स्वतःचीच विचारपूस करून पाहा

स्वतःचीच विचारपूस करून पाहा

मला स्वतःशी बोलायला आवडतं. मला त्यामुळे कधीही एकटं वाटत नाही. अनेकांना असं म्हणताना ऐकलंय की ‘मुलं त्यांच्या व्यापात असतात, माझ्यासाठी त्यांना वेळच नाही. सगळेजण घराबाहेर कामाला जातात, मी घरात एकटी. हा एकटेपणा खायला उठतो, जीव नकोसा होतो, कंटाळा येतो’. या सगळ्यांमुळे नैराश्‍य येतं. आपला कोणाला उपयोग नाही, संपलं आहे सगळं, नकोसे आहोत आपण... ही भावना एवढी तीव्र होत जाते, की अनेकदा आयुष्य संपवण्याचा निर्णयही घेतात काही जण. पण स्वतःचीच सोबत असेल, तर मग एकटेपणाची भानगड उरत नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे, स्वतःला समजून घेणं...मनाला आणि शरीरालासुद्धा. स्वतःची विचारपूस करायची. 

दुसऱ्या कोणीतरी माझी विचारपूस करावी, हवं-नको बघावं, अशा अपेक्षा ठेवून, त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःखीकष्टी होण्यापेक्षा, मी विचारते स्वतःला, ‘कशी आहेस बाई तू ?’ ‘मस्त मजेत’, असं उत्तर मनापासून मिळालं, तर खुदकन हसते आणि म्हणते ,‘अशीच राहा, छान दिसतेस.’ दरवेळी असं उत्तर मिळतंच असं नाही. मग मी मैत्रीण बनते स्वतःची आणि विचारते,‘काय झालं ? प्रॉब्लेम काय आहे ?’ कधी कुणी बोलल्याचा सल, कधी हवं तसं घडत नसल्याची खंत येते त्यावेळी बाहेर मनातून. मग माझ्यातली मैत्रीण माझ्याकडे प्रेमानं बघते, डोळ्यांत आलेलं पाणी पुसते आणि रडल्यामुळे लाल झालेलं नाक ओढत म्हणते, ‘हे फक्त तुझ्याच बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, कमी-जास्त प्रमाणात’. आपलं म्हणणं पटवून देताना, कुठेतरी वाचलेलं, डोक्‍यात साठलेलं एखादं उदाहरण आठवून सांगते ही मैत्रीण मला... कधी एखादी कविता ऐकवते, पुस्तक वाचायला सांगते किंवा म्हणते,‘ चल पिक्‍चर बघूया. कुठे थिएटरमध्येच जायला पाहिजे त्याच्यासाठी असं नाही. स्मार्टफोन आहेत, लॅपटॉप आहे’. कधी कधी म्हणते, ‘मस्तपैकी काहीतरी खायला करूया?’ कुणासाठी काहीतरी करायचं आणि आपण खायचं, यापेक्षा आपल्याला आवडतं ते करून खायला हरकत काय? पण सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलेलं असलं की विसरायलाच होतं, की आपणही आहोत एक व्यक्ती आणि आपल्याही आहेत काही आवडी-निवडी. सोबत नाही असं म्हणत खंतावण्यापेक्षा,‘मस्तपैकी स्वतःचाच हात धरून कोणत्याही जबाबदारीचं ओझं खांद्यावर न वागवता मोकळेपणानं फिरायला जाऊया ? ’ असंही विचारते माझी मैत्रीण मला. मजा येते. कुठेच धावत जायचं नसतं, कोणासाठी थांबायचं नसतं. आपले आपण आपल्यासोबत. 

कधीतरी माझ्यातली ही मैत्रीण, मला माझ्या शरीराशीसुद्धा गप्पा मारायला लावते. ‘काय हातांनो, कसे आहात? काम करून दमलात ना? थांबा जरा, तेल लावते तुम्हाला’ असं म्हणते मी, तेव्हा हात चक्क चिडवतात मला. म्हणतात, ‘पण तेव्हाही आम्हालाच कामाला लावणार ना तू... पाय तर काही तेल लावू शकत नाहीत’. विनोदच तो, मग येतं मला हसायला. मी कृतज्ञ होत म्हणते, ‘हो रे बाबांनो, तुम्ही आहात म्हणून जगणं केवढं सोपं झालं माझं’. दमलेल्या पायांवरूनही कधीतरी फिरवते हात मायेनं. बरं वाटतं त्यांनाही. विचार करून थकलेल्या डोक्‍यावरही ठेवते हात. सांगते त्याला ‘टेन्शन नको घेऊस. होईल सगळं व्यवस्थित’. ‘थॅंक्‍यू’ म्हणते ना मी हृदयाला, तेव्हा एक ठोका चुकतो हं त्याचा, आनंदानं. मणक्‍याला सांगते, ‘ताठपणे जगले, ते केवळ तुझ्यामुळेच. थॅंक्‍यू रे’. पोटाची माफी मागताना म्हणते,‘बाबारे, वाट्टेल ते ढकललं मी तुझ्यात, पण ते पचवून त्यातूनसुद्धा ऊर्जा दिलीस तू मला. त्याबद्दल थॅंक्‍यू हं’. माझी ही यादी खूप मोठी आहे, तुम्हीही बनवा तुमची. आपल्यातल्या अशा लाखो पेशी आपल्या सोबत असताना, उरतच नाही भीती एकटेपणाची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com