Julian-Assange
Julian-Assange

भाष्य : सत्तांच्या विरोधात सत्याचे अस्त्र

राजवट डावी, उजवी वा मध्यममार्गी कोणतीही असो, सत्ताधारी आणि त्यांची सुरक्षा दले पडद्याआडून घृणास्पद कारवाया करीत असतात. अमेरिकेत ज्युलिअन असांज, एडवर्ड स्नोडेन यांच्यासारखे ‘जागले’ त्यांना उघडे पाडतात. देशोदेशी असे ‘जागले’ निर्माण झाले तर त्या त्या देशांतील राज्यकर्ते आणि सुरक्षा दलांच्या तथाकथित देशभक्तीचे पितळ उघडे पडेल.

‘विकिलिक्‍स’चे संस्थापक ज्युलियन असांज (वय ४८) यांना लंडनमधील कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारला. दोनच दिवस आधी या न्यायालयाने असांज यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास मंजुरी नाकारली होती. त्यामुळे असांज यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, जामीन नाकारण्याने असांज यांच्यावरील प्रत्यार्पणाची व अमेरिकेतील फौजदारी खटल्याची तलवार टांगतीच राहील. ब्रिटन सरकारने असांज यांना जामिनाच्या सुविधेचा गैरवापर केल्याबद्दल स्थानिक न्यायालयात खेचले होते. असांज यांनी लंडनमधील ‘इक्वेडोर’ या लॅटिन अमेरिकी देशाच्या वकिलातीत आश्रय घेतला होता. देशांच्या अन्य देशातील वकिलातीच्या इमारतीवर यजमान देशाचे सार्वभौमत्व चालत नाही. त्याचाच फायदा घेऊन असांज आश्रयाला गेले होते. २०१०-११मध्ये ‘पेन्टॅगॉन’  कागदपत्रे, तसेच विविध देशांमधील अमेरिकी वकिलातींबरोबरचा संपर्क (तारा- केबल्स) असांज यांच्या ताब्यात आला होता. ही संख्या लाखोंच्या घरात होती. अमेरिकी सरकार व त्याचे संरक्षण खाते यांच्या इराक, अफगाणिस्तान आदी देशातील लष्करी मोहिमांची गुपिते, तेथे अमेरिकी सैनिकांकडून झालेले अत्याचार याचा तपशील त्यात होता. अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशामधील वृत्तपत्रांतून या गोष्टी चव्हाट्यावर आल्या. अमेरिकी सरकार, त्यांचे मुत्सद्दी व लष्कराचा भीषण चेहरा उघड झाला. असांजने अब्रुचे खोबरे केल्याने अमेरिका चवताळली होतीच.

तिसऱ्या जगात अमेरिकेतील निक्‍सन- ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाबाबत चांगले मत नाही. परंतु असांज यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या क्‍लिंटन, ओबामा प्रशासनाचे अपराध होते. अमेरिकेची बदनामी होण्यास कारणीभूत असलेले असांज अर्थातच अमेरिकेचा शत्रू ठरले. त्यांच्यावर विविध १८आरोपांखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.त्यांच्यावर अमेरिकेत नेऊन खटला चालू झाला तर त्यांना किमान १७५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. अमेरिकी घटनेच्या पहिल्या दुरुस्तीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत प्रसारमाध्यमांचा, पत्रकारांचा समावेश आहे. मात्र, अमेरिकी सरकार असांज यांना पत्रकार मानीत नाही. असांज यांनी ‘व्हिसल ब्लोअर’ (जागल्या) या नात्याने अमेरिकेची कृष्णकृत्ये ‘विकिलिक्‍स’च्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना पुरविली. असांजला देशद्रोही मानणाऱ्या अमेरिकेने प्रसारमाध्यमांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले नाही. शेजारी लॅटिन अमेरिकेत भांडवलशाहीची प्रतिक्रिया म्हणून अनेक देशांत साम्यवादी- समाजवादी राजवटी आहेत. इक्वेडोरचे अध्यक्ष रफायल कोरिआ यांनी असांज यांना लंडनमधील आपल्या वकिलातीत सात वर्षे आश्रय दिला. अमेरिकेने त्यांच्याविरुद्ध कारस्थान करून लेनिन मोरेनो यांची राजवट आणली. मोरेनो यांनी त्याची परतफेड म्हणून असांजचा आश्रय संपविला.

