भाष्य : आपत्तीग्रस्तांशी मानसमैत्री

कोल्हापूर - पुराची झळ बसलेल्या घरातील साहित्याकडे हताशपणे पाहणारा मुलगा.
कोल्हापूर - पुराची झळ बसलेल्या घरातील साहित्याकडे हताशपणे पाहणारा मुलगा.

जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांना मनोसामाजिक आधार  दिला जातो. तश्‍ाा यंत्रणा कार्यरत असतात. आपल्याकडेही तशा प्रयत्नांची गरज आहे. आपत्तीचे मनावर होणारे परिणाम आणि त्यांना कसा प्रतिसाद द्यावा, याविषयी सर्वांनी समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. 

महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला गेल्या दोन आठवड्यांत महापुराने झोडपले. लोकांची घरे, कपडे, पशुधन, शेती यांची मोठी हानी झाली आहे.

महाराष्ट्रातून, तसेच बाहेरूनदेखील मोठ्या प्रमाणात मदत या भागात येत असली, तरी पुरात उद्‌ध्वस्त झालेली आयुष्ये पूर्वपदावर यायला बराच मोठा कालावधी लागणार आहे. पुरामुळे भौतिक पातळीवर झालेली पडझड नजरेला दिसून येते आणि त्यामुळे त्याबाबतीत मदत करणे हेदेखील शक्‍य होते; पण पुरासारख्या आपत्तीमुळे मनावर होणारे परिणाम सहजासहजी दिसत नाहीत. जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनात लोकांना मनोसामाजिक आधार देण्याची यंत्रणा कार्यरत असते. आपल्याकडे मात्र अशी यंत्रणा जवळजवळ अस्तित्वात नाही, असे म्हटले तरी चालेल.

या पार्श्वभूमीवर आपत्तीमधून होणारे मानसिक परिणाम आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा, याविषयी समजून घेतले पाहिजे. कोणतीही धक्कादायक गोष्ट घडल्यानंतर मन एका ठराविक आवर्तनातून जाते. आपत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या लोकांतदेखील ती दिसून येतात. यातील पहिल्या टप्पा तीव्र धक्का बसल्याचा असतो. त्यात मनाला बधिरपण आल्यासारखे होते.

शरीराला जोरदार फटका बसल्यावर ज्याप्रमाणे होते, तशीच ही अवस्था असते. या टप्प्यामध्ये ‘हे काय झाले?’ ‘कसे झाले?’ ‘खरंच हे झाले आहे का?’ अशा अनेक प्रश्नांमधून माणसाचे मन जाते. झालेल्या गोष्टींविषयी अविश्वास वाटणे हे प्रामुख्याने या टप्प्यात घडते. ‘हा सगळा प्रसंग म्हणजे दुःखद स्वप्न तर नाही ना..’ अशी वाक्‍ये आपण या टप्प्यात असलेल्या व्यक्तीच्या तोंडी ऐकतो. दुसरा टप्पा राग येण्याचा. आपत्तीबाधित व्यक्तीला सभोवतालचा खूप राग येऊ लागतो. ‘ही आपत्ती माझ्याच वाट्याला का आली?’ हा प्रश्न त्या व्यक्तीला सतावू लागतो. मदत मिळण्यात आलेल्या अडचणी आणि काही ठिकाणी झालेली असंवेदनशीलता रागात भर घालते. तिसऱ्या टप्प्यात मानवी मन आशा-निराशेत दोलायमान होत राहते. मदतकार्य सुरू झाल्याने, आलेल्या चांगल्या अनुभवांमधून एका बाजूला भविष्याविषयी आशा वाटू लागते; तर झालेले नुकसान आणि समोरची आव्हाने यामुळे निराशा वाटते.

चौथा टप्पा असतो निराशा आणि अपेक्षाभंगाचा. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते तसा मदतकार्याचा वेग मंदावतो. बाकीचे लोक आपापल्या आयुष्यात व्यग्र होऊ लागतात आणि त्यामधून आपत्तीबाधितांना अपेक्षाभंगाची भावना ग्रासू लागते. शेवटचा टप्पा असतो परिस्थितीच्या स्वीकाराचा. त्यात ती व्यक्ती सर्व हानी स्वीकारून आपत्तीच्या मानसिक प्रभावामधून बाहेर पडून दैनंदिन जीवन जगू लागते. आपत्तीबाधित बहुतांश लोक या पाचही टप्प्यांमधून जातात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, तसेच पाळीव जनावरांच्या मृत्यूच्या शोकामधून ही प्रक्रिया आणखी त्रासदायक होऊ शकते. शेतीशी संबंधित पाळीव प्राणी हे शेतकरी कुटुंबातील घटक समजले जातात. कोल्हापूर-सांगलीमधील शेतीपट्ट्यात पुरात मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेले. त्यातून होणारे आर्थिक नुकसान हे तर आहेच; पण जिवाभावाचे सोबती गमावल्याचे दु:खदेखील समजून घ्यावे लागते. काही ठिकाणी गडबडीत दाव्याला बांधलेली जनावरे सोडायचे राहून गेल्यावर त्यांच्या मृत्यूला आपण कारणीभूत झालो अशी अपराधीपणाची भावनाही मनाला ग्रासून टाकू शकते.

