भाष्य : शक्ती सामूहिक प्रतिकाराची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid19

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाढत चाललेल्या ‘कोविड-१९’च्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन लांबवणे हा उपाय आहे, असा काहींचा समज आहे. या साथीबाबतचे विज्ञान पाहिल्यास तो योग्य आहे काय, हे समजेल. आता या साथीने अनेक ठिकाणी ‘समूह-प्रसारा’चा टप्पा गाठला आहे; म्हणजे परदेशजन्य रुग्णांशी किंवा त्यांच्या घनिष्ट संपर्कातील व्यक्तींशी काहीही संबंध नसलेल्यांना ‘कोविड-१९’ची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

भाष्य : शक्ती सामूहिक प्रतिकाराची

‘समूह-संरक्षण’ म्हणजे केवळ त्या समूहाचा भाग असल्याने मिळणारे आणि रक्तात प्रतिपिंडे, अँटिबॉडीज तयार न होताही मिळणारे संरक्षण. मात्र केवळ तेवढ्यावर भिस्त न ठेवता ‘कोरोना’ची साथ आटोक्‍यात ठेवण्याचे सर्व प्रयत्न चालूच ठेवावे लागतील.

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाढत चाललेल्या ‘कोविड-१९’च्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन लांबवणे हा उपाय आहे, असा काहींचा समज आहे. या साथीबाबतचे विज्ञान पाहिल्यास तो योग्य आहे काय, हे समजेल. आता या साथीने अनेक ठिकाणी ‘समूह-प्रसारा’चा टप्पा गाठला आहे; म्हणजे परदेशजन्य रुग्णांशी किंवा त्यांच्या घनिष्ट संपर्कातील व्यक्तींशी काहीही संबंध नसलेल्यांना ‘कोविड-१९’ची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळे विशेषत: मोठ्या शहरांमध्ये आता रुग्णसंख्या काही काळ वेगाने वाढतच जाणार आहे. तसेच बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या हा आपल्या आरोग्य- व्यवस्थेच्या किंवा कोणत्याही पॅथीच्या कर्तबगारीचा निर्देशांक मानणे व्यर्थ आहे. कारण ‘कोविड- १९’चे विषाणू मारणारे औषध आज उपलब्ध नाही. इतर विषाणू-आजारांप्रमाणे बरे होणारे ‘कोविड-१९’चे रुग्ण निसर्गत:च बरे होतात. फक्त त्यातील ताप, खोकला इत्यादी लक्षणांवर, तसेच त्यातील गुंतागुंतीवर जीव वाचवणारे उपचार आहेत. हे लक्षात घेता गुंतागुंत झाल्याने रुग्णालयात दाखलझालेल्या विशे षत: वयस्कर रुग्णांपैकी किंवा इतर आजार असलेल्यांपैकी किती बरे झाले हा निकष वापरायला हवा.

लागण वाढतच जाणार आहे, याचा अर्थ असा नाही की आपल्यापैकी प्रत्येकाला लागण होईल. विज्ञान सांगते की कोणताही विषाणू एखाद्या मानवी समूहात नवा असताना त्याच्या विरोधात सुरुवातीला कोणामध्येच प्रतिकारशक्ती नसते. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी, गोवरविरोधी लस येण्याआधी, लहान मुलांमध्ये नेहमी गोवराची साथ येई. गोवरग्रस्त मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लहान मुलांना त्याची लागण होई. त्यांच्या शरीरात हे विषाणू वाढून त्यांच्या श्वासातून इतर मुलांना लागण होई. पण त्याचबरोबर लागण झालेल्या सर्वांच्या रक्तात या विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती म्हणजे प्रतिपिंडे निर्माण होत. साथीच्या प्रसारासोबत अशा ‘प्रतिकारक्षम’ मुलांची संख्या वाढत जाई. त्यामुळे या विषाणूंना दिवसेंदिवस ‘प्रतिकार-रहित’ मुले कमी कमी प्रमाणात सापडू लागत. माणसाच्या शरीराच्या बाहेर हे विषाणू फार वेळ जिवंत राहात नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या, प्रसार घटून ही साथ ओसरू लागे. कांजिण्याची साथ आली तर तेच होई. दहा वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूची साथ आली होती, तिचेही हेच झाले. आता स्वाईन फ्लूची तुरळक लागण व मृत्यू होतात. त्याप्रमाणेच ‘कोविड-१९’ची साथही काही महिन्यांमध्ये ओसरणार आहे.

मात्र ‘कोविड’ विषाणू फार वेगाने पसरतो व स्वाईन फ्लूच्या मानाने त्याचा मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे ही साथ आटोक्‍यात येणे स्वाईन फ्लूच्या मानाने अतिशय निकडीचे आहे.त्यासाठी लसीची भूमिका कळीची असेल . परिणामकारक आणि सुरक्षित लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश मिळेल आणि येत्या काही महिन्यांमध्ये परवडणा-या किंमतीला लस उपलब्ध होईल, अशी आशा करूया. मात्र तोपर्यंत आता बहुतेक भागांमध्ये ‘कोविड’ची साथ पसरत जाणे अटळ आहे. आपण आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे तिचा वेग कमी होईल एवढेच.

