साऱ्या जगाला आस मुक्तीची

थायलंड येथील एका रेस्टॉरंटमधील दृश्‍य.
थायलंड येथील एका रेस्टॉरंटमधील दृश्‍य.

कोरोना राहणारच आहे, त्याच्याशी मुकाबला करीत जनजीवन हळूहळू सुरळीत करण्याकडे आता अनेक देशांचा कल आहे. कारण सलग इतका काळ अर्थचक्र थोपवणे कोणालाच परवडणारे नाही.

कोरोनामुळे जगाचे व्यवहार गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झाले. कोरोनावरील लस इतक्यात येणार नसल्याचे लोकांना आता उमगले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला पुष्टी दिल्याने सर्वांनाच आता आगामी काही महिने कोरोनासह जीवन व्यतीत करावे लागेल. देशोदेशीचे सत्ताधीश असोत की अब्जाधीश, रस्त्यावर काम करणारा मजूर असो वा झोपडीत राहणारा गरीब. सर्वांनाच कोरोनासह जगावे लागणार आहे. त्यामुळे जगभर आता लॉकडाउन टप्प्याटप्याने उठवण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. ज्या चीनमधून कोरोनाने जगात प्रवेश केला तेथील व्यवहार सुरळीत होत आहेत. युरोपातील बहुतांश देश लॉकडाउन शिथील करत आहेत. एक मात्र नक्की की, कोरोनानंतर सारे समाजजीवन कमालीचे बदलले आहे. जगभरातील विविध माध्यमांत याचेच प्रतिबिंब उमटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

चीनमध्ये तंत्रज्ञानातून नजर
अल जझीराच्या बींजिगमधील प्रतिनिधी कॅटरिना यू यांनी खास व्हिडीओ स्ट्रिमींगद्वारे चीनच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, बींजिग, शांघाय अगदी वुहानही खुले झाले आहे. मात्र गर्दीने फुललेले रस्ते आता धास्तीने व्यापले आहेत. मास्क लावून घराबाहेर पडताच तुमच्या शरीराचे तापमान तपासले जाते. चौकाचौकांत, रेस्टारंट, दुकान कोठेही जा यातून सुटका नाही. आधीचा चीन आता दिसणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे.

गर्दी टाळण्यासाठी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेस्टारंटमध्ये टेबलवर खास तावदाने लावली जात आहेत. आर्थिक कारणास्तव अनेकांनी महागड्या शहरातून छोट्या शहरांत जाण्याचा पर्याय निवडला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे.

लोकांचा प्रचंड डेटा जमा केला जात आहे. अगदी ट्रॅफिक लाईटच्या व्यवस्थेतही बदल केले आहेत. ही यंत्रणा आता क्यू आर कोडवर आधारित बनविली असून य़ेणाऱ्या जाणाऱ्यांच्या हालचालींवर, आरोग्यविषयक माहितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. आगामी काळात सर्वच नागरिकांच्या आरोग्यावर सरकारची करडी नजर असेल अशी भीती मानवाधिकार कार्यकर्त्यांना वाटत आहे. पण तरीही लोक आता घराबाहेर पडण्यास कमालीचे इच्छुक आहेत. शांघायचे डिस्नीलॅंड खुले होताच अवघ्या तीन मिनिटांत तेथील तिकीटे संपली, यावरूनच याची प्रचिती येते.

पर्यटकांसाठी थायललंड बदलले
लंडनच्या फायनान्शियल टाईम्सने रविवारच्या अंकात थायलंडवर विशेष पान केले आहे. लॉकडाउननंतर पर्यटन व्यवसाय सुरु करणारा थायलंड हा पहिला देश ठरला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ह़ॉटेल्सनी रचनेत आमूलाग्र बदल केले आहेत. आतील वातानुकुलीत जिम मोकळ्या हिरवळीवर हलविले आहेत. हॉस्पिटलप्रमाणे हॉटेलच्या खोल्यांची स्वच्छता करण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क व शिल्ड बंधनकारक आहे. अगदी थायी नृत्यांगनाही आता खास फेसशिल्डसह नृत्य करतील. दोन टेबलमधील अंतर वाढविले आहे. इतकेच नव्हे तर टेबलची रचनाही नवी झाली आहे. त्यावर खास प्रकारची तावदाने लावून कंपार्टमेंट करण्यात आली आहेत. समुद्रकिनारे सध्या कधी नव्हे इतके स्वच्छ आहेत की तेथील प्रवाळे सहज दृष्टीपथास येतात. स्वागताची सारी जय्यत तयारी तर करण्यात आली आहे; पण पर्यटक कधी येतील याचा सध्या तरी नेम नाही. सीमा खुल्या करण्यासाठी चीन, दक्षिण कोरियाशी सरकारने बोलणी सुरु केली आहे. लवकरच पर्यटन व्यवसाय पुन्हा बहरेल अशी थायलंडवासियांना आशा आहे.

युरोपात लॉकडाउन शिथिल
युरोपमध्ये सर्वांत आधी इटलीत कोरोनाने हाहाकार माजविला. तेथे कोरोनाने ३१ हजार जणांचा बळी घेतला आहे. युरोपात सर्वात आदी इटलीने लॉकाडउन सुरु केले. मात्र इटलीनेते उठविण्यास सुरूवात केल्याचे बीबीसीने युरोपिय देशांवरील खास रिपोर्टमध्ये म्हटले आहे. इटलीत चार मे रोजी कारखाने सुरु झाले. आता क्रीडांगणे, स्विमींग पूल, जिम सुरू होत असून दहा जूनपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू होतील. आम्ही कॅलक्युलटेड धोका पत्करत आहोत; पण असे करण्याशिवाय गत्यंतरच नाही, अन्यथा हे सारे पुन्हा सुरूच होवू शकणार नाही, ही पंतप्रधान गिसेप्पी यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. साऱ्या युरोपात आता लॉकडाउन टप्प्याटप्प्याने मागे घेतले जात आहे.

जर्मनीत दुकाने, कारखान्यांपाठोपाठ शाळाही सुरु होत आहेत. फुटबॉल सामनेही सुरु होतील. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले फ्रान्समधील समुद्रकिनारे खुले होत असून तेथेही शाळा सुरु झाल्या आहेत. स्पेनने मात्र सप्टेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. बहुतांश युरोपिय 
देशांतील ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आता खुली करण्यात येत आहेत.

एकंदरित पाहता कोरोनासह नव्याने जीवन सुरु करण्याची मानसिक तयारी जगातील बहुतांश देशांनी केली आहे. त्या दिशेने सावध पावले पडू लागली आहेत. कोरोना राहणारच आहे, त्याच्याशी मुकाबला करीत जनजीवन सुरळित करण्याकडे आता अनेक देशांचा कल आहे. कारण सलग इतका काळ अर्थचक्र थोपवणे कोणालाच परवडणारे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com