#यूथटॉक : ‘कमिटमेंट’ शिकविणारा रुपेरी पडदा

Anuj-Jatratkar
Anuj-Jatratkar

चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांच्या गर्दीतलाच मीही एक. पोस्ट-ग्रॅज्युएशननंतर चित्रपटाचं तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आलो. तिथं पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर यांच्यापलीकडील खरा चित्रपट कॅमेऱ्यामागं काम करणाऱ्या तंत्रज्ञांकडून शिकायला मिळाला. चित्रपट निर्माण करण्यात अवघड काहीच नाही, पण तो निर्माण करताना झपाटलेपणाच्या जोडीला संयम, तत्परता आणि ‘शो मस्ट गो ऑन’ची मानसिकता हवी असते. हे सारं चित्रपटवेड्या लोकांमध्ये मिसळल्यानंतरच अनुभवता येतं, शिकता येतं. माझ्या शिक्षणाच्या काळात अशा अनुभवांनी आयुष्याचं शिक्षण दिलं.   

चित्रपट संस्थेतील प्रवेशानंतर पहिल्या दिवशी क्‍लास-टीचर रमेश गुप्ता वर्गात आले. त्यांनी प्रश्न केला, ‘‘चित्रपट कोणता चांगला आणि कोणता वाईट?’’ आम्ही इराणी, स्पॅनिश, इटालियन वगैरे उत्तरं दिली. सर हसले. ‘मग आपल्या फिल्म्स का वाईट?’ यावर आम्ही पोपटासारखी उत्तरं दिली. सरांनी पुढं विचारलं, ‘‘इराणी, जपानी, स्पॅनिश फिल्म चांगल्या असतातच; पण, मला सांगा, त्या फिल्म बघून, अभ्यास करून तुम्ही जपान, स्पेन, इराणला जाऊन चित्रपटनिर्मिती करणार?’, आम्ही  ‘नाही’ असं उत्तर दिलं. सर हसून म्हणाले, ‘मग, जिथे काम करणार आहात, तिथल्याच चित्रपटांना नावं ठेवण्यात काय अर्थ? प्रत्येक चित्रपटसृष्टीच्या वाटचालीमागं तिथला इतिहास कारणीभूत असतो. इराणमध्ये मुक्त वातावरण, स्वातंत्र्य नाही, म्हणून तिथं भावनिक व हृदयस्पर्शी चित्रपट असतात. फ्रेंच फिल्मचा प्रेक्षक प्रगल्भ आहे, कारण तिथून बरेच कलाकार, तंत्रज्ञ निर्माण झाले. लांब कशाला, बंगाल, महाराष्ट्रातील प्रेक्षक साहित्यप्रेमी आहे, त्यांना कन्टेंट महत्त्वाचा वाटतो. आपण अन्यायग्रस्त असल्याची भावना दाक्षिणात्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांना मेलोड्रामा, ‘लार्जर दॅन लाइफ’ मसिहा आवडतो.

भोजपुरी चित्रपट उत्तर प्रदेशात जास्त चालतात; कारण कामगारवर्ग मोठा. अशा परिस्थितीत चित्रपटाचं भले-बुरेपण कसं ठरवणार? आपण चित्रपट पाहून आलो की ‘बकवास’ या शब्दात त्याचं मूल्यमापन करून मोकळे होतो. पण, जो चित्रपट दोन-तीनशे लोकांचं घर चालवतो, त्याला नावं ठेवण्याआधी विचार करा. त्यात जे चांगलं आहे ते घ्या, त्यावर चर्चा करा. वाईट सोडून द्या! जेथे काम करणार आहात, तेथील प्रेक्षकांच्या मानसिकतेचा, तेथील पार्श्वभूमीचा विचार करा. प्रेक्षकांचा आणि निर्मात्याचाही विचार करा. निर्माता जगला तरच तुम्ही आणि पर्यायाने चित्रपटसृष्टी जगणार!’ सरांचं हे सांगणं मनावर कोरलं गेलं. बाऊंड स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरे झिजवताना प्रत्येक वेळी सरांचं बोलणं आठवत राहिलं!

अभ्यासक्रमाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला लघुपट तयार करावयाचा असे. स्टुडिओमधील तंत्रज्ञांमधून आपली टीम निवडण्यापासून सारे सोपस्कार करावे लागत. माझी पटकथा मंजूर झाली, कलाकार निवडले. आमच्या परब सरांना प्रॉडक्‍शन मॅनेजर म्हणून नेमले. चित्रीकरणाला सुरुवात होताना परब सरांना घरून फोन आला. त्यामुळे सर अस्वस्थ होते, विचारल्यावर ‘काही नाही’ एवढंच सांगितलं. तीन दिवस ते लोकेशनवरच होते. शूटिंग संपलं. मी ‘पॅक अप’ची घोषणा केली आणि कुणीतरी ओरडून पडल्याचा आवाज झाला. बघतो तर परब सर बेशुद्ध पडले होते. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्या घरचे आले, तेव्हा समजलं, की चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीला देवाज्ञा झाली होती. त्या दिवशीचा घरून आलेला फोन त्यासाठीच होता. पण, चित्रीकरण थांबेल म्हणून त्यांनी घरच्यांना विधी उरकायला सांगितले. ‘माझी कमिटमेंट आहे. मी आलो तर निर्मात्यांचं, मुलांचं नुकसान होईल!’ असं सांगितलं. त्या रात्री ‘कमिटमेंट’ शब्दाचा खरा अर्थ उमगला.

परीक्षेत ३०० पैकी ३०० गुणांनी मी उत्तीर्ण झाल्यानं डोक्‍यात हवा शिरलेली. कॉलेज जीवनातील आवडत्या आर. वाय. चिकोडी सरांना फोन करून ही बातमी सांगितली. पलीकडे शांतता. मला वाटलं ऐकू गेलं नाही. मी पुन्हा गुण सांगितले. ‘बरं मग?’ पलीकडून सरांचा शांत स्वर. मी मोठ्यानं गुण सांगितले. त्यावर सर म्हणाले, ‘कागदावर किती मार्क मिळाले, यापेक्षा आयुष्याच्या मार्कशीटवर किती मार्क पडले किंवा पाडणार आहेत ते महत्त्वाचं. या मार्कांपेक्षा ते मार्क तुला माणूस म्हणून छान घडवतील!’ सरांच्या उत्तरानं मी जमिनीवर आलो. पुढची दिशा स्पष्ट झाली.

कलाकारानं माणूस म्हणून स्वतःला आणि आपल्या कलाकृतीतून समाजाला प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तोच त्याच्या कामाचा उद्देश असायला हवा, हे सरांनी किती सहज सांगितलं. 

चित्रपटाचा पडदा फक्त चित्रपट दाखवत नाही, तर माणूस म्हणूनही घडवतो. ‘कमिटमेंट’चा अर्थ सांगतो आणि जगणं शिकवतो. चित्रपट मग तो व्यावसायिक, कलात्मक किंवा कोणताही असो, तो एकच भाषा जाणतो मानवी भावनांची, संवेदनांची आणि जीवनमूल्यांची! त्यांना जागृत ठेवणं, साद घालीत राहणं हीच कोणत्याही कलाकृतीची अंतिम कमिटमेंट असते, असायला हवी.  
(लेखक कोल्हापूरस्थित पटकथा-लेखक, दिग्दर्शक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com