अग्रलेख : पोशिंद्यास बळ द्या!

Flood
Flood

‘या नभाने या भुईला दान द्यावे...’ या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या या कवितेच्या ओळी एरव्ही मनाला मोहवणाऱ्या. संपन्नतेची, चैतन्याची साक्ष देणाऱ्या; मात्र सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे चैतन्यच लुप्त झाले आहे. येथे बरसलेल्या मुसळधार पावसाने जोंधळ्याला लगडू पाहणारे सारे चांदणे हिरावून घेतल्याने शेतांमधून काळाकुट्ट अंधार पसरला आहे.

एरव्ही दिसणारे हिरवेकंच वैभव लयाला गेले आहे. शेतीवाडीची पुरती रया गेली आहे. शेतकऱ्यांचे अश्रू थिजलेत. मनात कढ दाटला आहे. काळ्या मातीचे ऐश्‍वर्य वाहून जाताना पाहणे त्यांच्या नशिबी आले आहे. अनेक प्रश्‍न त्याच्यासमोर आ वासून उभे राहिले आहेत. उभे पीक पाण्यात शेवटच्या घटका मोजत आहे. उगवलेले कोंब कुजून गेलेत. पशुधन वाहून गेले आहे. हे कमी म्हणून की काय राहती घरे पाण्यात गेलीत. घरातील धान्याची नासाडी झालीय. कपडे, जीवनोपयोगी साहित्य सगळ्या-सगळ्याला पाण्याने कवेत घेतल्याने हाताशी काहीच राहिले नाही. ‘जगायचं कसं? उभारायचं कसं? लढायचं कुठपर्यंत?’ या प्रश्‍नांच्या भोवऱ्यात बळिराजा पुरता गुरफटला गेलाय. आपल्याकडचा शेतीव्यवसाय कसा सर्व बाजूंनी अनिश्‍चिततेचा सामना करतो आहे, याचा विदारक प्रत्यय यंदा पुन्हा आला. एकीकडे पुराने शेतीचे नुकसान केले, तर तिकडे विदर्भ, मराठवाड्यात पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिलेल्या ओढीमुळे शेती उत्पादनात पंधरा ते वीस टक्के घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

ज्या कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नदीकाठी सुजलाम, सुफलाम शेती होते, तोच काठ पंधरा दिवसांतील पावसाने उद्‌ध्वस्त झाला आहे. महापुराने जनजीवन विस्कळित केलेच; पण सर्वांत मोठा घाव घातला तो पोशिंद्यावर. आज जेव्हा तो शेताच्या वाटेवर जातो आहे, तेव्हा त्याच्या नजरेला शेतात भरून राहिलेले पुराचे पाणी आणि त्यामध्ये बुडून मरणासन्न झालेले पीक दिसत आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात, केळी, हळद, भाजीपाला होत्याचा नव्हता झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे दोन लाख हेक्‍टरवरील पिके एक तर नष्ट झाली किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही जिल्ह्यांतील शेतीचे नुकसान अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. पुराने हातून जाणाऱ्या उसामुळे साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळपासाठी ऊस आणताना अवघड होणार असून, उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट होणार आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर कारखानदारांनाही बसणार आहे. वाहून गेलेल्या पशुधनाचे नुकसानही मोठे आहे. चाऱ्याच्या कमतरतेमुळे आहे ते पशुधन सांभाळणेही जिकिरीचे बनणार आहे. त्यातून दूध उत्पादन घटणार आहे. शेतकऱ्यांच्या हाती मिळणारा दुधाचा रोख पैसाही दुरापास्त होणार आहे. दूध संघांनाही त्याचा फटका बसेल. त्यातून शेतकऱ्याचे रोजचे अर्थकारण कोलमडणार आहे. शेतातील हक्काचा भाजीपालाही नसल्याने जेवणात तो नसेलच; पण त्यातून होणारी आर्थिक तजवीजही दुरावली आहे. सोसायट्या, बॅंकांतून घेतलेले कर्ज डोक्‍यावर तसेच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे झाले तरी हाती पैसा येण्यास कालावधी लागणार आहे. संसार पुन्हा उभा करताना मोठी शिकस्त करावी लागणार आहे. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे अशा आपत्तीच्या प्रसंगी राज्यातील सर्व जण मदतीला धावून येतात, सामाजिक संवेदनशीलता दाखवितात, हेही चित्र दिसले. ते आश्‍वासक आहे. एकोप्याची ही भावना आणि बदल घडविण्याची इच्छाशक्ती नेहमीच दाखविली गेली, तर समाजात कितीतरी चांगले बदल घडविता येऊ शकतात. त्याने अस्मानी संकटातून होणाऱ्या हानीची तीव्रताही आपण कमी करू शकतो.

जलनियोजनापासून माफियांना रोखण्यापर्यंतच्या अनेक प्रश्‍नांची टांगती लक्तरेही पुराच्या पाण्याने आपल्या पुढ्यात आणली आहेत. आता प्रश्‍न आहे तो त्याचा सर्वंकष मुकाबला करण्याच्या निर्धार आणि कृतीचा.
निसर्ग कोपल्यामुळे या घडीला बळिराजा कोलमडलेला असला, तरी त्याच्यात पुन्हा उभे राहण्याची जिगर कायम आहे. फक्त त्याच्यात बळ भरण्याची आवश्‍यकता आहे. कागदी घोडे न नाचवता शासनव्यवस्थेने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने त्याचा मोबदला द्यावा. पशुधन खरेदीसाठी अनुदान द्यावे. दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे. कर्जफेडीसाठी मुदत द्यावी... प्रसंगी ते माफ करता येते का पाहावे. शेतीचे चक्र सुरळीत होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी.

एकीकडे मदतीचा हात दिला जात असतानाच भविष्यात असे संकट ओढवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची तजवीज आतापासूनच करावी. केवळ सरकारच नव्हे, तर समाजही खंबीरपणे या पोशिंद्याच्या मागे आहे, हे दाखवून द्यायला हवे. प्रत्यक्ष कृती व्हावी. झालेल्या चुका टाळाव्यात; अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होऊ शकते. सेवाभावी संस्था, संघटना, व्यक्ती, जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन

सामूहिकरीत्या पावले टाकावीत. पूररेषेतील बांधकामांबाबत कठोर निर्णय घ्यावा. राजकारण बाजूला ठेवून आपल्या पोशिंद्याला कणखरपणे उभे करण्यासाठी हात देण्याची ही वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com