संशयित रुग्णांचा व त्यांच्या घनिष्ट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपासण्या, काही दिवस या रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्यावर गरजेनुसार कमी-जास्त उपचार, त्यांच्या घनिष्ट संपर्कात आलेल्यांचे अलगीकरण, त्यांचा पाठपुरावा ही पंचसूत्री सरकारला अधिक जोरदारपणे राबवावी लागेल. तसेच येते काही महिने नागरिकांनीही सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, वारंवार साबणाने हात धुणे इ. काळजी घेणे चालूच ठेवले पाहिजे.

त्यामुळे आपल्याला लागण होण्याची शक्‍यता कमी होईल; तसेच साथीचा वेग कमी व्हायलाही मदत होईल. येते काही महिने रुग्णसंख्या वाढतच जाणार आहे, याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकालालागण होईपर्यंत ही साथ चालूच राहील! भारतातील एक  ज्येष्ठ, साथ-रोगतज्ज्ञ डॉ. मुलीयील यांनी मांडले आहे, की भारतात शहरी व ग्रामीण भागातील अनुक्रमे ६० टक्के व ४० टक्के (सुमारे ६५ कोटी) लोकांना लागण होऊन त्यामुळे त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर ही साथ ओसरू लागेल. बाकीच्या लोकांना लागण न होताच ‘कोविड-१९’पासून संरक्षण मिळेल.

कारण ‘कोविड’-विरोधात समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ (समूह-संरक्षण) निर्माण होईल. ‘समूह-संरक्षण’ म्हणजे केवळ त्या समूहाचा भाग असल्याने मिळणारे, रक्तात प्रतिपिंडे, अँटिबॉडीज तयार न होताही मिळणारे संरक्षण. ही प्रक्रिया गोवर, कांजिण्या अशा आजारांबाबतही होते. ‘समूह-संरक्षण’वर भिस्त ठेवावी आणि आपण ‘कोविड-१९’ बाबतीत काही करू नये, असे अजिबात नाही. सरकारने वर उल्लेखिलेली पावले उचलायलाच हवीत.

विशेषत: ज्येष्ठ नागरिक, आणि त्याखालील वयाचे, पण मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लट्ठपणा इ.पैकी आजार असलेले यांनी वर उल्लेखलेली त्रिसूत्री जास्त कटाक्षाने पाळली पाहिजे. ‘कोविड-१९’मुळे होणारी गुंतागुंत आणि त्यातून जिवाला धोका होणे, याचे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असते. निदान ज्येष्ठांनी अगदी कुटुंबीयांपासूनही सहा फुटांचे अंतर ठेवावे. लहान घरात फार अवघड असले, तरी शक्‍यतो वेगळ्या खोलीत, व्हरांडा, बाल्कनी इथे निरनिराळ्या कुटुंबीयांनी वावरावे. गरजेप्रमाणे घरातही मास्कचा वापर करावा. भारतात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण फक्त ८.५ टक्के  आहे. साठीच्या खालचे; पण मधुमेह, उच्च रक्तदाब इ. असणारे यांचे प्रमाण सुमारे २०-३० टक्के आहे.

भारतात ‘समूह-संरक्षण’ ही अवस्था येईपर्यंत येते काही महिने या एकूण ३०-४० टक्के लोकांना लागणीपासून जपले तर ‘कोविड’च्या गंभीर रुग्णांची संख्या बरीच घटवता येईल. मात्र जिथे साथीने सर्वसाधारण ‘कम्युनिटी स्प्रेड’चा टप्पा गाठला आहे, अशा सर्व भागांमध्ये विशेषत: मोठ्या शहरांमध्ये आपण ‘समूह-संरक्षण’ची अवस्था गाठेपर्यंत, काही महिने लागण वाढतच जाईल. माझ्या मते ग्रीन झोनमध्ये ‘केरळ मॉडेल’चा तातडीने वापर करून साथ काही काळ रोखता येईल. तसेच लवकर लस उपलब्ध होऊन असंरक्षित जनतेला मोठ्या प्रमाणावर भारतभर टोचली तर सगळीकडे ‘समूह-संरक्षण’ची अवस्था लवकर येऊन साथ लवकर ओसरेल.

या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाउनकडे कसे पाहायचे? वर उल्लेखिलेली सरकारांनी पाळायची पंचसूत्री व नागरिकांनी पाळायची त्रिसूत्री वेळेवर, पुरेशा जोरकसपणे राबवलेल्या ठिकाणी (तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इ.) साथ आटोक्‍यात आली. त्याबाबत केरळ वगळता भारतात खूपच कमतरता राहिल्याने देशव्यापी, संपूर्ण लॉकडाउनचा टोकाचा मार्ग वापरला गेला. ज्यांना अलग ठेवायला हवे त्या सर्वाना नेमकेपणाने शोधता न आल्याने सर्वच जनतेला लॉकडाउन केले गेले! युद्धात ‘कार्पेट बॉम्बिंग’ करतात तसे.

लॉकडाउनने सामाजिक चलनवलन घातल्याने रुग्णसंख्या तात्पुरती कमी झाली; पण फार मोठी सामाजिक किंमत देऊन. रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोक हुडकणे हा गाभाच कच्चा राहिल्याने लॉकडाउन उठवल्यावर रुग्णसंख्या वेगाने वाढेल. त्यातील गंभीर रुग्णांना उपचार देण्यासाठी पुरेशी तयारी लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात केली काय, याचे उत्तर येत्या काही महिन्यांमध्ये मिळेल. लॉकडाउन वाढवायचा नाही, तर काय करायचे, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.