भाष्य : दिशाभूल करणारा ‘संसर्ग’ रोखा

कोरोना संसर्गाची व्याप्ती काहीशी ओसरत असली, तरी तथ्यांचा विपर्यास, खोटी माहिती, गैरसमज यांच्या संसर्गाची लाट कायम आहे.
Coronavirus
CoronavirusSakal
Summary

कोरोना संसर्गाची व्याप्ती काहीशी ओसरत असली, तरी तथ्यांचा विपर्यास, खोटी माहिती, गैरसमज यांच्या संसर्गाची लाट कायम आहे.

कोरोनाची महासाथ हे वास्तव. तथापि, त्याबाबत पसरवलेल्या मिथकांमुळे गैरसमजाची लाट आली. तिने अनेकांच्या मानसिकतेवर, धारणांवर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावरही आघात केला.

कोरोना संसर्गाची व्याप्ती काहीशी ओसरत असली, तरी तथ्यांचा विपर्यास, खोटी माहिती, गैरसमज यांच्या संसर्गाची लाट कायम आहे. समाजमाध्यमांच्या व्यासपीठाने अशा प्रकारच्या गोष्टी वेगाने पसरतात. मात्र त्यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होते. अशा वास्तव आणि मिथकांवर दृष्टी टाकल्यावर हानीची व्याप्ती लक्षात येते. आरटीपीसीआर ही सर्वमान्य निदान पद्धत. त्याचे जनक नोबेल विजेते डॉ. केरी म्युलीस. त्यांच्या तोंडी घातलेले विधान, ‘‘या पद्धतीचा वापर विषाणू शोधण्यासाठी केला जाऊ नये. त्याचा दुरुपयोग होऊ नये.’ एवढेच नाही तर ‘ही पद्धत चुकीची आहे.’, असेही त्यांच्या नावावर खपवले गेले. खरे म्हणजे प्रा. लॉरीसन यांनी एचआयव्ही विषाणूबद्दल असे म्हटले होते, की ‘ही परीक्षा विषाणूच्या डीएनएची आहे, प्रत्यक्ष विषाणूची नाही. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत.’ मात्र ही चाचणीच नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आजमितीला बहुतेक चाचण्या अशा अप्रत्यक्ष पद्धतीचं वापरल्या जातात. आरटीपीसीआरद्वारे ३०० प्रकारचे रोग/व्याधींचे निदान होते. काही बाबतीत त्याशिवाय गत्यंतर नसते. या पद्धतीवरचा आणखी आक्षेप म्हणजे त्याने रोगाची तीव्रता कळत नाही. आताच्या रिअल टाइम पीसीआरने तीही ठरवता येते; ती सीटी परिमाणात मोजतात.

दुसरे मिथक म्हणजे, ही चाचणी २००३मध्ये चीनमध्ये सापडलेल्या सार्स-१ याच्या जनुकीय आराखड्यावर आधारित आहे. कोणत्याही प्रयोगशाळेत सार्स-२ वेगळा करून त्याचा आराखडा अभ्यासलेला नाही. त्यामुळे याच्यासारखे असत्य दुसरे नाही. जगातल्या अनेक प्रयोगशाळांतून कोविड रोग्यापासून हा विषाणू वेगळा करून त्याचा जनुकीय आराखडा संशोधनासाठी वापरला जातोय. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने (सीडीसी) गेल्या फेब्रुवारीत हा विषाणू शास्त्रीय संशोधनाला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. ‘फायझर’चे माजी उपाध्यक्ष आणि ॲलर्जी व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. मिचेल यांनी ‘कोविड महासाथ आता संपली असून, सर्व बंधने झुगारून द्यावीत’, असे आवाहन केल्याचे वाचले. हे संदर्भरहित वाक्य आहे. त्यांचे म्हणणे असे होते की, हळूहळू शरीरात कोविडविरोधी यंत्रणा आता सक्रिय होत आहे. त्यामुळे महासाथीचे साथीत रूपांतर होईल. ही गुंतागुंतीची यंत्रणा लसीकरणामुळे गतिमान होत आहे.

एन-९५ मास्कबाबतचे गैरसमज

मास्क वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. एन-९५ मास्क संरक्षण देतो, हे विदित आहे. असे असताना त्याबाबत संभ्रम निर्माण केले जातात. ‘विषाणूंचा आकार ६०-७० नॅनोमीटर असून, एन-९५ची छिद्रे १००-२०० नॅनोमीटर असल्याने त्याचा उपयोग नाही.’ सर्वसामान्य माणसाला सोयीस्कर वाटणारा हा एक अपप्रचार आहे. नो मास्क चळवळीची दृश्ये आपण पाहतोच. वस्तुस्थिती काय आहे? विषाणूचा आकार साधरणतः १०० नॅनोमीटर असतो आणि एन-९५ची गाळणी ३०० नॅनोमीटरपर्यंतचे सर्व कण गाळू शकते. म्हणजेच मास्क घालून ९५-९९% संरक्षण मिळते. याशिवाय, हा विषाणू सामान्यतः रोग्याच्या खोकल्यातून अगर शिंकेतून बाहेर पडणाऱ्या छोट्या द्रवबिंदूंतून पसरतो. या थेंबांचा आकार ५००० नॅनोमीटर असल्याने ते सहज गाळले जातात. म्हणूनच मास्कचा वापर हा विषाणूसंसर्ग टाळण्याचा प्राथमिक मार्ग आहे, हे निश्चित.

