भाष्य : वाहिन्यांचा व्हायरल विळखा

Corona-Channel
Corona-Channel

‘कोरोना’सारख्या देशव्यापी साथीच्या रोगाच्या वेळी बातम्या देताना वृत्तवाहिन्यांनी नेहमीच्या पठडीतून बाहेर यायला हवे. बातमीचा आशय नि सादरीकरणातून अशा गंभीर परिस्थितीत आपण काय विधायक भर घालत आहोत, हे वस्तुनिष्ठपणे पाहून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.

एका विद्यापीठात ‘आपत्कालीन काळातील संज्ञापन’ (क्रायसिस मॅनेजमेंट ) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत नुकताच मी सहभागी झालो होतो. युद्धजन्य परिस्थिती, हिमवादळे, पूर अशा परिस्थितीत प्रसारमाध्यमांनी कशी भूमिका बजवावी यावर तीत बरेच मंथन झाले. २००९मध्ये आलेल्या ‘स्वाईन फ्लू’च्या वेळी माध्यमांचे योगदान यावरही चर्चा झाली. त्यावेळी भारतात १८३३ मृत्यू झाले होते. पण अशा प्रकारच्या साथींचे वृत्तांकन करण्याचा माध्यमांना पूर्वानुभव नसल्यामुळे त्यांच्या प्रसारणातील विस्कळितपणा क्षम्य होता. आज ते आठवण्याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा हा साथीचा रोग अधिक शक्तिमान होऊन आपल्या पुढ्यात उभा ठाकला आहे.आज ‘वॉशिंग्टन पोस्ट’पासून ते तालुका दैनिकापर्यंत आणि ‘अल-जझीरा’पासून ते स्थानिक केबल वाहिनीपर्यंत सर्वाना पुरून उरलेला कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत बातमीपत्राचा तोंडावळा आणि आराखडा नेमका कसा असायला हवा, याबाबत आजही ही माध्यमे गोंधळलेली दिसतात.

शेजारच्या वाहिनीवर काय सुरू आहे ते आपल्याकडे दिसले पाहिजे या हट्टापोटी कोणी काही फारसे नवे प्रयोग करताना दिसत नाही. पण एवढे मात्र नक्की, की या सर्व वाहिन्या आपापल्या परीने याविषयीची इत्थंभूत माहिती अहोरात्र गोळा करत आहेत. बातमीदार जीव धोक्‍यात घालून ‘कोरोना’विषयी घडणाऱ्या घटनांची माहिती घेत आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून प्रेक्षकांना जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती कशी मिळेल याची पराकाष्ठा करत आहेत. डॉक्‍टर, नर्स, पोलिस व प्रशासकीय यंत्रणा यांच्या जीव तोडून काम करण्याच्या प्रेरक बातम्याही प्राधान्याने देत आहेत. पण हे करत असताना अशा देशव्यापी साथीच्या रोगाच्या वेळी बातम्या देताना नेहमीच्या पठडीतून त्यांनी बाहेर यायला हवे. प्रत्येक बातमी ‘व्हायरल’ झाली पाहिजे हा अट्टाहास माध्यमांनी सोडायला हवा.

एक बातमी दिवसातून किती वेळा सांगायची, किती वेळ दाखवायची, किती गांभीर्याने सांगायची याचे वृत्तवाहिन्यांचे गणित कायमच अतार्किक असल्याचे आपण पाहतो. पण अशा कठीण समयी हे प्रमाण ठरवायला हवे. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ सरकारी यंत्रणेकडूनच अपेक्षित नाही, तर प्रसारमाध्यमांनीही याची गांभीर्याने नोंद घेत, असे व्यवस्थापन वाहिनीवरील वृत्तांकनात करायला हवे.

बातमीच्या आशयातून, सादरीकरणातून अशा गंभीर परिस्थितीत आपण काय विधायक भर घालत आहोत, हे वस्तुनिष्ठपणे पाहून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम याला वाहिन्यांनी प्राधान्य द्यायला हवे. अशा आपत्तीत बातमीपत्रांचा आराखडा, त्यातील आशय, दृश्‍य मांडणी आणि प्रत्येक घटकासाठी द्यावयाचा वेळ याची मार्गदर्शक तत्त्वे ठरवून घेण्याची वेळ आता आली आहे. यासाठी पत्रकारांना, संपादकांना, सामाजिक संघटना, मानसशास्त्रज्ञ आणि माध्यम तज्ज्ञांची मदत घेता येईल. ‘कोरोना’विषयी सतत तेच तेच सांगत बसण्यापेक्षा त्या अनुषंगाने समाज आणि साथीचे रोग याविषयी काही माहितीपूर्ण लघुपट तयार करून दाखवणे शक्‍य आहे. समाजाचे आरोग्य हा विषय ऐरणीवर आलेला असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आरोग्यविषयक तुटपुंजी तरतूद यावर मल्लिनाथी करणाऱ्या मुलाखती, तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दाखवल्या, तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन भविष्यात अशा साथींना तोंड देण्यासाठी आर्थिक तरतूद वाढवून घेण्यात आपलाही हातभार लागला हे समाधान मिळवण्याची संधी या निमित्ताने मिळू शकते.

