भाष्य : घरातच; पण `ड` जीवनसत्त्वासह

डाॅ. अनिल लचके
मंगळवार, 31 मार्च 2020

संकटाचा प्रतिकार कसा करायचा, याचा आधीच विचार करून ठेवावा, हे बरोबरच आहे; पण काही संकटे अचानक कोसळतात. कोरोनापासून वाचण्यासाठी घरात बसणे आवश्यक आहेच; परंतु त्या स्थितीत शरीराला आवश्यक असलेला सूर्यप्रकाश मिळेल मिळेल काय? ‘ड’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी योग्य आहाराबरोबरच सूर्यप्रकाशाची गरज आहे.

संकटाचा प्रतिकार कसा करायचा, याचा आधीच विचार करून ठेवावा, हे बरोबरच आहे; पण काही संकटे अचानक कोसळतात. कोरोनापासून वाचण्यासाठी घरात बसणे आवश्यक आहेच; परंतु त्या स्थितीत शरीराला आवश्यक असलेला सूर्यप्रकाश मिळेल मिळेल काय? ‘ड’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी योग्य आहाराबरोबरच सूर्यप्रकाशाची गरज आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका संस्कृत श्लोकात एक मननीय विचार मांडलाय -
‘चिंतनीया हि विपदामादानेव प्रतिक्रिया,
न कूपखननम् युक्तम् प्रदीप्ते वह्निनी गृह’.

संकटाचा प्रतिकार कसा करायचा, याचा आधीच विचार करून ठेवावा. घर आगीने पेटल्यावर विहीर खणायला लागणे योग्य नाही. विचार उत्तम आहे, पण कधी कधी संकटे विलक्षण रूपे घेऊन समोर उभी ठाकतात. कोविड-१९ सारखा (कोरोना व्हायरस डिसीज-१९) प्राणघातक विषाणू अचानक महामारीचं संकट निर्माण करून जगाला वेठीस धरू शकतो. या प्राणघातक विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात यायचे नाही. अशा रीतीने संसर्ग टाळता आला तरी प्रत्यक्षात ते १०० टक्के जमेलच, असंही नाही. शिवाय, काही व्यक्ती कोविड-१९ मुळे आजारी पडलेल्या नसतात, पण ते विषाणू-धारक, म्हणजे ‘कॅरिअर’ असतात. त्यांच्या संपर्कामुळेदेखील एखादी निरोगी व्यक्ती नाहक आजारी पडू शकते.

सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या काही रोगांसाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) किंवा इम्युनायझेशन शक्य असतं. तथापि, कोविड-१९साठी अजून लस उपलब्ध नाही.
अनोळखी आणि भयानक अशा कोविड-१९ या विषाणूचा बीमोड केलाच पाहिजे.

त्यामुळे कोविड-१९ रोगावर संभाव्य औषधं शोधण्यासाठी जगभरचे संशोधक सतर्क झाले आहेत. एखाद्या व्याधीवर कोणते रसायन रामबाण ठरू शकेल, ते सुचवणारी सॉफ्टवेअर उपलब्ध असतात. त्याचा आधार घेऊन अशा रसायनाची त्रिमितीयुक्त संरचना कशी असेल, किंवा कशी असावी, याचा अंदाज संशोधकांना येतो. त्या रसायनांचा मागोवा घेतला जातो. सध्या काही ना काही तरी (औषध) उपचार उपलब्ध असले, तरी अजून हमखास औषधं हाती लागलेली नाहीत. साहाजिकच कोविड-१९ विषाणूधारक किंवा विषाणूग्रस्त रुग्णांचा संसर्ग होऊ नये, म्हणून २१ दिवस घर सोडायचे नाही, असे देशोदेशीचे जाणकार तज्ज्ञ सुचवतात. पंतप्रधानांनीदेखील हाच उपाय सुचवलेला आहे. करोना म्हणजे ‘कोई रोड पर ना निकले’! असं केलं तर विषाणूची साखळी तुटून कोविड-१९ ची साथ रोखून धरली जाईल. प्राणहानीवर नियंत्रण येईल. यासाठी गर्दी टाळायला हवी. म्हणून जिथं शक्य आहे, तिथं इंटरनेट आणि संपर्क साधनांचा उपयोग करून ‘वर्क फ्रॉम होम’ची कल्पना अंमलात आणायची.

