#यूथटॉक : जागर होऊनही ‘समता’ दूरच

Deepak-Chatap
Deepak-Chatap

‘इन्साफ की भीख मत मांगो, बहुत मांग चुके है...’ हा आर्टिकल १५ चित्रपटातील डायलॉग कानावर येताच अंगावर शहारे येतात. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय राज्यघटनेतील पंधरावे कलम हे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करते. एकीकडे या वर्षी आपण भारतीय राज्यघटनेची सत्तरी साजरी करत असताना त्यातील समतेचं मूल्य सांगणाऱ्या ‘आर्टिकल १५’शी संबंधित चित्रपट येतो आणि आजच्या समाजाचं भीषण वास्तव डोळ्यांसमोर उभे करतो. खरंच समतेचा एवढा जागर सर्वत्र होत असूनही ती मूल्यं रुजत का नाही, हा प्रश्‍न अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्रात नुकतीच वारी संपन्न झाली. महाराष्ट्रात वारीला प्रदीर्घ परंपरा आहे. या वारीची सुरवात समाजातील नानाविध भेद नष्ट करून समतेचा विचार रुजविण्यासाठी झाली. आजही लाखो लोक वारीला कुठल्याही निमंत्रणाविना पावसात भिजत, सोयी-गैरसोयीचा विचार न करता स्वखर्चाने उत्स्फूर्तपणे जात असतात.
‘यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर।।’ 

याचाच अर्थ वारीत जात, वय, लिंग नानाविध भेदभाव नाकारला आहे. म्हणूनच वय, जात, धर्म विसरून माणूस म्हणून सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडताना दिसतात. वारीत ज्या संतविचारांचा जागर केला जातो, असे संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई आदी संतमंडळी वेगवेगळ्या जाती-धर्म-लिंगाची होती. वारीमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावास स्थान नाही. परंतु, एवढे असूनही आजही समता जनसामान्यांत रुजलेली दिसत नाही. म्हणूनच त्या चित्रपटातील निशाद म्हणतो, ‘हम कभी हरिजन हो जाते है, बहुजन हो जाते है...लेकिन कभी ‘जन’ नहीं हो पाते।’ ‘महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा ‘या मागणीसाठी आजही संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ- शबरीमला मंदिर घटना, शनिशिंगणापूर मंदिर घटना इत्यादी.

‘ऑक्‍सफॅम’च्या अहवालानुसार २०१९ मध्ये भारतात नऊ सर्वाधिक श्रीमंत माणसांकडे देशातल्या ५० टक्के माणसांएवढी संपत्ती आहे. किती मोठी ही विषमता! आजही भारतात लाखो लोक डोक्‍यावरून मैला वाहून नेण्याच्या कामात आहेत. सतत घाणीशी संबंध येत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या आजाराने दर पाच दिवसांत एका सफाई कामगाराचा मृत्यू होतो. हे सर्व सफाई कामगार एका विशिष्ट जातीचे असल्याचं दिसतं.

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना. यांसारख्या उदाहरणांतून आपल्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात विषमता असल्याचे दिसून येईल. सर्वांना समान शिक्षण मिळावे, ही मागणी ‘हंटर कमिशन’समोर करणारे महात्मा फुले असतील किंवा सर्वांना मोफत व समान शिक्षण देणारे शाहू महाराज असतील किंवा सर्व घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत यासाठी झटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारांचा धागा समान आहे. दुर्दैवी बाब म्हणजे समतेचे मूल्य रुजवू पाहणाऱ्या ‘आर्टिकल १५’ चित्रपटालादेखील विरोध होतो. काही ठिकाणी तोडफोड होते आणि चित्रपट बंद पाडला जातो. संतांचा समतेचा म्हणजेच राज्यघटनेतील ‘आर्टिकल१५’मधील विचार मांडताना आजच्या काळातदेखील विरोधाला सामोरे जावे लागते. यातून आजच्या परिस्थितीचे अवलोकन होईल. या चित्रपटातील नायकाच्या रूपाने चित्रपटातून मिळालेला संदेश महत्त्वाचा आहे. चित्रपटातील नायक अगदी सुरवातीला खालच्या मानल्या गेलेल्या जातीतील व्यक्तीकडून पाणी विकत घेतो. तेव्हा नायकाचे सहकारी त्याला विरोध करतात आणि आपण या जातीच्या लोकांकडून पाणी पीत नाही, असे सांगतात. हा विरोध बाजूला सारून आयपीएस अयान ते पाणी विकत घेतो. समाजाने जी जात खालच्या स्तराची मानली त्या जातीच्या महिलेने तयार केलेलं अन्न सर्व सहकाऱ्यांसोबत खातो, हे दृश्‍य शेवटच्या भागात परिणाम करतं. 

सुरुवातीला समतेसाठी झगडणारा आय. पी. एस. अयान हा एकटा असतो. त्यामुळे इतर सहकारी ते पाणी पिताना दिसत नाहीत. परंतु, चित्रपटाच्या शेवटी सर्व सहकारी अयानसोबत हसत हसत अन्न खातात. राज्यघटनेतील समतेचे मूल्य काय किंवा संतांनी आपल्या जगण्यातून साकारलेली समता काय, तसा मूल्याधिष्ठित समाज बघायचा असेल तर सुरवात स्वतःपासून करावी लागेल. एकदम आंदोलन, मोर्चा, क्रांती आणि जग बदलाची भाषा न करता स्वतः समतेच्या वाटेनं जावं लागेल. समाजात समता नांदली पाहिजे, हे नुसतं म्हणणं सोपं असतं. त्या समतेच्या वाटेनं स्वत: चालणं मात्र अवघड असतं. तेव्हा त्या चित्रपटातील विचार हा स्वत: अंगीकारण्याचा प्रयत्न करू. उगाच एकमेकांना उपदेशात्मक सल्ले, समाजाला दोष आणि आदर्शवत विचार न सांगितलेले बरे!
(लेखक चंद्रपूरचे असून सध्या पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com