esakal | पेपर विज्ञानाचा; सोडवतायत राजकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

सिक्कीम - ‘कोविड -१९’ रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय कर्मचारी.

संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा ‘कोरोना’ साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहेत. ते केले नाहीत तर ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ व्हायला वेळ लागणार नाही.

पेपर विज्ञानाचा; सोडवतायत राजकारणी

sakal_logo
By
डॉ. नानासाहेब थोरात

संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा ‘कोरोना’ साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहेत. ते केले नाहीत तर ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ व्हायला वेळ लागणार नाही.

जर्मनीमध्ये कोरोना विषाणू रुग्णांची संख्या एक लाख ७० हजारांच्या आसपास होती; त्यातील एक लाख ४० हजार बरे होऊन घरी गेलेत. फक्त वीस हजारांच्या आसपास रुग्णालयात आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सगळे जग ‘जर्मनी संपली आता’ असे म्हणत होते. अचानक असे काय झाले की जर्मनीने पुनरागमन केले? तैवान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क या देशांबद्दलही जगाचे हेच मत झाले होते. आज ते सर्वांच्या आधी ‘कोरोना’च्या चक्रव्यूहातून बाहेर पडतायत. कोण आहेत खरे हिरो?  नक्की काय केले या देशातील राज्यकर्त्यांनी?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जानेवारी २०२०. जगात जेव्हा फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कोरोना रुग्ण होते, तेव्हा सर्वांत आधी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी देशाला उद्देशून छोटे भाषण केले. या रोगाची व्याप्ती, सरकारच्या उपाययोजना, भविष्याचे नियोजन सांगितले आणि लोकांचे सहकार्य मागितले. रसायनशास्त्रात पीएच.डी. असणाऱ्या मर्केल, राजकारणात येण्याआधी दहा वर्षे संशोधन करीत होत्या. शास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यांनी कमी वेळेत ९९.९९ टक्के अचुकता असणाऱ्या ‘रॅपिड टेस्टिंग’ किटची निर्मिती केली. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ नये म्हणून डॉक्‍टर, शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांच्या सल्ल्याने योग्य वेळेला योग्य ठिकाणी लॉकडाउन केले. जानेवारीत साठ हजारांपेक्षा जास्त ‘आयसीयू’ बेड आणि व्हेंटिलेटर तयार ठेवले. त्यावेळी देशात एकही ‘कोरोना’चा रुग्ण नव्हता. विमानतळापासून रेल्वे स्थानकापर्यंत सर्वत्र चाचण्यांची व्यवस्था केली. इटली, स्पेनमधून आलेल्या जर्मन नागरिकांची ‘कोविड टॅक्‍सी’मार्फत घरी जाऊन चाचणी केली. देशात एक हजारपेक्षा जास्त विद्यापीठे आणि संशोधन संस्था आहेत.

कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये शास्त्रज्ञांना व्हीआयपी सेवा दिली जाते. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शंभरपेक्षा अधिक विद्यापीठांतील प्रयोगशाळांत टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून दिली. सर्व आरोग्य विद्यापीठांतील रुग्णालये रुग्णांसाठी राखीव ठेवली. दुर्दैवाने आपल्या देशातील फक्त दोन- तीन विद्यापीठे टेस्टिंग करतायत आणि उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात टेस्टिंग करणारे कर्मचारीच कोरोनाबाधित झाल्याने आठ दिवसांत टेस्टिंग लॅब बंद करण्याची वेळ आली.

