अग्रलेख : कुंपण ओलांडणारे शेत!

kiran-nagarkar
kiran-nagarkar

रंगलेल्या गप्पाष्टकांमध्ये बव्हंशी श्रवणभक्‍ती करणारा, मधूनच खोचक टिप्पणी करून हशे फोडणारा, जरा जवळचा आणि बराचसा दूरचा मित्र अचानक न सांगता बैठक सोडून गेल्यावर जांभयांचा संसर्ग होऊन बैठक विस्कळते, तशी काहीशी रितेपणाची भावना तूर्त मराठी साहित्य रसिकांच्या मनात असेल. ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर हे सर्वार्थाने ज्येष्ठ होते. मराठी आणि बव्हंशी इंग्रजी साहित्य वर्तुळात वावर राहिलेल्या या लेखकाला आजच्या भाषेत खरे तर ‘ग्रेट’ म्हणायला हवे; पण खुद्द नगरकरांनाच ते आवडले नसते. ‘कालिदास, शेक्‍सपिअर, कबीर यांना ग्रेट म्हटले, तर बाकीच्यांना खालच्या पातळीवरच ठेवायला हवे’ असे ते म्हणत. ‘न्यूयॉर्कर’च्या संपादकांनी ‘ग्रेट’ हा घासून गुळगुळीत झालेला शब्द अजिबात वापरायचा नाही, असा फतवाच काढला होता, अशी गंमतीदार पुस्तीही ते जोडत. किरण नगरकर हे मराठी साहित्यातले लाडके वा लोकप्रिय वगैरे नाव कधीच नव्हते. परंतु, साठोत्तरी लेखकांमध्ये भालचंद्र नेमाडेंपासून भाऊ पाध्यांपर्यंत एक नवी पिढी प्रस्थापित लेखकांच्या झोपा उडवत होती, त्यात नगरकरांनीही आपला शिरकाव केला होता. एरवी माजघर, पोलो कॉलरचा फैनाबाज सदरा घालून बॅडमिंटन कोर्टात प्रेमालाप करणारे नायक, पायाच्या अंगठ्याने जाजम कुरडतणारी नवपरिणिता असल्या मध्यमवर्गीय मामल्यात अडकलेले मराठी साहित्य तेव्हा आळोखेपिळोखे देत उठून बसत होते. थोडे थोडे उजाडत असले तरी एकंदरीत लेखकांच्या जाणीवा होत्या मध्यमवर्गीय बोटचेप्या वर्गाच्याच. नेमाडे, ढसाळादी तरुणांनी मात्र त्या दशकभरात जळजळीत वास्तवाचा लाव्हारस जणू मराठीच्या अंगणात ‘ओतला.’ उघडे नागडे वास्तव हे अधिक सुसंगत आणि सयुक्‍तिक असल्याची जाणीव रुजली. त्याच सुमारास किरण नगरकरांची ‘सात सक्‍कं त्रेचाळीस’ ही चिमुकली कादंबरी प्रकाशात आली. मराठी साहित्याच्या प्रवाहांमधले बदल टिपायला एखादा अभ्यासक बसला, तर ही कादंबरी टाळून त्याला पुढे जाता येणे अशक्‍य.

‘सात सक्‍कं त्रेचाळीस’ ही अनेक अर्थांनी मराठी साहित्यातला मैलाचा दगड ठरली. काळ आणि अवकाशाची आलटापालट करणारी मांडणी, त्यातला तिरसट दृष्टिकोन, पारंपरिक कादंबरी लेखनाच्या आकृतिबंधांना सरसकट दिलेला फाटा, यामुळे ही कादंबरी खळबळ माजवणारी ठरली. साहित्यशौंडांच्या भिवया उंचावल्या गेल्या. वादाचे मोहोळही उठले. पण कितीही टीका झाली तरी कादंबरीचे महत्त्व आणि त्यातील आशयघनता मात्र वादातीत राहिली. कादंबरीची मांडणी, शीर्षक, मलपृष्ठावरचा सूचक मजकूर हा सारा कादंबरीच्या एकसंध वाचनाचाच भाग असतो, हे नगरकरांनी पटवून दिले. जाहिरात क्षेत्रातील कल्पकतेचा त्यांनी त्यासाठी वापर केलेला असेलही. मराठीत बऱ्यापैकी नाव कमावूनही नगरकर हे चर्चा-परिसंवाद, साहित्य संमेलने, पुरस्कारसोहळे अशा भानगडींपासून फटकूनच राहिले. पुढे पुढे तर त्यांनी आपले बहुतेक लिखाण इंग्रजीतच केले. ‘रावण अँड एडी’, ‘द एक्‍स्ट्राज’ आणि चारेक वर्षापूर्वीच आलेली ‘रेस्ट इन पीस’ ही एक नगरकरांनी निर्मिलेली अद्‌भुत त्रिधारा आहे.

