वसा जपानी कार्यसंस्कृतीचा

अविनाश भिडे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

जपानमध्ये जाण्याची, तेथे काम करण्याची, शिक्षण घेण्याची संधी मिळणे दुर्मीळ आहे. त्यामुळे जपानला न जाता तेथे गेल्याचा अनुभव आपण इतरांना देऊ शकलो तर, आपले ‘जपान प्रोजेक्‍ट’ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले असे म्हणता येईल.

जपानमध्ये जाण्याची, तेथे काम करण्याची, शिक्षण घेण्याची संधी मिळणे दुर्मीळ आहे. त्यामुळे जपानला न जाता तेथे गेल्याचा अनुभव आपण इतरांना देऊ शकलो तर, आपले ‘जपान प्रोजेक्‍ट’ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले असे म्हणता येईल. 

जपानमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळणे, शिक्षण पूर्ण करणे, भारतात परत येऊन आपला भविष्यकाळ उज्ज्वल करणे किंवा जपानमध्ये काम करण्याची संधी मिळणे याचे मी काही भाग पाडले आहेत. ते असे - १. जपानला जाण्याची पूर्वतयारी करणे. २. जपानमध्ये असताना तेथे दिसणाऱ्या, अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करणे. ३. जपानी लोकांच्या गुणांचे, वैशिष्ट्यांचे अवलोकन करून त्यातील शक्‍य असतील ते अंगी बाणवणे. ४. भारतात परत आल्यानंतर कोठेही, कोणत्याही क्षेत्रात काम करताना जपानी संस्कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणे. ५. जपानला जाऊन आल्यानंतर स्वतःमध्ये जो फरक पडला असेल तो जाणून घेऊन त्याचे जतन करणे. ६. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त, दुसऱ्याचा आदर करणे, वक्तशीरपणा, प्रत्येकाचे मनुष्यत्व ओळखणे, विचारपूर्वक बोलणे, दिलेला शब्द पाळणे, देशाभिमान असणे, कोणत्याही सुरक्षेबद्दल जागरूक राहणे, कमीत कमी परंतु योग्य शब्दांत आशय व्यक्त करणे, ‘झिरो डिफेक्‍ट’ असलेले काम करणे, यांचा अवलंब करण्याबरोबरच जे आपण जपानमध्ये मिळविले आहे, ते उदार मनाने, योग्य वाटेल तेथे वाटणे हे करण्याकरिता चांगल्या तऱ्हेने बोलण्याची, संभाषणाची कला अवगत करणे आवश्‍यक आहे.

कारण, आपल्याला जो अनुभवांचा खजिना मिळालेला आहे, तो इतरांना वाटणे यासारखा दुसरा आनंद नाही. जपानमध्ये जाण्याची, तेथे काम करण्याची, शिक्षण घेण्याची संधी मिळणे दुर्मीळ आहे. त्यामुळे जपानला न जाता तेथे गेल्याचा अनुभव आपण इतरांना देऊ शकलो तर, आपले ‘जपान प्रोजेक्‍ट’ खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले असे म्हणता येईल. 

मला स्वतःला एक वर्षभर जपानमधील क्‍योटो येथे राहून उद्योग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. सुदैवाने तेथे अनेक मित्र मिळाले. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांशी संबंध आले. त्यांचे विचार जाणून घेता आले. त्यांच्याशी मोडक्‍यातोडक्‍या का असेना, जपानी भाषेत संवाद साधता आला.

तेथील लोकांची जडणघडण अशी वैशिष्ट्यपूर्ण कशी झाली असावी याचे इंगित जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. या प्रयत्नात प्रत्येक जपानी माणसाने भाषेची अडचण असूनही मला सहकार्य केले. माझे काही प्रश्‍न त्यांना वेगळ्या पद्धतीचे, थोडे विचित्र वाटले, तरी माझा प्रामाणिक हेतू लक्षात घेऊन त्यांनी माझी जिज्ञासा पूर्ण केली.

जपानहून परत आल्यानंतर तेथील अनुभव सांगणारे ‘साकुर डेज’ नावाचे पुस्तक मी प्रसिद्ध केले. त्यानंतरही मी जपानमधील अनेकविध अनुभव हे उद्योग आणि इतरही क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. हे सांगण्याचा हेतू एकच आहे, की माझ्या दृष्टीने जपान भेट हा सर्वार्थाने एक ‘प्रकल्प’ आहे जो आयुष्यभर पुरतो. जपान भेटीसाठी आपण एखाद्या प्रकल्पाची पूर्वतयारी करतो, तशी तयारी करणे गरजेचे आहे. उदा. इंडो-जॅपनीज असोसिएशनमध्ये जाऊन जपान, तेथील भाषा आणि इतर माहिती मिळवणे, जपानमध्ये राहून आलेल्या लोकांशी संपर्क साधणे, शक्‍य असल्यास जपानी भाषेतील दैनंदिन गरजेचे शब्द शिकून घेणे. या प्रकारच्या पूर्वतयारीचा फायदा म्हणजे आपण जपानला गेल्यानंतर तेथे लवकर रुळू शकतो, जपानी लोकांशी मैत्री होते. तेथील गोष्टी लवकर आत्मसात करता येतात. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणे जरूरीचे आहे, ती म्हणजे तेथे अनुभवास आलेले गुण आत्मसात करणे, तरच ते भारतात परत आल्यानंतर आपण अमलात आणू शकतो.  

जपानमध्ये जाऊन तेथे करिअर करणे किंवा भारतात परत आल्यानंतर आपल्या करिअरमध्ये प्रगती करणे इतकाच  मर्यादित हेतू असू नये. आपल्यासमोर एक आव्हान आहे, ते म्हणजे स्वतः ‘मिनी जपानी’ बनून इतरांनाही त्याप्रमाणे होण्यास उद्युक्त करणे याचे सतत भान ठेवणे, तरच जपानला जाणे ही एक सुवर्णसंधी होती, असे म्हणता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article avinash bhide