न्यूझीलंडमध्ये पहिला रुग्ण सापडण्यापूर्वी एक महिना आधी टेस्टिंग सुरू केले. मार्चच्या सुरुवातीलाच सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरण सुरू केले. राज्यशास्त्रातील पदवीधर असणाऱ्या या देशाच्या महिला पंतप्रधानांनी देशातील डॉक्‍टर आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने नियोजन केले. फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसांत ५०००पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या दक्षिण कोरियात काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या १०,८०० वर आली आणि त्यातील ९,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. क्षेत्रफळाने बिहार राज्याएवढे आणि लोकसंख्येने बिहारच्या अर्धे असणाऱ्या कोरियात ३०० पेक्षा अधिक विद्यापीठे व संशोधन संस्था आहेत. कोरियन शास्त्रज्ञांनी आठ दिवसांत ९९.९० टक्के अचूकता असणारी आणि सहा तासांत रिपोर्ट देणारी टेस्टिंग किट शोधले. मोबाईल, क्रेडिट कार्ड, सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञान यांचा पुरेपूर वापर करून लॉकडाउन न करता या देशाने रुग्ण शोधून काढले. रुग्ण व त्यांचे स्थान शोधून काढणारे मोबाईल ॲप तयार केले. दक्षिण कोरियाने कोणतीही माहिती जगापासून लपवली नाही. त्या देशामुळेच चीनलासुद्धा त्यांची माहिती जगासमोर आणावी लागली.

एखाद्या देशाचा आरोग्यमंत्रीच डॉक्‍टर आणि शास्त्रज्ञ असेल, तर तो देश अशा कठीण परिस्थितीत जगासमोर कसा आदर्श निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तैवान. तैवानचे आरोग्यमंत्री शीह-चुंग चेन हे फक्त संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन करणारे डॉक्‍टेर नसून, या विषयातील शास्त्रज्ञही आहेत. देशात एकसुद्धा रुग्ण नसताना या देशाने चीन आणि इतर देशांतून येणारी विमानसेवा बंद केली होती. इतर देशांच्या परिस्थितीचा अभ्यास करून या देशाने कमीत कमी वेळ लॉकडाउन करून नियोजन केले.

लोकांचे आरोग्य हा राजकारण्यांचा विषय नाही आणि योग्य ठिकाणी योग्य लोक पाहिजेत, अशी मूलभूत संकल्पना अंगीकारणाऱ्या स्वीडनने लॉकडाउन न करता डॉक्‍टर व शास्त्रज्ञांच्या समन्वयातून रुग्णसंख्या आटोक्‍यात ठेवली. ‘प्रश्नपत्रिका विज्ञानाची; सोडवतायत राजकारणी’ असे इतर देशांत दिसणारे चित्र या देशांमध्ये नाही.

पंतप्रधानही रुग्णसेवेत
जपान, आइसलॅंड, डेन्मार्कनेही सरकारी यंत्रणा, डॉक्‍टर, शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा योग्य समन्वय साधला. या देशातील माध्यमांनी ‘ब्रेकिंग न्यूज‘च्या नावाखाली बातम्यांचा बाजार मांडला नाही, की पैशांसाठी लोकांच्या भावनेशी ते खेळले नाहीत. आमची माध्यमे जेव्हा कोरोना विषाणूची कुंडली आणि अंकशास्त्र काढण्यात मग्न होती, तेव्हा या देशांची माध्यमे संयमाने लोकांसोबत होती. देशावर संकट आलेय हे समजल्यावर ॲप्रन घालून हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणारे आयर्लंडचे पंतप्रधान किंवा स्वतःचे खासगी दवाखाने सरकारला देणारे स्पेनमधील डॉक्‍टर आणि आपल्या देशातील दरवाजे साध्या आजाराच्या रुग्णांनासुद्धा बंद करणारे डॉक्‍टर, यावरून आपली सामाजिक मानसिकता किती तकलादू आहे हे दिसते. आपल्याकडे सरकारी डॉक्‍टर आणि सरकारी यंत्रणा एकट्याने परिस्थितीशी झुंज देतेय; खासगी डॉक्‍टरांचा सहभाग नगण्य आहे. याउलट या सर्व देशांमध्ये खासगी यंत्रणा पूर्णपणे सरकारी यंत्रणेला मदत करतायत.

जर्मनीने तर शेजारच्या इटली, स्पेन, फ्रान्समधील कोरोना रुग्ण एअरलिफ्ट करून आपल्या देशातील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले आणि एक आदर्श निर्माण केला. आपण संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा अशा बिकट परिस्थितीत संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा ‘कोरोना‘च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ होईल.
(लेखक शास्त्रज्ञ आहेत.)

loading image