अग्रलेख : गर्जेल तो पडेल काय?

congress
congress

दिल्लीत रामलीला मैदानावर शनिवारी ‘भारत बचाओ’ रॅलीच्या निमित्ताने काँग्रेसने अनेक दिवसांनंतर, विशेषत: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्‍तिप्रदर्शन केले. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल-प्रियांका यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री, प्रमुख नेत्यांनी केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध लढाईचे रणशिंग फुंकले. सोनिया गांधी यांनी आक्रमक भाषणात कार्यकर्त्यांना आरपार लढाईचा संदेश दिला. केवळ प्रतीकात्मक आंदोलनाने काही साधणार नाही, तर रस्त्यावर उतरून लढावे लागेल, असे सांगितले. ही लढाई नेमकी कोणाविरुद्ध व कशासाठी आहे, यावरही त्या बोलल्या. प्रश्‍न आहे तो खरोखरच काँग्रेस कार्यकर्ते अशा लढाईला तयार आहेत का, हाच. याचे कारण आज खरोखरच देशापुढे आव्हाने मोठी आहेत. काश्‍मीर आणि ईशान्य भारतातील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे. मोदी सरकारने काश्‍मीरशी संबंधित ३७० कलम रद्द केले, सर्वोच्च न्यायालयातून अयोध्येतील रामजन्मभूमीबद्दलचा निकाल आला आणि काल-परवा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या रूपाने नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीने एकप्रकारे ‘हॅट्ट्रिक’ साधली. गंभीर व दूरगामी परिणाम घडविणाऱ्या या तीन निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर देश धार्मिक ध्रुवीकरणाच्या वळणावर उभा आहे. गृहमंत्री अमित शहा जरी काश्‍मीर खोऱ्यात सारे काही आलबेल असल्याचे सांगत असले, तरी गेले चार-साडेचार महिने सगळे प्रमुख नेते स्थानबद्ध आहेत.  ईशान्य भारतात, तसेच पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. परंतु, ‘भारत बचाओ’ रॅलीत काँग्रेस नेत्यांनी, विशेषत: सोनिया व राहुल गांधी यांनी नागरिकत्व कायद्यावर फारसे न बोलता मोदी-शहा यांना आर्थिक आघाडीवर लक्ष्य केले. तीन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदीचे अजूनही जाणवत असलेले दुष्परिणाम, आर्थिक मंदी, उद्योग-व्यवसायावरील संकटे, विकासदरातील घसरण, बेरोजगारी, शेतीच्या समस्या, शेतकरी आत्महत्या अशा मूलभूत प्रश्‍नांच्या अनुषंगानेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत राहुल गांधी यांनी झारखंडच्या प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्याबद्दल भाजपने माफीची मागणी केली. तिला प्रत्युत्तर देण्याची संधी मेळाव्यात राहुल गांधी यांनी साधली. शिवाय, ‘माझे नाव राहुल सावरकर नाही, गांधी आहे. प्राण गेला तरी बेहत्तर; पण सत्य बोलल्याबद्दल माफी मागणार नाही,’ असे फिल्मी डायलॉग मारले आणि नव्या वादाला जन्म दिला. विशेषतः सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्काराचा मुद्दा लावून धरणाऱ्या शिवसेनेसोबत महाराष्ट्रात काँग्रेसने सत्ता स्थापन केलेली असताना ही शेरेबाजी करण्यात आली. साहजिकच, शिवसेनेला कात्रीत पकडण्याची संधी महाराष्ट्रात भाजपने साधली. शिवसेनेनेही, ‘आम्ही गांधी, नेहरू, पटेल यांचा आदर करतो; तेव्हा तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका,’ अशी इशारेवजा विनवणी केली आहे.

रामलीला मैदानावरच्या काँग्रेसच्या या हुंकाराला आणखी एक संदर्भ नजीकच्या भविष्यकाळातील पक्षनेतृत्वाचा होता. लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा दारुण पराभव वाट्याला आल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले. आजाराशी झुंजणाऱ्या सोनिया गांधी यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात ती जबाबदारी आली. डिसेंबरअखरेपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची पर्यायी म्हणजेच कायमस्वरूपी व्यवस्था होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारच्या रॅलीद्वारे पुन्हा राहुल गांधी यांचे नेतृत्व पक्षात सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल, असे मानले गेले. संसदेत राहुल यांच्या विधानावरून जो गोंधळ झाला, भाजपच्या महिला खासदार त्यांच्यावर तुटून पडल्या, त्यामुळे काँग्रेससाठी ती संधी अधिक प्रबळ झाली होती. तरीही पक्षाच्या अध्यक्षपदासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. कदाचित, कार्यकारिणीत निर्णय होईल. या मेळाव्यात ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया-राहुल-प्रियांका यांच्या नावाचा जप चालवला, तो पाहता पक्षनेतृत्वासाठी राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरे नाव सध्या तरी पुढे नाही. त्यामुळेच, भाजपने ‘भारत बचाओ’ रॅलीची खिल्ली उडवली आहे. भारत नव्हे, तर ही ‘फॅमिली बचाओ’ रॅली असल्याचे म्हटले. राजकीय टीकाटिप्पणी बाजूला ठेवल्यानंतरही प्रश्‍न उरतात, की अशा रॅलीचा किती फायदा काँग्रेस पक्षाला होईल? वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्याने एकप्रकारचे शैथिल्य आलेली पक्षसंघटना खरेच रस्त्यावर उतरून आरपारची लढाई लढेल, की मेळाव्याचे फलित केवळ निवडणूक प्रचारात जाणवते त्याप्रमाणे भाजपविरोधी वातावरणनिर्मितीपुरते मर्यादित राहील, अशी शंका आहे. मुद्दा आहे तो निवडणुकीतल्या यशात त्याचे रूपांतर होण्याचा. सध्यातरी कोणताही चमत्कार घडविण्याची ताकद काँग्रेसच्या संघटनेत नाही, हे या सगळ्या प्रश्‍नांचे उत्तर आहे. काँग्रेसचा खरा कस काही महिन्यांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. गेल्या वेळचा भोपळा फोडण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. मेळाव्यातून पक्षाला उभारी मिळाली की नाही, हे तेव्हा कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com