कोरोनाची अखेर नजरेच्या टप्प्यात?

Coronavirus
Coronavirus

कोरोनाची रुग्णांमध्ये सौम्य किंवा लक्षणेच न दिसणे, त्यावर मात करण्यासाठी त्यांच्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्‍ती यांच्यावरील संशोधनातून या आजाराचा शेवट जवळ येतोय, असे दिसतेय. मात्र, त्याला रोखण्यासाठीच्या कठोर उपाययोजनाही कठोरपणे पाळणे महत्वाचे आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णवाढीचा दर, अशा निर्देशांकाच्या भाषेत बोलायचे तर सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावलेला आणि मृत्यूदरही दिवसामागे घटत असला तरीही निव्वळ आकड्यांकडे पाहिले तर त्यामध्ये रोज मोठी वाढ दिसते. अशावेळी हा आजार नेमका केव्हा आटोक्‍यात येणार याबाबत ठाम सांगणे कठीण आहे. तथापि, त्याबाबतची जगभरातील संशोधने आणि निष्कर्ष आशादायी आणि या आजाराचा शेवट जवळ आल्याकडे निर्देश करणारे आहेत.

टी सेल इम्युनिटी
स्टॉकहोममधील ‘सेंटर फॉर इन्फेक्‍शियस मेडिसिन’च्या (स्वीडन) शास्त्रज्ञांचे संशोधन महत्त्वाचे आहे. लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणांच्या कोरोना रुग्णांमध्ये प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाच्या सौम्य संसर्गाच्या आजारापासून ॲन्टीबॉडी स्वरुपातील प्रतिकारशक्तीच न मिळाल्याने पुन्हा संसर्ग झाला तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही, असा काहींचा समज होता.

‘स्मरण पेशी’चे कार्य
या संशोधनात दोन गोष्टी समोर आल्या. ज्या व्यक्तींना मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात, त्यांच्यामध्ये आणि ज्या व्यक्ती लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे दाखवतात, अशा दोन्ही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, हे कळले. इम्युनिटी व्यवस्थेत ‘बी’ आणि ‘टी’ अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. मध्यम ते तीव्र लक्षणांच्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी संस्थेतील ‘बी सेल’ क्रियाशील होऊन अँटीबॉडीची निर्मिती होते. मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची लक्षणे नसतात किंवा सौम्य असतात अशांमध्ये ‘टी सेल’ क्रियाशील होऊन ‘सायटोटॉक्‍सिक’ म्हणजे पेशी नष्ट करणाऱ्या ‘टी’ प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. ज्या पेशींना विषाणूंची बाधा झाली, त्यांना विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याचे काम ‘टी सेल’ करतात.

याला ‘प्रोग्रॅम्ड सेल डेथ’ म्हणजे ‘नियोजनपूर्वक पेशीनाश’ म्हणतात. यात विशिष्ट विकर (इंझाईम) सायटोटॉक्‍सिक सेलमधून बाहेर पडतात आणि ते संसर्गग्रस्त पेशीमध्ये जाऊन तिला छिद्रे पाडतात. इतर रसायनांच्या मदतीने तिचा मृत्यू घडवतात. यामुळे ज्या पेशींना बाधा आहे, त्याच विषाणूसह नष्ट झाल्याने शरीरामध्ये विषाणूंचा फैलाव रोखला जातो. त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नाहीत, या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष रोगाची तीव्रता अत्यंत कमी होत असली तरी प्रतिपिंडे तयार होत वाहीत. त्यामुळे अशा सौम्य लक्षणांच्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळत नाहीत. तथापि, या ‘टी सेल’नंतर ‘मेमरी सेल’ कार्यान्वित करतात. त्यांना ‘स्मरण पेशी’देखील म्हणू शकतो. या ‘मेमरी सेल’ प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत.

या व्यक्तींमध्ये जेव्हा हाच विषाणू दुसऱ्यांदा प्रवेशतो, तेव्हा संपूर्ण इम्युनिटी व्यवस्था क्रियाशील होते. त्याचा मुकाबला करते. त्यामुळे विषाणूचा फेरसंसर्ग टळतो. याचा अर्थ आज ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे सौम्य आहेत किंवा नाहीतच त्यांच्या रक्तामध्ये जरी या आजाराच्या अँटीबॉडीज आढळल्या तरी त्यांच्या शरीरात मेमरी सेलच्या रुपाने प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती पुन्हा होऊ शकणाऱ्या संसर्गाला तोंड देण्यासाठी पुरेशा समर्थ असते. नव्या संशोधनाचे हे निष्कर्ष महत्त्वाचे. आज जे कोरोनाबाधित आढळताहेत, त्यातील ७० टक्‍क्‍यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा असतीलच तर ती सौम्य आहेत. याचा अर्थ सर्व रुग्णांमध्ये सायटोटॉक्‍सिक टी सेलच्या मार्गाने प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली असून, त्यांच्या शरीरात ‘मेमरी सेल‘ तयार झाल्यात. 