तेव्हा मनामध्ये विचार आला की, आपण घरातच बसलो तर संसर्गजन्य साथीचा प्रसार होणं टळेल, पण आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पुरेसा मिळेल का? कारण व्हिटॅमिन डी (जीवनसत्व ड) जगातील निदान ५० टक्के लोकांना पुरेसे मिळत नाही. यामध्ये आबालवृद्ध आहेत. व्हिटॅमिन डीचे डी-१ ते डी-५ असे पाच प्रकार आहेत. आपल्या आहारातील खाद्यान्नात मुळातच व्हिटॅमिन डीचे प्रमाण नाममात्र असते. हे एक कारण आहे. रक्ताचे (सीरमची) रासायनिक परीक्षण करून व्हिटॅमिन डीचे प्रमाण किती आहे ते कळतं. ते नॉर्मलपेक्षा कमी असेल तर या व्याधीला ‘हायपो-व्हिटॅमिनोसिस डी’ म्हटलं जातं. ज्यांना व्हिटॅमिन डी कमी मिळतं, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला होता. तेव्हा ते लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत, असं लक्षात आलं. परिणामी त्यांच्या त्वचेवर (अंगावर) आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश पडत नव्हता. व्हिटॅमिन डीची कमतरता पडू नये म्हणून आपल्या अंगावर थोडं तरी ऊन पडलं पाहिजे. सूर्यप्रकाशातच व्हिटॅमिन डी असतं, अशी बऱ्याच जणांची ठाम समजूत झालेली असते. खरं तर त्वचेवरील पेशीमध्ये कोलेस्टेरॉल वर्गीय रेणू असतात. त्यांना डीहायड्रो-कोलेस्टेरॉल (७-डीएचसी) म्हणतात. त्यांच्यावर सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट बी किरण (यूव्ही बी, अतिनील किरण) पडतात. त्या प्रकाश-लहरींची तरंग लांबी २८० ते ३२० नॅनोमीटर असते. या तरंग लांबीची ऊर्जा जेव्हा ७-डीएचसी रेणू ग्रहण करतो, तेव्हा त्यांचे रूपांतर कोलेकॅल्सिफेरॉल (व्हिटॅमिन डी-३) मध्ये होते.

कमतरता घातकच
लहान मुलांची सर्वांगीण वाढ चांगली व्हावी, त्यांची उंची वाढावी म्हणून व्हिटॅमिन-डी आहारात असायला पाहिजे. ‘रिकेट्स’ नावाची हाडांशी संबंधीत असलेली व्याधी बालकांमध्ये दिसून येते. त्यांची हाडं कमकुवत होऊन त्याला बाक येतो. त्याचं कारण त्यांना आहारातून व्हिटॅमिन डी कमी पडतं. त्याचा अनिष्ट परिणाम वयोवृद्धांच्या हाडांवर होतो. हाडांची घनता काही प्रमाणात कमी होऊन ती ठिसूळ होत जातात. कारण त्यांच्या शरीरात कॅल्शियमचं शोषण मंदपणे होतं. आपल्या सर्वांच्या आहारात कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त (झिंक), लोह, मॅग्नेशियम ही खनिज द्रव्ये असणं गरजेचं असतं. तथापि त्याचं शोषण आतड्यांमार्फत होतं. ते नीट व्हावं म्हणून व्हिटॅमिन डी आवश्यक असतं.
सूर्यप्रकाशातील अतिनीलकिरणांमुळे सेरॉटेनिन हे एक क्रियाशील रसायन तयार होते. ते मज्जातंतूंमार्फत मेंदूकडे आवश्यक ते संदेश पाठवण्याकरीता न्यूरोट्रान्समीटर म्हणून कार्य करते. सेरॉटेनिन हे एक हॉर्मोन आहे. याच्या अभावी भूक आणि झोप बरोबर लागत नाही. विस्मरण व्हायला लागते. कुठेच मूड लागत नाही. व्यक्तीच्या सर्वसामान्य वागणुकीत विपरीत बदल होतो. उदासीनतेमुळे तो त्रस्त होऊन त्याला सामाजिक भान राहात नाही. याला ‘सिझनल इफेक्टिव्ह डिसॉर्डर’ (सॅड) म्हणतात. आपल्या पचनसंस्थेतील इंद्रियांमध्ये सुमारे ८० ते ९० टक्के सेरॉटेनिन तयार होते. उरलेले १० ते २० टक्के मेंदूमध्ये तयार होते. तेवढे मेंदूमध्येच तयार होणं गरजेचं असतं.

सूर्यस्नान कसे करावे
प्रत्येक व्यक्तीने किती वेळ ‘सूर्यस्नान’ करावे? केव्हा करावे - असे प्रश्न मनात येतात. कारण उन्हाचा विपरीत परिणामही टाळायला पाहिजे. पृथ्वीवरील प्रत्येक अक्षांशावरती यूव्ही-बीचे प्रमाण बदलत जाते. तसेच ऋतू आणि प्रत्येक व्यक्तीचे वय, वर्ण, वजन, उंची आदी बाबी लक्षात घेऊन ‘सूर्यस्नाना’साठीचे तक्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्योदयानंतर दोन-तीन तास यूव्ही-बीचे प्रमाण चांगले असते. सर्वसाधारणपणे कोवळ्या उन्हात निदान १० ते १५ मिनिटे घालवली पाहिजेत.

घर बसल्या सज्जामध्ये, गच्चीवर किंवा घराच्या आवारात सूर्यप्रकाश अंगावर घेता येईल. मात्र खिडकीच्या कांचांमधून येणारा सूर्यप्रकाश उपयोगाचा नाही. कारण काच अतिनीलकिरण शोषून घेते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आहारातून व्हिटॅमिन डी मिळवावे. अनेक धान्यात, तेलात अतिसूक्ष्म प्रमाणात ते असते. दूध, संत्री, ओट, अंडी (बलक), मासे आणि मश्रुममध्ये बऱ्यापैकी व्हिटॅमिन डी आहे. प्रत्येक व्यक्तीला ४०० ते ८०० युनिट (१० ते २० मायक्रोग्रॅम) व्हिटॅमिन डीची गरज असते. व्हिटॅमिन डी जास्त पण होता कामा नये! थोडक्यात म्हणजे, वर्क फ्रॉम होम करताना आणि ‘डी’ फ्रॉम होम पण मिळवणं आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr anil lachake on d vitamin