आदिवासी कन्यांच्या हाती एसटीचे सारथ्य

अनंत कोळमकर
Tuesday, 17 September 2019

विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलींची वाहनचालक म्हणून नियुक्ती होणार आहे. 

विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलींची वाहनचालक म्हणून नियुक्ती होणार आहे. 

एकवीस मुलींची नियुक्ती
तसे पाहता सध्या मुली चारचाकी गाडीच काय; पण रेल्वे, लोकल चालवू लागल्या आहेत आणि विमानातून गगनभरारीही घेत आहेत. मालवाहू ट्रक चालविणाऱ्याही महिला आहेत. परंतु, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या चालविण्याच्या क्षेत्रात मात्र पुरुषांचीच मक्तेदारी होती. महाराष्ट्राची लोकवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाने ही मक्तेदारी मोडण्याचा आणि या लोकवाहिनीचे सारथ्य महिलांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. महिला या लोकवाहिनीचे स्टेअरिंग सक्षमपणे सांभाळू शकतील, या विश्‍वासातून सरकारने प्रथमच आदिवासीबहुल भागातील २१ महिला आणि मुलींची वाहनचालकपदासाठी निवड केली. महिलांना एसटीचालक म्हणून संधी द्यावी, अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमातीतील महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील २१ तरुणींची निवड करण्यात आली आणि त्यांच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. 

शेतात राबणाऱ्या या तरुणी आता एसटी बस चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर त्यांची एसटी बसचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

तनिष्का व्यासपीठाचेही योगदान 
एसटी महामंडळाने याअगोदर एसटी गाड्यांमध्ये वाहक म्हणून महिलांची नियुक्ती केली आहे. अनेकांसाठी तो आश्‍चर्याचा धक्का होता. बसमध्ये तिकीट देणारी महिला पाहून अनेकांना नवल वाटायचे. पण, आता या बदलाची प्रवाशांना सवय झाली आहे. तसेच स्वागत या महिला चालकांचेही होईल, यात शंका नाही. पण, समाजात चांगल्या लोकांबरोबरच अपप्रवृत्तीही असतात. मध्यंतरी एसटीतील महिला वाहकांना त्रास दिल्याच्या घटना घडल्या. जनतेने अशा गुंडगिरीच्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे.

एसटीची वाहक असो की चालक, ती आपल्या मुलाबाळांना घरी ठेवून येथे काम करते आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे. तसे झाले तर एसटी महामंडळाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने फलदायी झाला, असे म्हणता येईल. 

या सारथ्यभरारीने विदर्भातील मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, या तरुणी ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या आहेत. बस चालविण्यासारखे आव्हान पेलण्यासाठी सक्षम बनविण्यात तनिष्का व्यासपीठाचेही योगदान आहे, हे या तरुणी अभिमानाने सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Anant Kolamkar