पावसाचे फटके का सारखे सारखे?

या राड्याखाली पुतुमलाची पंचावन्न घरे गाडलेली आहेत. (विष्णुदास यांच्या सौजन्याने)
या राड्याखाली पुतुमलाची पंचावन्न घरे गाडलेली आहेत. (विष्णुदास यांच्या सौजन्याने)

शहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग पावसाचे थेंब मोठमोठे बनतात आणि झपाट्याने बरसत आपल्याला जबरदस्त तडाखे देतात. अलीकडच्या घटनांतून त्याचा प्रत्यय आला आहे.

सप्टेंबरचा पहिला आठवडा. केरळची किनारपट्टी सोडून आमची गाडी वायनाडचे डोंगर चढायला लागली. महिनाभर चाललेली संततधार चालूच होती. नागमोडी वळणे घेत जसा रस्ता ८०० मीटर वर वर चढू लागला, तसतशी सगळीकडे रस्त्याला खेटून चाललेली टोलेजंग बांधकामे आणि दिवसेंदिवस पसरत असलेले चहा, वेलची, सुपारीचे मळे दिसू लागले. या सगळ्यांसाठी उभे डोंगर कापले होते, त्यांना लागून दरडी ढासळल्या होत्या. जागोजागी जमीन दहा-दहा फूट खचली होती. रस्ते सारखे दुरुस्त करायला लागत होते आणि त्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला खणले होते आणि तिथूनही छोटी-मोठी भूस्खलने झाली होती. 

असा प्रवास दीड तास चालला. अखेर आम्ही निसर्गाच्या निर्घृणतेचा भयचकित करणारा जो आविष्कार समजावून घेण्यासाठी निघालो होतो त्याच्या घटनास्थळी, पुतुमलाला पोचलो. पुतुमला हे मळ्यातील मजुरांच्या घरांचे ओढ्याच्या घळीत वसलेले गाव. घळीच्या दोन्ही बाजूंना डोंगरांचे उभे चढ आहेत. त्यांच्यावरची मूळची सदाहरित वनराजी तोडून तिथे सपाट्या करून चहा, वेलची, सुपारी लावली होती. आजूबाजूला विरळ झालेला झाड-झाडोरा होता. आठ ऑगस्टला पुतुमलाचा ओढा जिथे अडीच किलोमीटर दूर, वर डोंगरात उगम पावतो, तिथे दोन्ही बाजूच्या उतारांवर सहा मोठी व अनेक छोटी भूस्खलने होऊन चिखलाची नदी वाहू लागली होती, ती जशी वाहात आली, तसतशी आसपासच्या उतारांवरून सहा-सहा मीटर खोलीपर्यंत आणखी दगड-माती गोळा करत झाडांना, घरांना उपटून काढत फुगत गेली आणि शेवटी त्या चिखलात पुतुमलाची पंचावन्न घरे गाडली गेली. काहीतरी अघटित घडते आहे असा अंदाज आल्यामुळे खूप लोक घरे सोडून पळाले, तरीही सतरा जण मृत्युमुखी पडले. त्यांच्यातील पाच जणांचे मृतदेह अजूनही सापडले नव्हते.

केरळात गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही अतिवृष्टी व त्या पाठोपाठ महाप्रलय होऊन प्रचंड हानी झाली होती. पण सांगण्यात आले होते, की १९२४मध्ये तर याहूनही जास्त पाऊस झाला होता; शंभर वर्षांत एखाद वेळा असे व्हावयाचेच, तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. पण यंदाही दुसऱ्यांदा उत्तर केरळात अतिवृष्टी आणि जागोजाग भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणावर नुसती साधनसंपत्तीचीच हानी झाली नाही, तर गावेच्या गावे गाडली जाऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले, तेव्हा लोक हादरून जागे झाले आहेत. शंभर वर्षांतून एकदा ठीक आहे, पण साध्या हिशेबाप्रमाणे लागोपाठ दोनदा असे होण्याची शक्‍यता केवळ दहा हजार वर्षांत एकदा आहे. साहजिकच सगळे विचारू लागले आहेत की, हा केवळ निसर्गक्रम आहे की मानवी हस्तक्षेपाने अशा घटना वारंवार होऊ लागल्याची ही सुरवात आहे? आपण भरमसाट ऊर्जा वापरत जग तापवतोय, बेमुर्वतखोरपणे निसर्गाची धूळधाण करतोय, त्याचा तर हा परिपाक नाही ना? 

