डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर-एक उपेक्षित इतिहास संशोधक

अनिकेत यादव
बुधवार, 10 जुलै 2019

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा आज ५० वा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा आज ५० वा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

‘श्‍लाघ्य: स एव गुणवान्‌ रागद्वेषबहिष्कृत:।
भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती।।’

अर्थात, जी व्यक्‍ती राग आणि द्वेष यांपासून कायम अलिप्त असते, तसेच जिची वाणी भूतकाळातल्या घटना सांगण्यात स्थिर झालेली असते, अशीच व्यक्‍ती श्‍लाघ्य व गुणवान इतिहासकार म्हणावयास पात्र असते. काश्‍मीरचा इतिहास लिहिणाऱ्या कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या संस्कृत ग्रंथात इतिहासकाराची कसोटी सांगितली आहे, ती गोव्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांना तंतोतंत लागू पडते. या वर्षी डॉ. पिसुर्लेकर यांचा १२५ वा जन्मदिन (३० मे) आणि ५० वा स्मृतिदिन (१० जुलै) आहे. मात्र गोवा आणि महाराष्ट्र सरकार, तसेच इतिहास अभ्यासकांसाठी पिसुर्लेकर हे विस्मृतीत गेल्यासारखी आजची स्थिती आहे, ही खेदाची बाब आहे. 

पोर्तुगीज-मराठे संबंध, प्राचीन भारतीय संस्कृती व गोव्याचा ऐतिहासिक वारसा या विषयांवर विपुल साधने सध्या उपलब्ध आहेत. मात्र ही सर्व साधने ज्या एका व्यक्‍तीमुळे सहज उपलब्ध होऊ शकली, ते डॉ. पिसुर्लेकर मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. पुरेशी संसाधने उपलब्ध नसताना अत्यंत चिकाटीने डॉ. पिसुर्लेकर यांनी पोर्तुगीज सरकारकडील जुन्या व जीर्ण झालेल्या कागदपत्रांची जपणूक केली, त्यांचा अभ्यास केला, त्यांची विषयवार सूची करून त्यावर १२७ हून अधिक ग्रंथ व लेख लिहिले. त्यांनी लिहिलेला प्रत्येक ग्रंथ, म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ कसे असावेत याचा आदर्श नमुना आहे. कोठेही अनावश्‍यक बाबी न मांडता, प्रत्येक पानांवर तळटीपा व संदर्भ दिलेले आहेत.

जे जसे घडले ते तसे, कसलाही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे मांडलेले आहे. हव्या असलेल्या व्यक्तींचा गुणगौरव आणि नको असलेल्या व्यक्‍तींचे चारित्र्यहनन हे आपल्या इतिहासाला जडलेले रोग आहेत; त्यांच्यापासून पिसुर्लेकरांचे ग्रंथ पूर्णपणे अलिप्त आहेत. डॉ. पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांद्वारे पोर्तुगीज व मोगल, मराठा, आदिलशाही, निजामशाही, विजयनगर साम्राज्य, म्हैसूर राज्य व इतर छोटे-मोठे राजे-नायक-सरदार यांच्यामधील तत्कालीन संबंधांवर प्रकाश पडतो. यांपैकी पोर्तुगीज-मराठा संबंधांवर तर अनेक माहिती नव्याने कळते. शहाजीराजांपासून ते पेशव्यांपर्यंत व इतर अनेक मराठा सरदार यांच्याबद्दलची अनेक अप्रकाशित माहिती पिसुर्लेकरांच्या ग्रंथांमधून समोर येते.

अमूल्य ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन
‘कोणताही पगार मिळणार नाही’ या बोलीवर १९२४ मध्ये डॉ. पिसुर्लेकर यांचा गोवा दफ्तरखान्यात प्रवेश झाला आणि सहा वर्षांच्या सेवेनंतर गुणवत्तेमुळे १९३० मध्ये त्याच दप्तरखान्याचे ते प्रमुख झाले. १९३० ते १९६१ या काळात पिसुर्लेकरांनी अखंड ३१ वर्षे तेथे अविरतपणे काम केले. १५९६ मध्ये स्थापन झालेल्या या दफ्तरखान्यात जगभरातील अनेक भाषांच्या कागदपत्रांचे ढीग होते. अनेक अमूल्य ऐतिहासिक कागदपत्रे दयनीय अवस्थेत होती. हा सर्व ठेवा वाचविण्याचे मौलिक काम डॉ. पिसुर्लेकर यांनी केले. जगभरातील अनेक दुर्मिळ भारतीय साहित्यसंपदा त्यांनी मिळविली. हे सर्व साहित्य आपल्या निधनापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या पणजी केंद्राला त्यांनी देणगी म्हणून दिली. आज ते गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात सुस्थितीत ठेवलेले आहे.

एवढ्या महान इतिहास अभ्यासकाचा १२५वा जन्मदिन व ५० वा स्मृतिदिन एकाच वर्षांत येऊनही सरकार व विविध संस्थांनीही त्यांची योग्य ती दखल घेतली नाही, याचे वाईट वाटते. ते पोर्तुगीजधार्जिणे होते, असा आजही आरोप केला जातो, मात्र तो चुकीचा आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे भारताच्या इतिहासात मोलाची भर पडली, हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. आपल्या देशाची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा पुढे यावी म्हणून डॉ. पिसुर्लेकर यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्याची दखल सरकार व विविध संस्थांनी घ्यावी, एवढीच अपेक्षा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Aniket Yadav