प्रतिकारशक्तीचा मूलमंत्र

C-Vitamin
C-Vitamin

'क' जीवनसत्त्व हे प्रतिकारशक्तीबरोबरच इतर अनेक गोष्टींशी संबंधित आहे. त्वचेच्या आरोग्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत या जीवनसत्त्वाचे अनेक फायदे आहेत. शरीराच्या अनेक कार्यांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते.

सध्या कोरोना विषाणूमुळे प्रतिकारशक्ती वाढविण्याचे विविध उपाय सांगितले जात आहेत. सर्वांनीच ‘कोव्हिड- १९’च्या प्रतिकारासाठी व्हिटॅमिन सीचे अर्थात क जीवनसत्त्वाचे नाव सर्वांत जास्त वेळा ऐकले असेल. खरेतर क जीवनसत्त्व आपल्यासाठी नवीन नाही. हे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असूनही, बहुतेकांनी सर्वाधिक दुर्लक्षित केलेल्या जीवनसत्त्वांपैकी आहे.

आपण प्रत्येकवेळी प्रतिकारशक्तीचे नाव ऐकले, की क जीवनसत्वाचाही उल्लेख येतो. हे जीवनसत्त्व प्रतिकारशक्तीबरोबरच इतर अनेक गोष्टींशी संबंधित आहे. त्वचेच्या आरोग्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत क जीवनसत्त्वाचे अनेक फायदे आहेत. शरीराच्या अनेक कार्यांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ते समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. हे जीवनसत्त्व एल अस्कोर्बीक ॲसिड म्हणून ओळखले जाते. पाण्यात विरघळणारे हे जीवनसत्व काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. इतरही अनेक पदार्थांमध्ये ते पूरक स्वरूपात उपलब्ध असते. आपले शरीर ते अंतर्गतरीत्या तयार करू शकत नाही. त्यामुळे फळे, पदार्थांमधूनच ते मिळवावे लागते. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यात क जीवनसत्त्वाची भूमिका
सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे क जीवनसत्व रक्तातील पांढऱ्या पेशींच्या निर्मितीला चालना देते. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेतील अनेक पेशींमध्ये क जीवनसत्त्वाचा साठा असतो. विशेषतः फॅगोसाईट्‌स आणि T-Cell जे विषाणूजन्य संसर्गाविरुद्ध लढण्याचे संरक्षक कवच आहे, त्यांना आपले कार्य करण्यासाठी क जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वामुळे सर्दी-खोकल्याची तीव्रता कमी होते, असेही काही संशोधनात आढळले आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. एकूणच क जीवनसत्त्वाची प्रतिकारक शक्तीतील अनेक घटकांमध्ये भूमिका आहे, ती थोडक्‍यात मांडता येऊ शकत नाही. 

अनेकदा घसा दुखत असताना घशात सूज येते. क जीवनसत्त्व प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त ही सूज शमविते. त्याच्या गोळ्या चघळल्यामुळे घशाची सूज कमी होऊन आराम मिळतो. हे जीवनसत्त्व अँटीऑक्‍सिडंट म्हणूनही काम करते. शरीरातील विविध प्रक्रियेदरम्यान तयार झालेले रॅडिकल्स मुक्त करते. आपल्या शरीरातील पेशी आणि ऊतींचे नुकसान करणाऱ्या रॅडिकल्सपासून अँटीऑक्‍सिडंट बनून क जीवनसत्त्व मुक्तता करते. म्हणजेच घशात जळजळ, सूज होण्याचे प्रमाण कमी होते, असा याचा अर्थ.   

जीवनसत्त्वाचा त्वचेला फायदा 
हे जीवनसत्त्व त्वचेलाही फायदेशीर आहे. ते अँटीऑक्‍सिडंट कार्याव्यतिरिक्त कोलेजेन या संरचित प्रथिनाच्या संश्‍लेषणाचे नियंत्रण करते. कोलेजन या प्रथिनाची आपल्या हाडे, त्वचा, स्नायू, स्नायूबंध आणि अस्थिबंध (लिगॅमेंट) आदींच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. त्याचप्रमाणे, ते रंगद्रव्याची अतिरिक्तताही कमी करते. क जीवनसत्वामुळे त्वचेचा पोतही राखला जातो. त्वचेमध्ये ओलावा ठेवण्याचे अनेक प्रकारचे सकारात्मक परिणाम या जीवनसत्वामुळे होतात. 

क जीवनसत्त्वाची गरज किती? 
साधारणपणे चार ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांना रोज २५ ते ४५ मिलिग्रॅम क जीवनसत्त्वाची गरज असते. त्याचप्रमाणे १५ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींनी रोज ४५ ते ६५ मि.ग्रॅ. क जीवनसत्त्व घ्यायला हवे. प्रौढांना रोज ७५ ते ९५ मि. ग्रॅ. क जीवनसत्त्व घ्यावे. त्याचप्रमाणे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी आरडीएमधून रोज २० मि. ग्रॅ. क  जीवनसत्त्व अतिरिक्त घ्यावे. 

तुम्ही फळे नेहमीच्या पद्धतीने खाऊ शकता. मात्र,भाज्या खाण्यापूर्वी शिजविल्याने त्यांच्यामधील क जीवनसत्त्व कमी होते. 
(अनुवाद - मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com