स्मृती एका महासंहाराची

अणुबॉंबच्या हल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेले हिरोशिमा.
अणुबॉंबच्या हल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेले हिरोशिमा.

सहा ऑगस्ट १९४५. सकाळी पावणेनऊ वाजता हिरोशिमावर अमेरिकेने अण्वस्त्र हल्ला केला. साठ हजार ते ऐंशी हजार माणसे दगावली आणि किरणोत्सर्जनाच्या परिणामामुळे हा आकडा पुढील चार महिन्यांत पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला. या महासंहारक घटनेचे स्मरण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपान दुसऱ्या महायुद्धात अटीतटीने लढत होता. साधनसामग्री मर्यादित होत चालली होती. शेवटच्या माणसापर्यंत लढण्याचा जपानचा निर्धार होता. दोस्त राष्ट्रांनी युरोपातील युद्ध जर्मनी व ‘अक्ष’ (AXIS) राष्ट्रांचा पराभव करून जिंकले होते. पण प्रशांत महासागराच्या भागात जपानबरोबर युद्ध सुरूच राहिले. जपानचा पराभव होणार, अशी चिन्हे होती; पण त्यांचा प्रतिकार प्रखर होता. एप्रिल ते जुलै १९४५ या तीन महिन्यांत त्या आधीच्या तीन वर्षांच्या काळात झालेल्या मनुष्यहानीच्या निम्मी हानी झाली. जपानच्या हवाई दलामध्ये ‘कामिकाझे’ या नावाचे दल होते. जिवाच्या बाजीने जाणारे वैमानिक, विमान घेऊन परत न येण्याच्या उद्देशाने जात. विमानाने उड्डाण केल्यावर आतील स्फोटकांसहित ते विमान लक्ष्यावर आदळे. अर्थात वैमानिकाचा मृत्यू त्यात निश्‍चित असे. असे ‘कमिकाझे’ वैमानिक बनण्याकरिता जपानी तरुणांची रांग तयार होती.

पारंपरिक पद्धतीने युद्ध जिंकणे यात दोन्ही बाजूंची मनुष्यहानी पाच ते दहा लाखांपर्यंत होईल असा अंदाज अमेरिकेतील युद्धशास्त्रातील तज्ज्ञ मंडळींनी मांडला. तत्कालीन अध्यक्ष ट्रुमन यांनी सल्लामसलत केली. युद्ध विभागाचे प्रमुख हेन्री स्टिमसन यांच्या नेतृत्वाखालील समितीने नव्याने विकसित केलेले अण्वस्त्र वापरून युद्ध लवकर संपवावे, असा कौल दिला. त्या अण्वस्त्रांची चाचणी ‘न्यू मेक्‍सिको’मध्ये जुलै महिन्यात घेण्यात आली आणि अणुबॉम्ब वापराचा निर्णय नक्की झाला. १९४३च्या क्‍योबेक करारानुसार इंग्लंडला माहिती देऊन त्यांचीही संमती घेण्यात आली.

अपरिमित हानी
...आणि तो भीषण क्षण आला. ६ ऑगस्ट १९४५ सकाळी ८ वाजून ४५ मि. ची वेळ होती. अमेरिकी वैमानिक पॉल टिबेट त्याचे ‘इनोला गे’ नावाचे बी-२९ जातीचे बॉम्बर विमान घेऊन निघाला. त्याच्या विमानात जगातला वापरला जाणारा पहिला १३ किलो टन क्षमतेचा अणुबॉम्ब होता. विमान जपानमधील हिरोशिमा या शहरावर आले आणि ‘लिटिल बॉय’ असे सांकेतिक नाव असणारा प्रचंड संहारक शक्तीचा युरेनियम या मूलद्रव्यापासून बनविलेला अणुबॉम्ब त्याने पॅराशूटचे साह्याने सोडला. बॉम्ब जमिनीपासून साधारण २००० फूट उंचीवर असताना त्याचा स्फोट झाला. अग्निप्रलयासारखा लोळ उठला आणि सूर्यामुळे जसे डोळे दिपावेत तसा प्रकाश पडला. बॉम्बमुळे तिथले तापमान ४००० सेंटिग्रेड इतके वाढले आणि त्या तापमानाने हवेच्या प्रचंड लाटा निर्माण झाल्या व आवाजाच्या गतीपेक्षा जास्त गतीने वादळ सुरू झाले. हिरोशिमा शहरातील अनेक इमारती अग्नितांडवात भस्म होऊन जमीनदोस्त झाल्या. एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील प्रत्येक गोष्ट नष्ट झाली.

