अग्रलेख :  दशांगुळे उरलेले गांधी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

काळाची मर्यादा ओलांडूनही गांधी दशांगुळे उरतातच, यामागचे रहस्य जाणून घेतले पाहिजे. तसे ते जाणून घेणे भारतीयांच्याच नव्हे, तर सगळ्या मानवजातीच्याही हिताचे आहे.  

काळाची मर्यादा ओलांडूनही गांधी दशांगुळे उरतातच, यामागचे रहस्य जाणून घेतले पाहिजे. तसे ते जाणून घेणे भारतीयांच्याच नव्हे, तर सगळ्या मानवजातीच्याही हिताचे आहे.  

मोहनदास करमचंद गांधी या माणसाने पोरबंदरमध्ये सुस्थितीतील कुटुंबात जन्म घेतला, त्याला आज दीडशे वर्षे लोटली. पण एवढा काळ लोटूनही गांधी आजही जिवंत आहेत आणि पुढची दीडशे वर्षेच नव्हे, तर जोपावेतो या धरतीवर माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात असेल, तोपावेतो ते आपल्याला विसरता येणार नाहीत. गांधींचे जेवढे ‘भक्‍त’ आहेत, तेवढे अन्य कोणाचेही असणे शक्‍य नाही आणि त्यापलीकडची बाब म्हणजे या ‘भक्‍तां’च्या संख्येप्रमाणेच त्यांच्या ‘शत्रूं’ची संख्याही भलीमोठी आहे! शाळकरी वयातच नव्हे, तर महाविद्यालयात गेल्यावरही हा एक सर्वसामान्य माणूसच होता आणि सर्वसामान्य माणूस त्या वयात जे काही करतो ते सर्व काही त्याने केले होते. पुढे रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली ‘महात्मा’ ही उपाधी त्याच्या मागे आयुष्यभरासाठी चिकटल्यानंतरही आपण तरुणपणी कसे स्खलनशील होतो, ते जाहीरपणे सांगण्याचे धैर्य त्याच्यात होते. गांधींचे माहात्म्य ते हेच!  दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांच्या मागे ही उपाधी लागली खरी; पण त्यांना विरोधही काही कमी झाला नाही. त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांना, त्यांच्या विचारांना तिखट विरोध झाला; परंतु ना हत्या करून गांधींना संपवता आले, ना त्यांना विरोध करून. उलट काळ जसा पुढे जात आहे, तसतसे गांधीविचारांचे आकर्षण वाढत आहे, त्याकडे नव्या प्रकाशात पाहिले जात आहे. काळाची मर्यादा ओलांडूनही गांधी दशांगुळे उरतोच, यामागचे रहस्य जाणून घेतले पाहिजे. 

बॅरिस्टर पदवी मिळवणाऱ्या गांधींची दक्षिण आफ्रिकेत ‘काळा इसम’ अशी त्यांची संभावना करून गोऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना, त्यांच्या सामानासकट रेल्वेगाडीतून फेकून दिले आणि तेथेच नवा गांधी जन्माला आला. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेची बूज राखली गेली पाहिजे, हा नवा मंत्र त्यांच्याकडे होता. ते भारतात परतले आणि ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीलाही वेगळ्याच चैतन्याने भारून टाकले. जनजागृतीचे लोण पार पाड्यांपर्यंत पोचले. बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आपल्या अहिंसक विरोधाची दखल घ्यायला त्यांनी भाग पाडले. सविनय कायदेभंग, सत्याग्रह ही नवी अस्त्रे जनतेच्या हातात आली. त्याआधी काँग्रेस ही चर्चा-परिसंवाद, बैठकी, निषेधपत्रे यापुरतीच मर्यादित होती आणि पक्षावर प्रामुख्याने मोजक्‍या उच्चभ्रू लोकांचा पगडा होता. गांधी यांच्या हाती संघटनेची  धुरा येताच देशभरातील उपेक्षित, पददलित अशा आम आदमीपर्यंत त्यांनी ती पोचवली. स्वातंत्र्य चळवळीला देशव्यापी स्वरूप प्राप्त करून दिले. ‘सोशल मीडिया’ नावाची चीज अस्तित्वात नसतानाही देशभरातील जनताच नव्हे, तर अनेक विचारी नेते त्यांच्यामागून आपोआप चालू लागले. ही ताकद अद्‌भुत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगात जिथेजिथे शासनसंस्थांकडून दमन आहे, नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे, पिळवणूक आहे, तिथे तिथे हा महात्मा आधार देण्यासाठी, अन्यायाला विरोध करण्यासाठी आजही ‘उपस्थित’ आहे. युद्धखोरी, शस्त्रास्त्रस्पर्धेपासून ते जागतिक हवामानबदलांपर्यंत आणि दारिद्य्रापासून ते विषमतेपर्यंत ज्या ज्या समस्यांनी जगाला ग्रासले आहे, त्या प्रत्येक समस्येच्या बाबतीत गांधी काही ना काही सांगू पाहतात. त्यामुळेच ‘मानवताधर्मा’चा विसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी उपासक कोण असेल तर तो गांधी. त्यांच्या विचारांचा हा गाभा. बाकी सारे कार्यक्रम, कल्पना, योजना आणि चळवळी म्हणजे या गाभ्याला समृद्ध करणारे प्रवाह. 

महात्माजींच्या १९१५ ते १९४८ अशा तीन दशकांच्या राजकारणाच्या छायेतून आज एकही भारतीय बाहेर येऊ शकलेला नाही. त्यांच्या राजकारणाची, त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमाची, त्यांच्या पंचाची त्यांच्या आयुष्यातच अनेकदा टिंगल झाली आणि त्या राजकारणाची ‘बनियेगिरी’ अशी संभावनाही झाली. तेव्हा ‘मी बनिया आहेच!’ असे उत्तर त्यांनी टीकाकारांना दिले होते. टीकेचे कितीही घाव पदरात आले, तरी या महात्म्याच्या चेहऱ्यावरील निर्व्याज स्मितहास्य कधी मावळले नाही. त्यांच्या राजकारणाला विरोध करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच त्यांना ‘राष्ट्रपिता’ अशी उपाधी बहाल केली होती. प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांच्या निधनानंतर ‘या धरतीवर असा एक हाडामांसाचा जिता-जागता माणूस होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा विश्‍वास बसणे कठीण आहे!’ असे उद्‌गार काढले होते. गांधींचा वारसा सांगणारे राजकारणी काय किंवा एकेकाळी त्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करीत आलेल्या उजव्या शक्ती काय, सगळेच आता गांधींजींचे उठता-बसता नाव घेत असतात. पण नुसते देव्हाऱ्यात बंदिस्त होणारे हे दैवत नाही. अन्याय, अप्रतिष्ठा आणि शोषणाला प्रश्‍न विचारणारे आणि त्याविरोधात लढण्याची प्रेरणा देणारे हे चैतन्य आहे...आणि म्हणूनच दीडशे वर्षांनंतरही ते भारतीयांनाच नव्हे, तर साऱ्या मानवजातीला खुणावते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article mahatma gandhi