#यूथटॉक : माझं अंगण फुलपाखरू झालं

अनुश्री फडणीस
शनिवार, 7 डिसेंबर 2019

‘चाफ्याच्या झाडाला जेव्हा शुभ्र फूल आलं
माझं सगळं अंगण तेव्हा फुलपाखरू झालं!’
या सदराच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधताना मला कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे हे शब्द आठवले आणि कागदावर उमटले. आपणच मनात काही ब्लॉकेजेस तयार करीत असतो; पण शांतपणे विचार करून ते घालवलं तर आपलं बहरणं सहजसोपं होतं, हा अनुभव मला सांगायचाय. सुरुवातीला वर्गामध्ये बोलायलासुद्धा घाबरणारी मी.

‘चाफ्याच्या झाडाला जेव्हा शुभ्र फूल आलं
माझं सगळं अंगण तेव्हा फुलपाखरू झालं!’

या सदराच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधताना मला कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे हे शब्द आठवले आणि कागदावर उमटले. आपणच मनात काही ब्लॉकेजेस तयार करीत असतो; पण शांतपणे विचार करून ते घालवलं तर आपलं बहरणं सहजसोपं होतं, हा अनुभव मला सांगायचाय. सुरुवातीला वर्गामध्ये बोलायलासुद्धा घाबरणारी मी.

भविष्यात शेकडो श्रोत्यांपुढं बोलावं लागेल, असं त्या वेळी कोणी सांगितलं असतं, तर माझा विश्‍वास बसला नसता. नववीत स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये निवेदनाची संधी मिळाली आणि त्याची गोडी निर्माण झाली. त्यामुळे हळूहळू भीती कमी होत गेली.

त्यानंतर साहित्य-नाट्यसंस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या मुंबईतील रुईया महाविद्यालयामुळे माझ्यातील कलागुणांना पोषक वातावरण आणि प्रोत्साहन मिळालं. अभ्यासासोबत वक्तृत्वस्पर्धा, नाट्यवलय, निवेदन-सूत्रसंचालन अशी धडपड सुरू असताना आकाशवाणीत संधी मिळाली. मान्यवरांच्या मुलाखतीचे कार्यक्रम करायला मिळाले. अभिनयाचा पाया जसा रंगभूमीमुळे पक्का होतो, तसा वाणीचा पाया आकाशवाणीमुळे पक्का होतो, असं मला वाटतं. यादरम्यान एक कार्यक्रम माझ्याकडे निवेदनासाठी आला. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची मुलाखत आणि निवेदन, अशी ती संधी चालून येणं हा सुखद धक्का होता. तरीही, मनावर दडपण आलं आणि ते साहजिकही होतं.   कार्यक्रम झाल्यावर पाडगांवकर सरांनी ‘Homework  छान केला होतास,’’ असं सांगितलं. तो माझ्यासाठी मोलाचा आशीर्वाद होता.

पत्रकारितेत एम. ए. करीत असताना turning point आला, असं म्हणता येईल. भावसंगीतातील श्रेष्ठ गायक अरुणजी दाते यांच्या ‘शुक्रतारा’ कार्यक्रमात निवेदक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. श्रीशारदेचे आशीर्वाद ज्यांच्या वाणीला लाभलेले आहेत, अशा नामवंत निवेदकांनी जे कार्यक्रम केले, त्या कार्यक्रमाचे निवेदन सांभाळणं हे आव्हान होतं. पण, अरुणजींनी कार्यक्रम होताच ‘अभ्यासपूर्ण निवेदन केलंस’ अशी दाद दिली आणि मला खूप हायसं वाटलं. आत्मविश्‍वासाला बळ देणारा हा कार्यक्रम ठरला. निवेदन क्षेत्रात काम करताना अनेक अनुभव येत असतात. असाच एक अनुभव म्हणजे काही वेळेस माझ्या देहयष्टीकडं पाहून ही लहान मुलगी निवेदन करू शकेल का? अशी शंका आयोजक टीममधल्या काही सदस्यांना; एवढंच नव्हे तर तेथील उपस्थितांनाही असे. एका कार्यक्रमात तर निवेदनाच्या दरम्यान आयोजकांमधल्या व्यक्तीनं येऊन, ‘तुम्हाला निवेदनाचा अनुभव आहेना? असं बोला, तसं बोला.

बोलायला जमेल ना? नाहीतर मी करतो निवेदन’ अशी भुणभुण लावली होती... असो; पण ती वेळही छानपणे निभावली गेली. एका मोठ्या फेस्टिव्हलमध्ये गायन स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आयत्यावेळी आली. स्पर्धेची माहिती, सादर होणाऱ्या गाण्यांचा तपशील १० मिनिटे आधी मिळाल्यामुळे संपूर्ण निवेदन कोणतीही स्क्रिप्ट हाताशी नसताना करावं लागणार होतं. तरुणाईची उपस्थिती मोठी होती. माझ्यासाठी अत्यंत कसोटीची वेळ होती. उपस्थितांच्या सुरात सूर मिसळून निवेदन सुरू केलं. श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवरून ते मनापासून ऐकत आहेत, असं जाणवलं आणि मग मनावरील ताण कुठच्याकुठं निघून गेला आणि कार्यक्रम रंगतदार झाला.

पूर्वतयारी, गृहपाठ अत्यावश्‍यकच आहेत; परंतु आयत्या वेळेस कसं बोलावं, हे शिकता आलं. असाच एक कसोटीचा क्षण म्हणजे एका कार्यक्रमात महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि अश्विनी भावे या कलावंतांची आयत्या वेळेस मुलाखत घेण्याची जबाबदारी. अशा वेळेस प्रसंगावधान, अभ्यास, memory bank अशा गोष्टी कामी येतात.

निवेदन-सूत्रसंचालन म्हणजे केवळ माहिती वाचन नव्हे, तर अगदी कमी कालावधीत (२-३ मिनिटं) कार्यक्रमाची सलगता ठेवत संवाद साधत कार्यक्रम पुढं नेणं होय. ज्या कार्यक्रमाचं निवेदन-सूत्रसंचालन करायचं आहे, त्याची माहिती आणि संबंधित विषयावरचा अभ्यास करून योग्य शब्दांत मांडणी करणं आवश्‍यक असतं. याच पूर्वतयारीतला महत्त्वाचा भाग म्हणजे कार्यक्रमाची संहिता स्वतः लिहिणं अथवा लिहून दिलेली असल्यास कार्यक्रमाआधी किमान दोन-तीनदा वाचून आपल्या सहज स्वरात प्रस्तुत करणं. चौफेर वाचन, आवाजातले चढ-उतार, विराम-स्वल्पविराम, स्वच्छ उच्चार आणि श्रोत्यांशी असणारा eye contact यामुळे निवेदन फुलण्यास मदत होते. त्याचबरोबर सुयोग्य पेहराव, केशभूषा, मेकअप याकडंही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत ही क्षेत्रं मोठ्या प्रमाणात विस्तारली असल्यामुळे या क्षेत्रात खूप संधी आहेत आणि याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळाही आहेत. निवेदन/सूत्रसंचालनाचं काम सुरू असतानाच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटात ‘शकू’ नावाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. आपल्या आवडीच्या कलासंपन्न क्षेत्रात काम करायला मिळणं यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो?
(लेखिका मुंबईस्थित निवेदिका-अभिनेत्री आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article anushri fadnis