अग्रलेख :  म्यानाबाहेरची शस्त्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल. 

भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल. 

महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत खंडेनवमीला माघारीचा सोपस्कार आटोपून दसऱ्याच्या मुहुर्तावर प्रचाराला प्रारंभ झाला. विजयादशमीचा मुहूर्त साधून विजयपताका फडकविण्यासाठी नेते प्रचाराला बाहेर पडले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावरगाव येथील मेळाव्यात निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रचारासाठी नगर जिल्ह्यात पोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील बुधवारपासून प्रचारासाठी बाहेर पडताहेत. अशा वेळी भाजप-शिवसेना महायुती दोनशे वीस जागा जिंकण्याचे लक्ष्य पूर्ण करील की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल. महायुतीच्या त्या मोहिमेत मुख्यत्वे बंडखोरांनी म्यान न केलेली शस्त्रे हाच अडथळा, असेल अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतही अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. पण काँग्रेस आघाडीतल्या बंडाळीची तीव्रता कमी आहे. दोन्ही काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये भाजप व शिवसेनेत प्रवेश केला असल्याने तशीही आघाडीत उमेदवारीसाठी स्पर्धा तितकीशी नव्हती. परिणामी आघाडीच्या तुलनेत आयारामांचा ताण युतीला अधिक सहन करावा लागत आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर ताकद आजमावली होती. तो अनुभव घेतल्यानंतर या वेळी मात्र राज्याच्या पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती केली. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेना अन्य छोट्या पक्षांशी युती करून तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शेकाप व डाव्या पक्षांना सोबत घेऊन रिंगणात उतरले. राज्याच्या राजकारणात तिसरी ताकद म्हणून उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती. नंतर आघाडीचे ‘एमआयएम’शी बिनसले. तरीही काही भागात वंचितचे उमेदवार प्रभावी आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढतीत उतरली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून राज्यात जवळपास दोनशे विधानसभा मतदारसंघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्‍यता आहे. 

बंडोबांना थंडोबा करण्यासाठी नेत्यांनी प्रचंड प्रयत्न करूनही अनेक मतदारसंघांमध्ये भगव्या युतीतल्या पक्षाचे उमेदवार मित्रपक्षाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नारायण राणे यांच्या परिवाराला असलेला शिवसेनेचा विरोध लपून राहिलेला नाही. भाजपने कणकवलीत नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यानंतरही शिवसेनेचे सतीश सावंत यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रत्त्युतर म्हणून कुडाळमध्ये शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपचे रणजित देसाई यांनी बंड केले आहे. राजधानी मुंबईत वर्सोवा मतदारसंघात भारती लव्हेकर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने राजूल पटेल यांना उतरवले आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल उभे आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही युतीसमोर बंडखोरांचे आव्हान मोठे आहे. नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रामटेक मतदारसंघात भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी दंड थोपटले आहेत. हे शह-काटशहाचे राजकारण केवळ भाजप-शिवसेना या पक्षीय पातळीवरच आहे असे नाही. बंडाचे निशाण अगदी ‘मातोश्री’च्या अंगणातही फडकले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती देसाई यांच्याऐवजी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना तिकीट दिले. तथापि, श्रीमती देसाई यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीची उदाहरणे मोजकी असली, तरी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भाजपच्या वाट्याच्या नाशिक पश्‍चिममध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे, तर शिवसेनेच्या वाट्याच्या नांदगावमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय रत्नाकर पवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. महाजनांचे आणखी दोन निकटवर्तीय अमोल शिंदे व अनिल चौधरी जळगाव जिल्ह्यात अनुक्रमे पाचोरा व रावेर मतदारसंघात अपक्ष लढत आहेत. पाचोऱ्यात किशोर पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत, तर रावेरमध्ये भाजपचेच हरिभाऊ जावळे यांच्यासमोर चौधरी यांचे आव्हान आहे. मराठवाड्यातही अनेक मतदारसंघांमध्ये एकतर युतीच्या मित्रपक्षांमध्ये बेबनाव आहे, तर वंचित बहुजन आघाडीमुळे काही मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत ५५ मतदारसंघांमध्ये मताधिक्‍य पाच हजारांपेक्षा कमी होते. या पार्श्‍वभूमीवर ही बंडाळी निर्णायक ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial article Maharashtra Vidhan sabha election