विद्यार्थ्यांचा आधार बनलेले कर्मयोगी

डॉ. अशोक मोडक
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

हजारो गरजू विद्यार्थ्यांना आधार देत त्यांचे आयुष्य घडविणारे अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेचा कार्यक्रम आज (ता. आठ) पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या ध्येयवादी आयुष्याचे हे प्रेरक स्मरण.

हजारो गरजू विद्यार्थ्यांना आधार देत त्यांचे आयुष्य घडविणारे अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेचा कार्यक्रम आज (ता. आठ) पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या ध्येयवादी आयुष्याचे हे प्रेरक स्मरण.

सत्तावन्न वर्षांपूर्वी (१९६२ मध्ये) एम.ए.च्या अभ्यासाकरिता वर्षभर मला पुण्यात राहावे लागले, तेव्हा अच्युतराव आपटे यांनी सुरू केलेल्या ‘विद्यार्थी सहायक समिती’च्या वसतिगृहात माझी निवासाची व भोजनाची सोय झाली. त्यावेळी अच्युतरावांचा कर्मयोग पाहता आला आणि त्यांच्या सहवासातून खूप काही शिकता आले.

ते ‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’मध्ये उच्च पदावर नोकरी करीत होते. त्याचवेळी आम्हा विद्यार्थ्यांच्या सुखसोयींकडे ते बारकाईने लक्ष देत. याचा एक उत्कट संस्कार आमच्यावर होत गेला. तो आम्हाला प्रेरणादायी वाटे. अच्युतरावांमुळे माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना निर्विघ्नपणे शिक्षण पूर्ण करता आले, हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. 

अच्युतरावांनी स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले होते. बेचाळीसच्या चळवळीत तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांची पुण्यात सोय व्हावी म्हणून त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. फ्रान्समधील मुक्कामात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुखसोयीसाठी सुरू झालेले उपक्रम पाहिले व भारतात परतल्यावर ‘विद्यार्थी सहायक समिती’ची स्थापना करून आणि या समितीच्या कार्यकक्षा विस्तारत नेऊन आपले आयुष्य त्यांनी सार्थकी लावले.

मार्गाधारे वर्तावे। विश्‍व हे मोहोरे लावावे। अलौकिक नोहावे लोकांमती।। असे संत ज्ञानेश्‍वर म्हणतात ‘योगी-विरागी व्यक्तींनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करावी, पुढच्या पिढ्यांची व सर्वांचीच उन्नती व्हावी म्हणून प्रयास करावेत. पण, असे प्रयास करताना ‘मी कोणी अलौकिक आहे’ असे समजू नये. इतरांनीही मला अलौकिक समजू नये. या भावनेतून सर्व वर्तन करावे,’ या आशयाचे ज्ञानेश्‍वर माउलींचे मार्गदर्शन अच्युतरावांनी सार्थ करून दाखविले. ज्या सहजतेने ते दिवसभर संशोधन, अध्ययन करायचे, त्याच सहजतेने ते वसतिगृहात स्वच्छता करायचे. म्हणता म्हणता investment in man, बालग्राम, फ्रान्स मित्र मंडळ हे व असे कैक उपक्रम त्यांनी पूर्णत्वाला नेले. त्यांनी बुवाजी, यादवराव कुळकर्णी, निर्मलाताई पुरंदरे, शांताबाई मालेगावकर असे सहकारी मिळवले आणि सार्वजनिक जीवनात अनामिकता आणि सामूहिकता या पैलूंची पूजा केली. यातून केवढी कामे करता येतात याचा वस्तुपाठ घालून दिला. 

सुभाषबाबूंच्या सैन्यात सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश राजवटीत फिरोजपूरच्या कारावासात राहून पुण्यात परतलेले व अच्युतरावांच्या स्नेहाखातर ‘विद्यार्थी सहायक समिती’साठी देणग्या गोळा करणारे गोपाळ वैद्य यांची अच्युतरावांनी वाचकांना ओळख करून दिली. कुणी नारायणराव स्वतःच्या पत्नीच्या उपचारासाठी फ्रान्समधल्या पवित्र जलाची अच्युतरावांकडे मागणी करतात व अच्युतराव धडपड करून फ्रान्समधून जलकुंभ मिळवतात.

नारायणरावांकडे तो पोचवितात आणि नारायणराव कृतज्ञतेपोटी दागिन्यांचे गाठोडे ‘विद्यार्थी सहायक समिती’साठी अच्युतरावांच्या स्वाधीन करतात. अच्युतराव स्वतःला अशा व्यक्तींचे ‘ऋणको’ मानतात. अच्युतरावांनी किती कष्ट करून संस्थेची पायाभरणी केली, संस्थेचे व विद्यार्थ्यांचे संगोपन केले, याचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतील.