स्फोटानंतर पडलेल्या पावसात किरणोत्सर्जनाने निर्माण झालेली राख मिसळली व काळा पाऊस पडला. त्यामुळे मानवी जीवनाची अपरिमित हानी झाली. या पहिल्या अण्वस्त्र हल्ल्यामुळे त्वरित ६० हजार ते ८० हजार माणसे दगावली आणि किरणोत्सर्जनाच्या परिणामामुळे हा आकडा पुढील चार महिन्यांत पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तीनच दिवसांनी नऊ ऑगस्ट रोजी, अमेरिकी वैमानिक मेजर चार्लस स्वीनी यानेही बी-२९ जातीच्या ‘बॉक्‍सकार’ विमानातून अशीच मोहीम पार पाडली. प्रशांत महासागरातील टिनियन बेटावरून हे विमान ‘फॅट मॅन’ असे सांकेतिक नाव असणारा २१ किलो-टन क्षमतेचा प्लुटोनियमपासून तयार केलेला बॉम्ब घेऊन निघाले.

योजनेनुसार कोकुरा या गावावर अण्वस्त्र वापरायचे होते. पण त्या गावावर ढगांचे आच्छादन होते. वैमानिकाने घिरट्या मारल्या; पण नेमके लक्ष्य दिसत नव्हते, म्हणून त्याने आपले विमान वैकल्पिक ठिकाण नागासाकी या शहराकडे वळविले. सकाळचे ११ वाजले होते. बॉम्ब टाकल्यावर जमिनीपासून १५०० फूट अंतरावर त्याचा स्फोट झाला. 

नागासाकी शहर हे दोन डोंगरांच्या मध्ये वसले असल्यामुळे स्फोटाची तीव्रता मर्यादित राहिली. तरीही नागासाकीत साठ ते ऐंशी हजार माणसांचा तत्काळ मृत्यू झाला. या स्फोटामुळेही नंतर झालेल्या किरणोत्सर्जनाने हजारो लोकांचा मृत्यू पुढील चार महिन्यांत झाला. पुढील दहा वर्षांपर्यंत किरणोत्सर्जनाचा परिणाम जाणवत होता. कर्करोगाचे प्रमाण संबंधित लोक समुदायात लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले.

जग हादरले
जपान युद्धात अतिशय प्रखरपणे लढत होता, पण हा प्रचंड संहार पाहून युद्धात शरणागती पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पंधरा ऑगस्ट १९४५ रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी जपानच्या नभोवाणीवरून भाषण करून जपानच्या शरणागतीची घोषणा केली व युद्ध थांबल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. नंतर ‘शरणागतीचा करार’ दोन सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या मिसुरी बोटीवर केला गेला. अणुबॉम्बच्या वापरामुळे युद्ध संपले खरे; पण त्याचे संहारक स्वरूप पाहून सारे जग हादरून गेले. मानवजातीच्या भविष्याचा प्रश्न कधी नव्हे तितका प्रकर्षाने चर्चेत आला. खुद्द अमेरिकी विचारवंत अगदी आईसेनहॉवरसारख्या अध्यक्षांनीसुद्धा (जे स्वतः दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती म्हणून कार्यरत होते.) अण्वस्त्र वापराबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले.

प्रत्येक युद्ध हे संहार करणारेच असते आणि त्यामुळे मानवजातीच्या भविष्याबाबत चिंता निर्माण होते. तरीही युद्धसमाप्तीनंतर अचानक काही सुंदर घटना दृष्टीस पडतात. अण्वस्त्र हल्ल्याच्या आधी पर्ल हार्बर या अमेरिकेच्या ज्या नाविक तळावर जपानने हवाई हल्ला केला, त्या पर्ल हार्बरला २०१२मध्ये मी भेट दिली, तेव्हा तेथे विविध देशांतील प्रवासी त्या स्मारकाला भेट देण्यासाठी आले होते. माझे लक्ष वेधून घेतले ते एक अमेरिकी मध्यमवयीन पुरुष आणि त्याच्या बाहुपाशात विश्वासाने चाललेली जपानी स्त्री यांनी. कुठेतरी उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक आल्यासारखे वाटले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com