आपत्तीला सामोरे जाणारे बहुतांश लोक हे या टप्प्यामधून स्वत:चे स्वत: मार्ग काढतात, हे खरे असले तरी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सहभागी असणारे स्वयंसेवक हे या मानवी मनाच्या अवस्थांविषयी जागरूक असतील तर त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपत्तीबाधितांना यामधून अधिक वेगाने आणि सकारात्मक भाव ठेवून बाहेर पडता येऊ शकते. पण साधारणतः तीस  टक्के आपत्तीबाधितांना आपत्तीच्या मानसिक परिणामांमधून लगेच बाहेर येणे कमी-अधिक प्रमाणात अवघड जाते. या मानसिक त्रासांच्या मध्ये मनात सातत्याने भीतीची भावना राहणे, चिंता आणि निराशेचे आजार या गोष्टी येतात. आपत्तीबाधित व्यक्ती ही वाढलेल्या ताण-तणावामुळे व्यसनाधीन होण्याची शक्‍यता वाढते.

ताण-तणाव सहन न झाल्याने काही वेळा स्वत:चे जीवन संपवावे, असे विचारदेखील लोकांच्या मनात येऊ शकतात. काही लोकांमध्ये आपत्तीचे प्रसंग ‘फ्लॅशबॅक’प्रमाणे परत परत नजरेसमोर तरळत राहतात. त्यामधून जिथे आपत्ती झाली त्या ठिकाणी परत कधीच जाऊ नये, अशी भावनाही काही लोकांच्या मनामध्ये जोर धरू लागते. खास करून लहान मुले, आधीच आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती, वृद्ध, अपंग, गरोदर आणि नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रिया यांना अधिक काळजीपूर्वक मानसिक आधार देण्याची गरज या प्रसंगात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्तांना मानसिक पातळीवर आधार देण्यासाठी यंत्रणा उभी करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तीन पातळ्यांवर ही यंत्रणा निर्माण करणे आवश्‍यक वाटते.

१) आपत्तीबाधित भागात मदतकार्य करणाऱ्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी आपत्तीचे मानसिक परिणाम आणि त्याबाबतीत करायची मदत याविषयी संवेदनशील असणे आणि शक्‍य झाल्यास त्याविषयी त्यांना तोंड ओळख होईल, असे प्रशिक्षण देता येऊ शकते. हे स्वयंसेवक जास्तीत जास्त आपत्तीबाधित लोकांपर्यंत पोचत असल्याने त्यांना आपत्तीच्या मानसिक परिणामांविषयी माहिती असेल तर त्याचा उपयोग मोठ्या जनतेला होऊ शकतो.

२) आपत्तीबाधित जनतेला मानसिक आधार देण्यासाठी वेगळे प्रयत्न करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना मानसमित्र/मैत्रीण म्हणूनही काम करता येऊ शकते. यामध्ये त्या भागातील स्थानिक रहिवासी असलेल्या आणि या प्रकारचे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला सहभागी होता येते. अशी मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मानसमैत्री विभाग आणि परिवर्तन स्थानिक संस्थांच्या मदतीने सुरू करीत आहे. या मानसमित्रांना भावनिकदृष्ट्या व्यक्तीला भावनिक प्रथमोपचार कसे देता येतात याविषयी चार तासांचे प्रशिक्षण देऊन भावनिक प्रथमोपचार आणि मनोसामाजिक आधाराची यंत्रणा उभी करणे हे त्या मागचे सूत्र आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ‘आशा’सेविका, अंगणवाडीसेविका, तसेच शिक्षक, जागरूक नागरिक, प्रशासनामधील व्यक्ती यामधील कोणीही अशा उपक्रमात सहभागी होऊ शकतो. 

३) या सगळ्याच्या पलीकडे ज्यांना तीव्र स्वरूपाचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत मिळवून देणे हेदेखील करता येऊ शकते. सांगली, कोल्हापूरमधील मानसतज्ज्ञांनी याविषयी पुढाकार घेऊन कामदेखील चालू केले आहे. काही वेळा आपत्तीमधून झालेल्या हानीच्या दर्शनामुळे मदत करणाऱ्या व्यक्तींनादेखील सातत्याने त्याच परिस्थितीशी सामोरे जाऊन अस्वस्थता येऊ शकते. ती कशी हाताळायची याविषयीदेखील आपण सजग होऊ शकतो. मानसमित्रांनी काही छोटी-छोटी पथ्ये पाळणे हे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्याला शक्‍य नसेल त्या गोष्टीची आश्वासने न देणे, कमी बोलणे आणि जास्त निरीक्षण करणे व ऐकणे, तसेच शब्दांपेक्षा आश्वासक स्पर्श अनेक वेळा अशा परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो हे लक्षात ठेवणे, वेदानादायी आठवणी कोणी बोलू इच्छित नसेल तर मुद्दामहून त्याला परत-परत त्याविषयी उद्युक्त करणे टाळणे हे आपण करू शकतो. यातील अनेक गोष्टी गप्पांच्या स्वरूपात आणि अनौपचारिक चर्चांमध्येही करता येतात.

आपत्तीबाधित लोकांशी मानसमैत्री करणे आणि त्या आधारे त्यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी मदत करणे हेदेखील आपत्ती व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे अंग आहे हे समजून घेऊन त्या दिशेनेही आपण प्रयत्नशील राहायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com