जागतिक तापमानवाढीच्या परिणामांच्या अभ्यासांतून स्पष्ट झालेय की जग तापते आहे, तसे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण आणि त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्‍यता वाढते आहे. जग तापते आहे ते ऊर्जेच्या निष्कारण नासाडीमुळे आणि यात ‘रिअल इस्टेट बॅरन’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेखालच्या अमेरिकेचे योगदान निःसंशय सगळ्यांत मोठे आहे. पण भारतातही बेगुमानपणे ऊर्जेची उधळपट्टी चालू आहे. केरळातच कोची शहरात समुद्राला मायेने सांभाळणारी खारफुटीची झाडी बेकायदा तोडून तिथे श्रीमंतांसाठी उंच-उंच इमले उभारले आहेत. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ते पाडले जाताहेत. त्यातून भरपूर धूळ उधळली जात आहे. पाडल्यावर तिथे काही खारफुटी पुन्हा वाढणार नाही. मग समुद्राचे आक्रमण थांबवण्यासाठी काँक्रीटची तटबंदी उभारली जाईल. या सगळ्यांसाठी देशभर लोकांच्या विरोधाला न जुमानता चुनखडीच्या, दगडांच्या खाणी खणण्यात येतील, समुद्राकाठची, नद्यांतली रेती उपसली जाईल. मग स्थानिकांचा विरोध दडपण्यासाठी डिझेल जाळत, धूर सोडत सरकारी वाहने धावत राहतील. 

पण बाष्पाचे प्रमाण जगभर वाढणे हा केवळ एक भाग झाला. जबरदस्त पाऊस अनेकदा विवक्षित ठिकाणांवर कोसळतो आणि त्यामागे अनेक स्थानिक कारणे असतात. पर्जन्यवृष्टी व्हायला वर ढकलली जाणारी हवा थंड होऊन तिच्यातल्या वाफेचे पाण्याचे थेंब बनायला पाहिजेत. समुद्रावरचे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या डोंगरांवर आदळून वरवर चढतात आणि घाटमाथ्यावर चिक्कार पाऊस कोसळतो. पण इतरत्रही जमीन तापून गरम हवा वर चढू लागते आणि तिच्यात पुरेसे बाष्प असल्यास वाफेचे पाणी बनून पाऊस पडतो. जिथे भूमीवर पिकाचे, मळ्यांचे, जंगलांचे हिरवे गालिचे पसरलेले असतात, तिथे जमीन खास तापत नाही. पण अशा जागी मनुष्यवस्तीची सिमेंट काँक्रीटची जंगले पसरली, मोठमोठे डांबरी सिमेंट-काँक्रीटचे महामार्ग बनवले गेले किंवा बॉक्‍साईटच्या, दगडांच्या खाणींमुळे कातळ उघडे पडले, तर जमीन भरपूर तापून हवा वर चढायला लागते.

शिवाय पावसाचा तडाखा हा पावसाचे थेंब केवढे मोठे आहेत यावरही अवलंबून असतो. हा आकार ठरवण्यात वातावरणातील ‘एरोसोल’ म्हणतात अशा बारीक बारीक कणांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा कणांच्या अभावी ढगांत द्रव पाणी साचू लागल्यावर छोट्या थेंबांच्या पावसाची रिमझिम सुरू होते. परंतु ‘एरोसोल’चे खूप कण असले तर आधी त्यांच्याभोवती पाण्याचे बारीक बारीक थेंब साचू लागतात. मग काही काळाने ते एकत्र येऊन पाण्याचे मोठेमोठे थेंब बनतात आणि वेगाने त्यांचा वर्षाव सुरू होतो. एरवी सहा तासांत जो पाऊस संथपणे पडला असता, त्याऐवजी आता दोन-तीन तास उशिरा सुरू होऊन अर्ध्या-पाऊण तासातच जबरदस्त तडाखे देणारा पाऊस कोसळतो. असा अचानक पाऊस झाला की पाणी भराभर वाहात जाऊन आणखी मोठे पूर लोटतात. अशा पावसाच्या माऱ्याने नदी-ओढ्यांचे बांध, निष्काळजीपणे बांधलेल्या इमारती कोसळण्याची शक्‍यता खूप वाढते. 

केशवसुत म्हणाले होते- निसर्ग निर्घृण, नाही कुणाची त्याला मुर्वत. लीला त्याची, चुरुनी टाकी प्रचंड पर्वत! ती सकलाना समान जाची. पण हे काही खरे नाही. पुतुमलाला बळी पडले ते घळीतल्या खोपटांत राहणारे मजूर. बेमुर्वतखोरपणे पर्वत चुरून टाकणाऱ्यांचे खिसे आणखी आणखी गरम होताहेत. त्यांच्या कोट्यवधी किमतीच्या सदनिका केवळ भारतातच नाही, तर परदेशातही विखुरलेल्या आहेत. ते ख्यालीखुशालीत आहेत. आपल्या लोकशाहीत अशी अंदाधुंदी रोखण्याची शक्ती आहे; पण आज लोक आणि लोकशाही निद्रावस्थेत आहे. ते जागे झाले आणि परिणामकारक उपाययोजना अमलात आल्या, तर आपली उताराला लागलेली गाडी दरीत कोसळण्याच्या आधी रोखली जाईल. सुदैवाने आज लोकांना जाग येऊ लागण्याची सुचिन्हे दिसताहेत. त्यातून प्रत्यक्षात खूप काही उतरेल, अशी आशा बाळगूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com