भाष्य : आभासी चलन: वास्तव नि विस्तव

cryptocurrency
cryptocurrency

क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यावर घातलेली बंदी रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एखादे नवे तंत्रज्ञान वा प्रवाह थोपविता येत नाही, हे खरे असले  तरी अशावेळी नियामक व्यवस्था कशा उभारायच्या, याचा विचार करावा लागतो. त्यादृष्टीने सरकारला पावले उचलावी लागतील.

क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यावर रिझर्व्ह बॅंकेने घातलेली बंदी रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने अशा चलनांमधील व्यवहार बेकायदा ठरविले होते. बॅंकांनाही अशा व्यवहारांमध्ये भाग घेण्यावर निर्बंध घातले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हे व्यवहार करण्यास मुभा मिळाली आहे. या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांनी यातील जोखीम लक्षात घ्यावी. ती लक्षात न घेता व्यवहार करणे धोक्‍याचे ठरेल.  बिटकॉईन,इथेरियम, रिपल अशा क्रिप्टोकरन्सी (इलेक्ट्रॉनिक चलन) जगात उदयाला आल्या आहेत.

चलनव्यवस्थेच्या इतिहासाच्या एका टप्प्यावर सोने, चांदी, तांबे अशा धातूंची नाणी उपयोगात होती. त्यानंतर कागदी चलनाच्या नोटा वापरात आल्या. बॅंकव्यवस्था वाढत गेली, तसे फक्त चलनावर नव्हे; तर बॅंकेत ठेवलेल्या रकमेच्या आधारे व्यवहार होऊ लागले आणि त्यात लाखोपटींनी वाढ झाली. ते सोईचे ठरू लागले. कागदी चलन आल्यानंतर त्याचा पुरवठा हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जेवढ्या नोटा छापल्या जातील, तेवढ्या प्रमाणात सरकारने सोने ठेवण्याची पद्धत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रमुख देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. नोटांच्या प्रमाणात सोने ठेवणे अशक्‍य झाले. याच वेळी आंतरराष्ट्रीय व्यवहारांत वाढ झाल्याने वेगवेगळ्या देशांच्या चलनांच्या विनिमय दरात सुसूत्रता आणणे आवश्‍यक झाले. १९४४ मध्ये ब्रेटन वूड्‌समधील आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय चलन नियंत्रणाची नवीन प्रणाली जन्माला आली. यामध्ये एक औंस सोन्याला ३५ अमेरिकी डॉलर असा दर निश्‍चित झाला. इतर देशांचे चलन अमेरिकी डॉलरशी संलग्न करण्यात आले आणि त्यांचा विनिमय दर ठरविण्याची सर्वसंमत पद्धत आली.

१९६० च्या दशकात अमेरिकेतील वित्तीय तूट हाताबाहेर जाऊ लागली. डॉलरला सोन्याचे पाठबळ देणे शक्‍य होईना झाले. त्यातून ऑगस्ट १९७१मध्ये तत्कालीन अध्यक्ष निक्‍सन यांनी डॉलर व सोन्याचा संबंध तोडण्याचे जाहीर केले. गेल्या ५० वर्षांत एखाद्या देशाने किती नोटा छापाव्यात किंवा किती चलनाचे वितरण करावे, यावरचा अंकुश सैल झाला. त्या त्या देशातील मध्यवर्ती बॅंकांकडे चलनपुरवठ्याचे अधिकार आले. त्या वेळी जॉन मेनार्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाच्या सिद्धांताप्रमाणे आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी अधिकाधिक चलनपुरवठ्याचे धोरण अनेक देशांनी स्वीकारले.

अधिक नोटा छापून उपभोक्‍त्यांच्या खर्चाला उत्तेजन देण्यामुळे आर्थिक वाढ व भाववाढ, या गोष्टी अंगवळणी पडल्या. २००८मधील मंदीनंतरही व्याजदर कमी करणे आणि मुबलक चलनपुरवठा, याच उपायांनी गेल्या दहा वर्षांत महामंदीच्या धोक्‍यापासून अर्थव्यवस्था वाचविण्याचे धोरण अंगीकारण्यात आले आहे.  याच्याविरुद्ध विचार मांडणाऱ्या अर्थविश्‍लेषकांच्या मते फक्त चलनाचा महापूर आणून अर्थव्यवस्था सुधारता येणार नाही. उलट व्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. अमेरिका-चीन स्पर्धेतही अशा संकटाची टांगती तलवार आहे. अशा प्रसंगी कागदी चलनाच्या पर्यायांचा विचार होतो. हजारो वर्षे माणसाने सोन्याचा उपयोग चलन म्हणून केला आहे. सर्वांचा त्या चलनावर विश्‍वास असेल, तरच ते विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारले जाते.

इतर सर्व कागदी चलने व्यवहारात आणताना त्याला सरकारी पाठबळ असते. पण, सोने हे कोणत्याही सार्वभौम सत्तेच्या पाठिंब्याशिवाय जगात सर्वत्र चलन म्हणून चालू शकते.