अच्युतरावांच्या कर्मयोगी आयुष्याचा विचार करणाऱ्या कुणाही सुजाण माणसाला जाणवते, की ते विश्‍वस्त वृत्तीने राहिले. या ‘सार्वजनिक काकां’नी गांधीविचार अमलात आणला. अच्युतरावांनी केवळ स्वतःजवळच्या धनाचाच नव्हे, तर शक्तीचा आणि वेळेचादेखील विश्‍वस्त वृत्तीतून विनियोग केला. ‘‘सार्वजनिक जीवनात स्वतःविषयी विरक्त, तर इतरांविषयी मात्र अनुरुक्त राहा’’ या विचारांचे अनुसरण त्यांनी केले. त्यांनी स्वतःच्या फायद्याचा कधी विचार केला नाहीच; पण सहकाऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी वाहिली. फ्रान्स मित्र मंडळ स्थापण्यामागे त्यांचा हेतू उदात्त होता. युरोपात तेव्हा भारत म्हणजे अजागळ, कालबाह्य रूढींना, संकेतांना शिरोधार्य मानणारा देश असे समीकरण रुजवले जात होते. तेव्हा इथे येणाऱ्या फ्रेंच नागरिकांनी स्वतःच प्रचिती घ्यावी, इथले सौहार्द लुटावे व भारतवर्षाची योग्य प्रतिमा मनात बाळगून मायदेशी परतावे, हा होता अच्युतरावांचा उद्देश. 

गांधीजींचा वसा
गांधीजी अध्यात्मवादी होते. इथला एकेक जीव ईश्‍वरांशाने युक्त आहे आणि म्हणूनच माणसामाणसांत भेदभाव करायचा नाही, सगळ्यांविषयी जिव्हाळा बाळगायचा, कुणी दीनदुबळ्यांवर अन्याय केला, तर मात्र अशा दुष्ट व्यक्तीशी पूर्ण असहकार व प्रसंगी अहिंसक प्रतिकार करायचा ही होती गांधीजींची शिकवण. अच्युतरावांनी ही शिकवण शिरोधार्य मानली. कुणाही व्यक्तीवर दारिद्य्रामुळे ज्ञानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, अशा सद्‌हेतूने त्यांनी ‘विद्यार्थी सहायक समिती’ स्थापली. पुढच्या पिढ्यांवर चांगले संस्कार करायचे, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी करायची, त्यांना उत्तमातले उत्तम शिक्षण द्यायचे, व या विषयांवर पैसे खर्चताना त्यातून सुखी भविष्यासाठी गुंतवणूक होते असे मानायचे. म्हणून तर Investment in man हा उपक्रम त्यांनी सुरू केला. ‘बालग्राम’ या उपक्रमाचाही हाच हेतू होता. अल्प उत्पन्न गटातल्या छात्रवर्गासाठी सुरू केलेल्या वसतिगृहात व भोजनालयात कुणा कुबेराने स्वतःच्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून काही खटपट केली, तर मात्र कठोर मनाने अच्युतरावांनी त्याच्या मनोरथांना मोडता घातला. कैक सत्‌प्रवृत्त व्यक्तींना त्यांनी कार्यप्रवृत्त केले. त्यांनी ना कधी जातिभेद मानला, ना पक्षभेद. म्हणूनच ‘ज्ञान प्रबोधिनी’चे संस्थापक अप्पा पेंडसे आणि ‘स्वाध्याय’ चळवळीचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले अच्युतरावांचे जीवश्‍च कंठश्‍च स्नेही होते. ‘‘एकोऽहं, बहुस्याम्‌।’’ या मंत्राच्या प्रकाशात सतत विशाल व व्यापक व्हायचे, दीनदुबळ्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेतून कष्ट करीत राहायचे ही अध्यात्माची व्याख्या त्यांना शंभर टक्के मान्य होती. 

व्यक्तीचे चराचराशी जैव नाते आहे व म्हणून सुस्थित व्यक्तीने दुःस्थितीतल्या माणसाला स्वतःहून सर्वतोपरी मदत केली पाहिजे, हा भारतीय विचार. संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास अहवालातील ध्येयधोरणांतही हेच तत्त्व आढळते. अच्युतराव नेमके त्या ध्येयांसाठी जगले. साधेपणा, पारदर्शकता आणि त्याग म्हणजे काय, हे त्यांच्या जीवनावरून कळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या दशकात अच्युतरावांनी जी विविध कामे उभारली आणि त्यांच्या प्रकाशात व्रतस्थ बुद्धीने आपल्या आयुष्याला घाट दिला, ते उपक्रम त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात विश्‍वमान्य ठरले आहेत. एका अलौकिक कर्मयोग्याची साधना आज कैक जणांना सत्कर्माची प्रेरणा देत आहे.अच्युतरावांनी सुरू केलेली समाजहिताची विविध कामे निष्ठापूर्वक चालू ठेवणे; या कामांना खरा न्याय देणारी सत्शील माणसे मोठ्या संख्येने उभी करणे, हीच खरी गरज आहे व या मार्गानेच अच्युतरावांना अभिवादन करता येईल.
(लेखक नॅशनल रिसर्च प्रोफेसर आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr ashok modak