प्रतिकारशक्ती किती टिकेल? 
आजारानंतरच्या प्रतिकारशक्‍तीबाबत आणखी संशोधन ‘वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या इम्युनॉलॉजी’ विभागाने केलंय. ज्या प्रकारे सार्स या कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रतिकारशक्ती सुमारे तीन वर्षापर्यंत टिकते. त्याच प्रकारे कोरोनामुळे मिळणारी प्रतिकारशक्तीही तितक्‍याच दीर्घकाळ टिकू शकते, अशी मांडणी या शास्त्रज्ञांनी केली आहे. जर ही प्रतिकारशक्ती दोन-तीन वर्ष टिकणारी असेल तर त्याद्वारे निर्माण होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचा (समूह प्रतिकारशक्ती) लाभ कोरोनाप्रसाराचा वेग रोखण्यास होऊ शकतो.

एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तरी, कुटुंबातील ८० ते ९० टक्के व्यक्तींना त्याचा संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष जगातील संशोधनाच्या अभ्यासाअंती गांधीनगरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’चे संचालक डॉ. दिलीप मावळणकर यांच्या पथकाने काढलाय. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या ‘क्वार्टरली रिव्ह्यू ऑफ मेडिसिन’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय.

विभागलेपण पथ्यावर
हे संशोधन समोर येत असतानाच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील न्यूरोसायंटिस्ट कार्ल फ्रिस्टन यांनी प्रतिकारशक्तीतील ‘डार्क मॅटर’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते कोणत्याही देशातील सर्वच लोकांना कोरोनासारखा आजार होतो, असे गृहीत धरून रुग्णसंख्येचे अंदाज मांडतो.

परंतु वास्तव वेगळे असते. सर्वच लोक नवा आजार व्हावा इतके दुबळे नसतात. दोन मुख्य कारणांमुळे एखादा आजार काही व्यक्तींना होण्याची शक्‍यता कमी असते. एक म्हणजे कोरोनासारख्या इतर विषाणूजन्य आजारामुळे किंवा इतर आजार पूर्वी झाल्यामुळे ज्यांना प्रतिकारशक्ती मिळालेली आहे, अशांना तो होण्याची शक्‍यता कमी असते. कोरोनासारख्या आजाराचा प्रसार पाहताना आपण जणू काही समाजातील प्रत्येकाला प्रत्येकजण भेटणार, अशा पद्धतीने विचार करतो. परंतु समाज हा अनेकदा रेल्वेच्या डब्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विभागलेला असतो. परस्परांपासून विलग असतो. भौगोलिक स्थिती, जात, वर्ग, लिंग, वय अशा कारणांमुळे हे विलगीकरण होते. 

धोका २५ टक्‍क्‍यांनाच
कार्ल फ्रिस्टनच्या मते, समाजातील २५ टक्‍क्‍यांना नवीन आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती असू शकते, तर सुमारे ५० टक्के लोकसंख्या वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक अलगीकरणामध्ये असते. त्यामुळे आजार होण्याची शक्‍यता समाजातील २५ टक्‍क्‍यांनाच असते. देश-काल परिस्थितीनुसार प्रत्येक समाजातील इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटरचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.

कोरोनाविरुद्ध एखाद्या समाजात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजेच समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरता त्या समाजातील किमान ६० ते ७० टक्‍क्‍यांमध्ये आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती आवश्‍यक आहे, असे साथरोग शास्त्रज्ञ मानतात. तथापि कार्ल फ्रिस्टन यांची ही डार्क मॅटर थिअरी लक्षात घेता, आजाराची लागण होण्याची शक्‍यता पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांना असल्याने खूप कमी प्रमाणात लोकांना लागण होऊनही त्या समाजामध्ये हर्ड इम्युनिटीचे परिणाम दिसू लागतात. आपल्याकडे अहमदाबाद, दिल्ली, मुंबई या ठिकाणी कोरोनाच्या प्रसाराचा मंदावलेला वेग त्याचेच निदर्शक आहे. एकंदरीतच  कोरोनाचा शेवट आता नजरेच्या टप्प्यात आहे. अर्थात काही महिन्यातच त्याच्या केसेस शून्यावर येतील, असे नाही. तो टाळण्यासाठीच्या खबरदारीचा विसर पडू देणे योग्य नव्हे. उलट, जबाबदारीने आणि काळजीपूर्वक पावले टाकणेच महत्वाचे आहे.

(लेखक ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमा’चे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com