सर्वाधिक जोखीमही
आजच्या डिजिटल जगात अशाच प्रकारच्या चलनाची संकल्पना क्रिप्टोकरन्सीच्या रूपाने प्रकटली आहे. याची सुरुवात ‘बिटकॉइन’ने झाली. ही व्यवस्था कोणी सुरू केली, याबद्दल संदिग्धता आहे. सतोशी नाकामोटो नामक जपानी संशोधकाला याचा निर्माता मानले जाते. जानेवारी २००९ मध्ये बिटकॉइनची सुरुवात झाली. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइनचा पुरवठा मर्यादित आहे. ‘ब्लॉकचेन’ ही खुली नि पारदर्शक प्रणाली असून, त्यातील हिशेब सर्वांना पाहता येतात. त्याचा उपयोग क्रिप्टोकरन्सीपुरता मर्यादित नसून, इतर अनेक ठिकाणी त्याचा उपयोग ‘डाटाबेस’ म्हणून करणे उपयुक्त व सुरक्षित मानले जाते. संगणकाचा उपयोग करून नवीन बिटकॉइनचे ‘उत्खनन’ करता येते. यासाठी संगणकातील ग्राफिक प्रोसेसरचा उपयोग लाभदायक ठरत असल्याने अशा प्रोसेसरचे भावही कडाडले होते. बिटकॉइन उत्खनन करणे अधिकाधिक अवघड होत जाणे, अशी त्याची रचना असल्याने त्यासाठी लागणारा विजेचा वापर आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता वाढते आहे.

बिटकॉइनच्या रचनेमुळे जास्तीत जास्त २.१ कोटी इतकेच चलन तयार होणे शक्‍य असल्याने त्याच्या पुरवठ्यावर मर्यादा आहेत. गेल्या दहा वर्षांत चलनपुरवठा वाढत गेला, तशी बिटकॉइनची किंमतही वधारली. या काळात ही किंमत ९० हजार पट इतकी आश्‍चर्यकारक पद्धतीने वाढली. ही किंमत वाढू लागली, तसे अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होत गेले. मात्र, या किमतीतील वध-घट ही प्रमाणाबाहेर होत असल्याने अचानक ४० टक्के ते ५० टक्के तोटासुद्धा या व्यवहारांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे सर्वाधिक जोखीम म्हणूनच याकडे बघावे लागेल. कोणत्याही चलनातून उत्पन्न मिळत नाही. बॅंक ठेवीवर, रोख्यांवर व्याज मिळते. शेअर विकत घेतल्यास त्या कंपनीच्या नफ्यात हिस्सा मिळतो. म्हणून पुढे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ओघावर त्याचे मूल्यांकन करणे शक्‍य होते. सोने, चलनी नोटा यांना असे उत्पन्न नाही. तसेच क्रिप्टोकरन्सीलाही नाही. त्यामुळे मूल्यांकनाच्या कोष्टकात यांना बसविता येत नाही. मर्यादित पुरवठा आणि लोकांचा विश्‍वास, या दोनच घटकांवर त्यांची किंमत ठरते. सोन्याचा जगातील साठा १ लाख ८६ हजार टन इतकाच आहे. त्यात नवी भर पडणे अशक्‍यच.

‘क्रिप्टो’मध्ये मात्र नवनवीन पर्यायी करन्सीची भर पडते आहे. अशा प्रकारची सहा हजार विविध चलने जगात प्रसारित झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मर्यादित पुरवठ्याचा दावा फोल ठरतो.

क्रिप्टोकरन्सी हे एकप्रकारे सरकारच्या चलननिर्मितीच्या अधिकाराला दिलेले आव्हानच. त्यामुळे राज्यकर्ते त्याला मुक्तपणे वाढू देणार नाहीत. देशांच्या सीमा क्रिप्टोवर बंधन घालू शकत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारात सरकारी नियंत्रण धाब्यावर बसविले जाते. अनेक अवैध आणि बेकायदा व्यवहार यात बेमालूमपणे करणे शक्‍य असल्याने ‘अंडरवर्ल्डचा’ही मोठा हात त्यात आहे. ‘डार्कनेट’मध्ये अशी चलने सर्रास वापरली जातात. त्यातील मोठ्या वध-घटीचे पर्यवसान वसुलीसाठी बळाचा वापर करण्यात होऊ शकते. ‘रॅन्समवेअर’ची खंडणी क्रिप्टोमध्ये मागितली जाते. हॅकिंगमुळे क्रिप्टो एक्‍सचेंजचे कोट्यवधी डॉलर चोरीला गेल्यामुळे ते एक्‍सचेंजच बुडाले व अनेकांना फटका बसला. या सगळ्याची सरकारलाही मोठी डोकेदुखी आहे. एखादे नवे तंत्रज्ञान वा नवा प्रवाह थोपविता येत नाही; विचार करावा लागतो तो नियमनाचा. त्यादृष्टीने सरकारला पावले उचलावी लागतील. 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने मात्र हा आगीशी खेळ आहे. २०००च्या आसपास हजारो ‘डॉट कॉम’ कंपन्या कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढल्या आणि त्या कोसळल्या, तेव्हा अनेकांचे शंभर टक्के नुकसान झाले. आज वीस वर्षांनंतर मागे पाहताना जगातील सर्वांत मूल्यवान कंपन्यांमध्ये ‘ॲमॅझॉन,‘ ‘गुगल,’ ‘फेसबुक,’ ‘नेटफ्लिक्‍स’सारख्या ‘डॉट कॉम’ कंपन्याच आघाडीवर आहेत, हेही नजरेआड करून चालणार नाही. दहा-वीस वर्षांनी कोणत्या क्रिप्टोकरन्सी टिकतील, याचे भाकीत करता येणार नाही आणि अशा संकल्पनेचा उपहास करणेही योग्य नाही. पण. आज तरी ‘गुंतवणूक’ म्हणून त्याला निकष लावता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com