव म्हणावा लागेल. त्यातील एक वार होता ‘नाणार’च्या बदल्याचा. दुसरी बाब म्हणजे तेव्हा युतीच्या जागावाटपाची बोलणी लोंबकळत्या अवस्थेत होती. त्यातील दबावासाठी हे उपयुक्त होते. तिसरी बाब होती ती आदित्य यांच्या प्रतिमासंवर्धनाची. सध्या प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ या कंपनीमार्फत आदित्य यांची ‘भावी मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा तयार करण्याचे महत्कार्य सुरू आहे. ‘आरे वाचवा’ मोहिमेला पाठिंबा दिल्यास त्यातून आदित्य यांना समाजातील विशिष्ट उच्चभ्रू वर्गाचा, त्यातील मेणबत्ती संप्रदायाचा पाठिंबा मिळेल असे त्यामागचे गणित. ते तसे नसते, तर शिवसेनेने केवळ म्यानाचा खणखणाट केला नसता. तसे ते नसते, तर वृक्षतोडीच्या बाबतीत उद्या सत्तेत आल्यावर ‘यंव करू आणि त्यंव करू’ असे ‘बैल गेल्यावर झोपा’ करण्याचे वायदे शिवसेनानेत्यांनी केले नसते. ही लुटूपुटूची लढाई लढली जाते, याचे एक कारण मुंबई किनारी मार्गातही दडलेले आहे. तो मार्ग पर्यावरणीय बेड्यांत अडकलेला आहे आणि तो व्हावा ही शिवसेनेच्या श्रींची इच्छा आहे, हे लपून राहिलेले नाही. हे सारे माहीत असल्याने भाजपचे चाणक्‍य त्याची छान मौज लुटताना दिसताहेत. आदित्य यांची ‘आरे’बाबत समजूत काढू, असे मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते आपल्यासमोर भविष्यच मांडत असतात हे लक्षात घ्यायला हवे. 

या सगळ्यातून राजकारणाविषयीचे एक वेदनादायी चित्र कोणाच्याही मनात उभे राहील. लोकानुनयी, भावनात्मक राजकारण करणे आणि त्यातून आपणांस हवा तो जनानुबोध - पर्सेप्शन - निर्माण करणे हे या चित्राचे वैशिष्ट्य. यात भाजपचा हात कोणी धरू शकणार नाही. पण शिवसेनेचाही तोच प्रयत्न आहे. सत्तेत राहूनही विरोधाचे राजकारण हा शिवसेनेच्या याच ‘जनानुबोध निर्मिती’चा भाग आहे. शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात ते याच ‘जनानुबोध निर्मिती’तून. नाणार काय किंवा ‘आरे’ काय, शिवसेनेचा म्यानांचा खणखणाट सुरू असतो तो त्यासाठीच.