काही पथ्ये, काही तथ्ये

अभिषेक ढवाण 
मंगळवार, 7 एप्रिल 2020

खरेतर, ‘वर्क फ्रॉम होम’ अतिशय महत्त्वाचे आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव  थांबविण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत ते गरजेचेही आहे. मात्र, घरातून काम करताना त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यायलाच हवी. 

खरेतर, ‘वर्क फ्रॉम होम’ अतिशय महत्त्वाचे आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव  थांबविण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत ते गरजेचेही आहे. मात्र, घरातून काम करताना त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यायलाच हवी.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे बहुतेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ आवश्‍यक बनलेय. खरेतर, आजच्या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होण्याच्या युगात अनेकांसाठी हे नवीन नाही. मात्र, यावेळी ‘कोरोना’च्या निमित्ताने अनेकजण पहिल्यांदाच ‘वर्क फ्रॉम होम’चा पहिल्यांदाच अनुभव घेत आहेत. खरेतर, सध्याच्या कठीण परिस्थितीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घरातून कार्यालयीन काम करणे ही काळाची गरज आहे. मात्र, अशा प्रकारे घरातून काम करताना काही नियम, पथ्यही पाळायला हवे, जेणेकरून, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्‌भवणार नाहीत. चला, तर मग ‘वर्क फ्रॉम होम’ करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, हे समजून घेऊ. 

बसण्याची योग्य पद्धत - अनेकजण घरातून काम करताना ते आरामशीर पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. कार्यालयात खुर्चीवर बसून काम करावे लागते. सध्या घरातून अनेकजण बेड किंवा कोचवर झोपून काम करत आहेत. त्याचप्रमाणे, इतर आरामशीर वाटणाऱ्या कोणत्याही शरीरस्थितीतून काम केले जात आहे. मात्र, सातत्याने अशा पद्धतीने काम केल्याने पाठ व मानेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे, तुम्ही घरी असलात तरी अशा पद्धतीने काम करू नका. त्याऐवजी, कार्यालयाप्रमाणे खुर्ची किंवा डेस्कचा वापर करा. त्यावर बसतानाही पाठीचा कणा योग्य पद्धतीने ठेवा. जेणेकरून ताण येणार नाही. 

अतिखाणे टाळा - दिवसभर घरातच असल्याने तुम्हाला किचनमध्ये कधीही जाता येते. कसलीही बंधने नसतात. कधीही किचनमध्ये जाऊन खाद्यपदार्थांवर ताव मारता येतो. त्याचा परिणाम अयोग्य आणि अनियंत्रित पद्धतीने खाण्यात होतो. त्यातून, खाण्याची तलफ आणखी वाढते. मूडमध्ये चढ-उतार होणे, वजन वाढणे आदी दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे, आहाराचे दिवसभराचे वेळापत्रक आखून घ्या. दिवसभर योग्य पद्धतीने ते सांभाळण्याची काळजी घ्या. अधूनमधून उगाच स्नॅक्‍स खाण्याचे टाळा. 

कामाचे वेळापत्रक ठरवा - घरातून काम करताना दिवसाचे २४  तास काम करायचे, असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचप्रमाणे, तुम्ही दिवसातील कोणत्याही वेळी काम करायला हवे, असेही नव्हे. त्यामुळे, कामाचे दिवसाचे योग्य वेळापत्रक आखा. 

घरातच हालचाल करा - आपण घरात असतो, तेव्हा क्वचितच हालचाल करतो. सर्वांना ही सवय असते. मात्र, शरीराची कमी हालचाल झाल्यामुळे थकवा जाणवतो. झोपाळूपणा वाढून वजनही वाढते. त्यामुळे, घरातच चाला. अधूनमधून खुर्चीवरून उठून ब्रेक घ्या. घरातल्या घरात हालचाल करा. त्याचा आढावा घ्या. 

झोपेत अडथळा नको - ‘वर्क फ्रॉम होम’ याचा अर्थ तुम्ही सुटीवर आहात, असा होत नाही. अनेकजण घरातून काम करताना रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. काही दिवस ही जीवनशैली पाळल्यास तुमच्या पुढील दिनक्रमावर, तसेच संप्रेरकांच्या चक्रांवरही विपरीत परिणाम होतो. 

व्यायाम करा - घरी असलात आणि जिमला जाऊ शकत नसलात, तरीही नियमित व्यायामाला कोणताही पर्याय नसतो. तुम्ही घरातच व्यायाम, योगाभ्यास किंवा व्यायामाचे इतर प्रकारही करू शकता. त्यामुळे, तुम्ही व्यायामाची नेहमीची सवय, ताल गमावणार नाही. अन्यथा, ‘वर्क फ्रॉम होम’ संपल्यानंतर व्यायामाचा पूर्वीचा ताल पुन्हा मिळविणे अवघड होईल. 

खरेतर, ‘वर्क फ्रॉम होम’ अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या संकटकालीन परिस्थितीत ते सोयीचेही आहे. मात्र, घरातून काम करताना त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ न देणेही महत्त्वाचे आहे. ती आपली जबाबदारी आहे. ‘कोरोना’च्या उद्रेकामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो, हे आपण सर्वजण समजून घेतोय. हेच तत्त्व ‘वर्क फ्रॉम होम’लाही लागू पडते. 
(अनुवाद - मयूर जितकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article abhishek dhawan