ब्रिटिश तुरुंगात छळ
ब्रिटिश पोलिसांनी असांजला फरफटत बाहेर काढले. जामीन सुविधेच्या भंगाबद्दल असांजला लंडन न्यायालयाने ५० आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. ते २० आठवडे काळकोठडीत असतानाच अमेरिकेच्या प्रत्यार्पण याचिकेची सुनावणी झाली. असांज यांचा ब्रिटिश तुरुंगात अतोनात छळ झाला. त्यांना विषप्रयोगाची भीती होती. नैराश्‍यातून ते आत्महत्येस प्रवृत्त होतील, असे कारण देत प्रत्यार्पणास नकार देणाऱ्या न्यायाधीशांनी जामीन मात्र नाकारला. प्रत्यार्पणप्रकरणी अमेरिकी न्याय खात्याचे अपील हे कारण देण्यात आले. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय, तसेच असांज यांना असलेला अपिलाचा अधिकार, यानुसार तीन अपिलांवर न्यायालयीन प्रक्रिया व्हायची आहे. याचा अर्थ असांज यांना आणखी दोन वर्षे कैदेत राहावे लागेल. मेक्‍सिकोने असांज यांना आश्रय देण्याची तयारी दाखविली असली तरी ब्रिटन त्यांना सोडण्याची शक्‍यता नाही. 

ट्रम्प यांनी नुकतीच  अनेक निकटवर्तीयांची शिक्षा माफ केली. असांज यांच्या सुटकेसाठी चार लाख सह्यांचा अर्ज त्यांना सादर करण्यात आला होता. असांज यांना मदत करणाऱ्या अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विश्‍लेषक चेल्सी मॅनिंग या महिलेला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. ओबामा यांनी २०१६मध्ये त्यांची शिक्षा माफ केली. जपानवरील अणुबाँब हल्ल्याच्या अपराधाबद्दल तेथे जाऊन क्षमायाचना करणाऱ्या ओबामा यांनी असांज यांना मात्र माफ केले नाही. १९७१मध्ये रिचर्ड निक्‍सन यांच्या कारकिर्दीत ‘वॉटरगेट’ प्रकरण घडले होते. डेमोक्रॅटिक पार्टीच्या मुख्यालयात सी.आय.ए.मार्फत संभाषण चोरून ऐकण्याची यंत्रणा बसविल्याचे प्रकरण अंगाशी आले. १९७२ मधील अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी जगभर बदनामी होऊन निक्‍सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना उघडे पाडणारे पत्रकार बॉब वुडवर्ड हिरो बनले. असांज यांनी ‘विकिलिक्‍स’द्वारे केलेले काम अमेरिकी हितसंबंध विरोधी होते, तरी त्यात विधायक दृष्टिकोन होता. 

एडवर्ड स्नोडेन या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतील कॉन्ट्रॅक्‍टरनेही गुप्त माहिती उजेडात आणली. हे २०१३मधील प्रकरण. त्यांनी रशियात राजकीय आश्रय घेतला. निक्‍सन राजवटीतच ‘पेन्टॅगॉन पेपर्स’ प्रकरण घडले. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने ५५ हजार सैनिक गमावले; परंतु व्हिएतनामच्या लक्षावधी लोकांना ठार केले. अमेरिकी लष्कराच्या निर्घृण कारवायांवर प्रकाश पाडणारी सुमारे सात हजार कागदपत्रे चोरून न्यूयॉर्क टाइम्सला देणाऱ्या नील शीहान (वय ८४) यांचे नुकतेच निधन झाले. युद्ध वार्ताहर व पुलित्झर विजेत्या शीहान यांनी आपण हयात असेपर्यंत ही कागदपत्रे कशी मिळविली हे गुप्त ठेवण्याची अट ठेवली होती. ही सर्व कागदपत्रे त्यांना अमेरिकी संरक्षण खात्यातील विश्‍लेषण डॅनियल इल्सबर्ग यांनी पुरविली होती. १२ जून १९७१ला ती प्रसिद्ध होऊ लागली आणि अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धातील निर्णय प्रक्रियेवरील पडदा उघडला. ज्युलियन असांज, एडवर्ड स्नोडेन, डॅनियल हल्सबर्ग, बॉब वूडवर्ड, नील शीहान यांचे काम देशद्रोहाच्या चौकटीत बसविणे प्रस्थापित कायद्यानुसार स्वाभाविक ठरेलही, मात्र त्यांनी मानवतेच्या भूमिकेतून आपल्या देशातील सत्ताधीश व लष्कराच्या कृत्यांवर प्रकाश टाकला. 

लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व देशाची शान समजले जाणारे लष्कर किती नीच पातळी गाठू शकते, हे या जागल्यांनी चव्हाट्यावर मांडले. राजद्रोह वा देशद्रोहासारख्या कायदेशीर तरतुदींचा ढालीसारखा वापर करीत झालेल्या कारवाया त्यामुळे उजेडात येण्यास मदत झाली. ज्युलियन असांज यांचे प्रत्यार्पण होईल न होईल; परंतु त्यांनी व त्यांच्यासारख्या जागल्यांनी अवघ्या मानवजातीची सेवा केली आहे, हे निर्विवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com