
‘कोविड-१९’च्या जागतिक आपत्तीमध्ये दृष्टिहीन दिव्यांग बांधवांच्या दृष्टीने सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. स्पर्श हाच जीवनाचा प्रमुख आधार असलेल्या दृष्टिहीन बांधवांना सुरक्षित मानवी संपर्क अंतर ठेवून पुढील अनिश्चित काळ जीवनशैलीमध्ये बदल करावा लागणार आहे. दृष्टिबाधित असल्यामुळे आधीच मर्यादा आहेत.
स्पर्श हाच जीवनाचा प्रमुख आधार असलेल्या दृष्टिहीन बांधवांना सुरक्षित मानवी संपर्क अंतर ठेवून पुढील काळात जीवनशैलीमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यांच्यासाठीच्या निवासी शाळांमध्येही त्यादृष्टीने बदल करावे लागतील.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘कोविड-१९’च्या जागतिक आपत्तीमध्ये दृष्टिहीन दिव्यांग बांधवांच्या दृष्टीने सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. स्पर्श हाच जीवनाचा प्रमुख आधार असलेल्या दृष्टिहीन बांधवांना सुरक्षित मानवी संपर्क अंतर ठेवून पुढील अनिश्चित काळ जीवनशैलीमध्ये बदल करावा लागणार आहे. दृष्टिबाधित असल्यामुळे आधीच मर्यादा आहेत. त्यात पुन्हा शारीरिक व सामाजिक अंतर ठेवून जीवनक्रम सुरळीत ठेवणे, दैनंदिन व्यवहारांमध्ये बदल करणे, हे मोठे आव्हान समोर आहे. दृष्टिबाधित निवासी शाळांनाही अडचणींना सामोरे जावे लागेल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाकडून नियमावली यायला हवी. ही सर्व माहिती ब्रेल लिपीत द्यावी. याशिवाय रेकॉर्ड केलेले संदेश, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, आरोग्य सेतू ॲप या विविध माध्यमांतून दृष्टिबाधित व्यक्तीपर्यंत पोचविले पाहिजेत. दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. Covid-१९ या संसर्गजन्य आपत्ती व्यवस्थापनात सामावून घेण्यासाठी समाज, शिक्षणसंस्था, पालक व विद्यार्थी यांनी याकडे समस्या म्हणून न पाहता संधी या दृष्टिकोनातून नवीन नियमावली अंगीकारायला हवी. यापुढे प्रत्येक गोष्टीचा नवीन आराखडा तयार करावा लागेल.
शाळांतील कार्यक्रमांची पुनर्रचना
वर्गामध्ये आठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याप्रमाणे व्यवस्था असली, तरी एकमेकांचे स्पर्श होऊ नये, यासाठी सतत संवाद साधून सुरक्षितता ठेवावी लागेल. ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा विचार केल्यास फक्त ऐकून माहिती संकलन करता येऊ शकेल. संकल्पना स्पष्ट होणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी वर्गात शिकविणे, विद्यार्थ्यांनी स्वतः लेखन-वाचन करणे आवश्यक असेल. स्पर्शाने वाचन करण्यासाठी पुस्तके, लेखन पाटी, कलम या शैक्षणिक साहित्याला जंतुविरहित करीत राहावे लागेल.
वैयक्तिक स्वच्छता
विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षितता, यासाठी प्राधान्यक्रम ठरवून द्यावा लागेल. दृष्टिबाधित व्यक्तींना काही विशिष्ट सवयी असतात. उदाहरणार्थ ः मान हलविणे, टाळ्या वाजविणे, डोळ्यांत बोट घालणे, चेहऱ्यावरून हात फिरवणे इत्यादी. या सवयी प्रयत्नपूर्वक बदलाव्या लागतील. सतत हातात हात घालून आधाराने दैनंदिन कामे करण्याची सवय असलेल्या विद्यार्थ्यांना एकट्याने सुरक्षित मानवी संपर्क अंतर ठेवून जीवन कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत.
सतत समुपदेशन व प्रशिक्षण
साथीच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांना सतत समुपदेशन या समाज कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. दृष्टिबाधित एकमेकांच्या आधाराने दैनंदिन कौशल्य पार पाडतात. सुरक्षित मानवी संपर्क अंतर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थी, काळजीवाहक यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. या क्षेत्रात सेवा देणाऱ्या दृष्टिबाधित कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक ठिकाणांमधील सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी स्क्रीन रीडरच्या साह्याने आवश्यक सूचना दिल्या जाव्यात.
प्रतिकारशक्ती वाढविणे
भोजन व्यवस्थेचा विचार केल्यास स्वयंपाकी कर्मचारी व सहायक यांना बरीच दक्षता घ्यावी लागेल. घरातून येताना घातलेले कपडे बदलावे लागतील. फळभाज्यांची स्वच्छता करावी लागेल. यापूर्वी भोजनाचे टोल पडल्यानंतर सर्व विद्यार्थी भोजन कक्षात येत असत. आत्ताच्या परिस्थितीत ठरावीक गट तयार करून भोजन नियोजन करावे लागेल. प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याकरिता सकस व पौष्टिक आहाराचे नियोजन आवश्यक आहे. शारीरिक कमतरतेमुळे आधीच या विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. ती वाढविण्यासाठी सकस आहारशास्त्रानुसार नियोजन करावे लागेल.
तांत्रिक बदलही हवेत
शैक्षणिक संकुलामध्ये रोजची हजेरी, प्रार्थना, बायोमेट्रिक हजेरी या नोंदी शासकीय नियमानुसार ठेवणे बंधनकारक असते. पुढील काही काळ तरी या सर्व गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. बायोमेट्रिक हजेरी स्पर्श व असुरक्षित मानवी संपर्क टाळण्यासाठी थांबवावी. प्रार्थना सामूहिक पद्धतीने न होता वर्गानुसार घेतल्यास सुरक्षितता राहील. बायोमेट्रिक हजेरीऐवजी अत्याधुनिक फेस रीडिंग स्वयंचलित उपकरणाचा पर्याय यापुढे ठेवावा लागेल.
(राजुस्कर कर्वे समाज संस्थेत प्राध्यापक, तर वाघमारे या अंध मुलींची शाळा येथे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)