मुंबईतील चाळ संस्कृतीमधला बेछूट विनोद, महानगरातले अटळ एकारलेपण याचे विचित्र तरीही आकर्षक चित्रण या त्रिधारेत आढळते. अर्थात या कादंबऱ्या इंग्रजीत गाजल्या. जर्मन भाषेत तर त्यांची बहुतेक पुस्तके अनुवादित झाली. नगरकर हे इंग्रजी साहित्य वर्तुळातले खूपच उंचावरले आदरस्थान झाले. त्यामानाने मराठीने त्यांना तितकेसे आपले म्हटले नाही, हे खरे आहे. नगरकरांनीही आपल्या अभिव्यक्‍तीसाठी मराठीची पायवाट सोडून इंग्रजीचा महामार्ग पत्करला, म्हणूनही हे घडले असेल. ‘सात सक्‍कं त्रेचाळीस’ या कादंबरीची पहिलीच हजार प्रतींची आवृत्ती संपायला सत्तावीस वर्षे लागली’ या वस्तुस्थितीवर नगरकर स्वत:च बोट ठेवत असत. तरीही मराठी भाषेबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. कारण माणूस अंतर्बाह्य मराठी होता. त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘ककल्ड’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. संत मीराबाईच्या जीवनांगांचा नव्याने धांडोळा घेणाऱ्या या लेखकाची भाषा इंग्रजी असली, तर मन मराठी वळणाचे आहे, याच्या खुणा त्यांच्या साहित्यात ठायी ठायी सापडतात. इंग्रजी लिटरेचर फेस्टिव्हलांमध्ये कुर्ता-पायजम्यात काहीसे संकोचून फिरणारे नगरकर दिसले की त्यांचे मराठीपण प्रकर्षाने जाणवायचे. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे आदी मराठी इंग्रजीत एकाच दमाने लिखाण करणाऱ्या नवसाहित्यिकांमध्ये नगरकरांचीही जिम्मा आवर्जून व्हायची. मराठी मांडवांमध्ये मात्र ते क्‍वचितच दिसले. मराठी मध्यमवर्गीय संवेदनाविश्‍वाला पचणार नाहीत, अशा कित्येक गोष्टी त्यांच्या साहित्यात हमखास सापडतात. त्यांच्या कांदबऱ्यांतील प्रयोगशीलता, लेखनशैलीतला वेगळेपणा, भारतीय मिथकांचा नव्याने घेतलेला वेध आणि शोध असल्या कितीतरी गोष्टी मराठी मनाला तितक्‍याशा रुचत नाहीत. भारतीय मिथकांचे पाश्‍चात्यांमधले ‘मार्केट’ नेहमीच मोठे राहिले आहे. साहजिकच इंग्रजीत आणि जर्मन भाषेत मात्र त्याचे फार जोरदार स्वागत झाले. यामुळे घडले एवढेच, की मराठी साहित्याला वेगळ्या वळणावर आणून ठेवून हा पथिक इंग्रजी महामार्गाकडे एकटाच रवाना झाला. आणि आता तर तो प्रांतदेखील सोडून मिथकांमध्ये सामील झाला. मराठी मातीचे हे शेत कुंपण ओलांडून पलीकडेच निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com