केवळ घडणाऱ्या घटनांचे ‘पोस्टमन’ बनण्यापेक्षा काही वैचारिक मंथन करून, समाजपयोगी दूरदृष्टी दाखवणारी ठोस उपाययोजना सुचवणारी कार्यक्रम मालिका ही आजची खरी गरज आहे. ती ओळखून माध्यमांनी वाटचाल केली तर आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भागीदार होण्याचे श्रेय त्यांना निश्‍चितच मिळेल. पण त्यासाठी पुस्तकातून शिकलेली ‘बातमी मूल्य’ याची व्याख्या बाजूला ठेवून प्रत्येक परिस्थितीत बातमी मूल्य मोजण्याचा काटा वेगवेगळा असतो हा नवा धडा गिरवावा लागेल. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे संयत वृतांकन अधिकृत माहितीचा उत्तम स्रोत झाला आहे, हे आवर्जून नोंदवावेसे वाटते.

अशा प्रसंगी केवळ प्रसारमाध्यमांचीच नव्हे, तर त्याचा वापर करणाऱ्या नेत्यांचीही जबाबदारी मोठी असते. आपण जे जे बोलू त्यातून सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे ही आच त्यामागे हवी. पंतप्रधानांनी यात पुढाकार घेत अतिशय कडक असे निर्बंध देशभर जारी केले याबद्दल ते कौतुकास पात्र आहेतच, पण अशा घोषणा सर्वव्यापी प्रसारमाध्यमातून करताना आपल्या म्हणण्याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो हेही पाहायला हवे होते. ‘देशभर आता रात्री बारापासून लॉकडाउन’ हे वाक्‍य डोळ्यांसमोर काय चित्र उभे करते याचे भान ठेवले जायला हवे होते. कारण हे प्रसारण सुरू असतानाच बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली आणि मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला. ‘अत्यावश्‍यक वस्तू सेवा चालू राहणार,’ अशी सुरुवात करून ही घोषणा झाली असती तर हा गोंधळ सहज टाळता आला असता. सन्माननीय अपवाद सोडले तर जागतिक प्रसारमाध्यमेही अशा कसोटीच्या प्रसंगी प्रगल्भता दाखवताना दिसत नाहीत. अमेरिका आणि चीन यांच्यात परस्परांवर आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी माध्यमांतून अजूनही झडत आहेत. ‘मेड इन चायना’ आणि ‘पीतवर्णी लोकांनी दिलेली भेट’ अशा बातम्या देऊन माध्यमे वंशवाद जोपासत सनसनाटी अशा पीत पत्रकारितेचा फैलाव करत आहेत.

समाज माध्यमांचे योगदान
अशा आणीबाणीच्या परिस्थितीत समाज माध्यमांकडून सकारात्मक वर्तणुकीची फारशी अपेक्षा करता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी तर यावर एक मार्मिक विधान केले आहे. ‘‘आपण फक्त महामारीचा सामना करत नाही, तर माहितीच्या साथीचाही सामना करतोय.’’ मोठ्या प्रमाणात अफवा, औषध सापडल्याचे दावे, कशाने हा रोग पसरतो याविषयी भन्नाट कल्पना यांनी समाज माध्यमात उच्छाद मांडला असताना या वेळेला याची दुसरी बाजूही दिसते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक सामाजिक प्रतिष्ठित संस्था समाज माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करताना दिसतात. मदत निधी गोळा करण्यासाठी यांचा वापर प्रभावीपणे होताना दिसतो आहे. अनेक साईट्‌सवर अधिकृत आकडेवारी सर्वप्रथम दिसेल अशी सोय असल्यामुळे जनतेला योग्य माहिती मिळणे सोपे झाले आहे. ज्यांना या आजारामुळे एकांतवासात राहावे लागते आहे, त्यांनाही हा एक आधार आहे. अनेक ठिकाणी बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मळभ दूर करणाऱ्या सत्यकथा पाहायला मिळत आहेत. समाज माध्यमांचे हे योगदान आपण विसरता कामा नये.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील साथीचा आपण प्रथमच अनुभव घेत आहोत. त्यामुळे काही त्रुटी दिसणे हे स्वाभाविक आहे. पण भविष्यात माध्यमे, समाज माध्यमे आणि माध्यम वापरकर्ते संवादशास्त्र अधिक जबाबदारीने वापरतील आणि या लढ्याला अधिक जबाबदारीने तोंड देतील अशी आशा करुया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com