कोविड लशींमध्ये ग्राफिन हा कार्बनचा बहुरूप पदार्थ वापरला जातो, शिवाय अनेक विघातक पदार्थ आहेत, हे आणखी एक असत्य. प्रमाणीकरण प्रक्रियेत लस अनेक चाचण्यांतून जाते. त्यातून हे आरोग्य विघातक पदार्थ निसटणे मुश्कीलच. लस मुळीच विघातक नाही, हे त्यांच्या निर्मात्यांनीही जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) संचालक तेद्रॉस घेब्रेयेसूस यांनी १२ नोव्हेंबरच्या भाषणात वर्धक लस हा औषध कंपन्यांचा गैरव्यवहार आहे, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. वास्तव असे आहे की ते म्हणाले होते, ‘वर्धक मात्रा देण्याअगोदर गरीब देशातील जनतेला प्राथमिक लस प्राधान्याने द्यावी.’ पण ही वस्तुस्थिती जनतेसमोर आलीच नाही.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे औषधे आणि लशींना दिलेली मान्यता. असे आरोप होत आहेत की, औषध कंपन्यांच्या दबावाखाली अनेक उत्पादनांना घाईघाईत मान्यता देण्यात आली. रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. त्यामुळे थोडेसे विस्तृत विवेचन. सामान्यतः कोणतेही नवीन औषध बाजारात आणाण्यास १२-१५ वर्षे लागतात. चार-आठ हजार कोटींचा खर्च येतो. लाखो पदार्थांपासून सुरवात करून वेगवेगळ्या चाचण्यांच्या गाळणीतून एक पदार्थ मिळण्याची शक्यता असते. कोविड महासाथीची सुरवात साधारणतः जानेवारी-२०२० मध्ये झाली. कोविडसाठी तातडीने औषधे अशक्यच होते. त्यामुळे सुरवातीला हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन, टूडीजीसारखी वापरातील औषधे दिली गेली. जोडीला प्रतिकारशक्तीवर्धक गोळ्याही दिल्या.

सोबत नेहमीची काही अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स वगैरेही वापरले. त्याला शास्त्रीय आधार नव्हता. काळाची अपरिहार्यता जाणून इबोला, इन्फ्लुएन्झा या विषाणूवरील रेमडीसीवीर, फावीपिरावीर मोलुपीरावीर या औषधांच्या कोविडसाठी चाचण्या झाल्या. त्यात प्रामुख्याने त्याची गुणकरिता आणि जीवविषशास्त्राला प्राधान्य दिले. ती शरीराला अपायकारक नाहीत व कोविडवर गुणकारक आहेत. या कडक चाचण्यांतून गेल्यावर त्याला मान्यता मिळाली. नेहमीच्या औषध विकसन पद्धतीचा तो शॉर्टकटच होता. पण महासाथीची व्याप्ती आणि काळाची गरज म्हणून त्याला मान्यतेऐवजी आणीबाणी प्रसंगी वापराला मान्यता दिली. तेही रुग्णाची स्थितीत व किती मात्रेत वापरता येईल, या संबंधी नियमांच्या चौकटीतच. (प्रत्यक्षात त्याचा बेबंद वापर झाला, ही गोष्ट वेगळी). पण यात अवैज्ञानिक काही नव्हते. असे असताना, ही औषधे विषारी आहेत, त्याने कोविड वाढतो, अशा आशयाच्या हजारो पोस्ट रोज बरसू लागल्या.

लसउत्पादनाबाबत आपण उल्लेखनीय कामगिरी केली याचे कौतुक व्हायला हवे. एक-दीड वर्षात आपण दोन लशींचे उत्पादन सुरू केले. आता ती कोणाला द्यावी, त्याचे संरक्षण किती, याबद्दल वाद होऊ शकतील. पण लसीकरणाच्या वैज्ञानिक तंत्रालाच आव्हान देणे निंदनीयच. अनेक अशास्त्रीय गोष्टी शास्त्रीय वाटाव्यात म्हणून माननीयांच्या तोंडातून वदवून घेतल्या जातात. यात विज्ञानाशी प्रतारणा आहे हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य असूनही अशा पोस्ट का येतात समाजमाध्यमांवर? याला दोन-तीन कारणे आहेत. व्यापारीकरणाच्या चढाओढीत प्रतिस्पर्ध्यांच्या खच्चीकरणाचा मार्ग सोपा आहे. संभ्रम ही त्याची पहिली पायरी. दुसऱ्याचे उत्पादन, पद्धती निरुपयोगी कशा यावर विद्वत चर्चा घडवणे, पान-पानभर जाहिराती हे सर्रास चालते. याचा राजकीय वापरही आढळतो. कोविड महासाथ आणि औषधोपचार हे आपल्या जीवन पद्धतीवर, परंपरांवर आघात करणारे ठरले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा, सामाजिकतेचा ऱ्हास झाल्याची भावना काहींची झाली. त्यांनीही सोशल मीडियाचा आधार घेत हाकाटी पिटली. अशा रीतीने प्रसार करताना मूळ शास्त्रीय पायाचे भान ठेवले नाही. ही घोडचूक आहे. समाज माध्यमावरील आभासी चित्रालाच सत्य समजून नीरक्षीर विवेकबुद्धी हरपून प्रसार केला गेला. त्यामुळे विज्ञाननिष्ठ समाज या संकल्पनेलाच धक्का बसतो. समाजाचे अधःपतन होते. त्यापासून धडा घेऊन विज्ञानाची कास धरूनच प्रगतीचा संकल्प येत्या विज्ञान दिनी (ता.२८) करूया, तीच कोविडयोद्ध्यांना श्रद्धांजली ठरेल.

(लेखक ‘आयसर’च्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com