कार्यशाळांमधून रुजणारी नाट्यजाणीव

महेंद्र सुके
शनिवार, 27 जुलै 2019

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या पुढाकाराने राज्यात नाट्यवाचन कार्यशाळा सुरू आहेत. नाट्यचळवळीला चालना देणाऱ्या या उपक्रमाविषयी.

अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या पुढाकाराने राज्यात नाट्यवाचन कार्यशाळा सुरू आहेत. नाट्यचळवळीला चालना देणाऱ्या या उपक्रमाविषयी.

महाराष्ट्रात नाटक करणारे, पाहणारे आणि जगणारेही असंख्य आहेत. आपल्या अवतीभवती जे काही घडते, घडवले जाते त्यातून नाट्य शोधण्यात येते; ते लिहिले जाते. नंतर ते रंगमंचावर खेळवले जाते. नाटक लिहिण्यापासून ते सादर होण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ते नाटक संहिता रूपाने लेखक आणि कलावंत यांच्यातच मर्यादित राहते. सादर झाल्यावर ते सार्वजनिक होते. ते सादर होण्यापूर्वीच वाचले जावे, त्यातली बलस्थाने आणि उणिवांवर चर्चा होऊन उत्तम नाटक रसिकांपुढे यावे, त्यासाठीचा प्रपंच म्हणजे नाट्यलेखन कार्यशाळा. 

९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यवाचन कार्यशाळांचा उपक्रम उत्साहाने राबविला आहे.ही नाटकं वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहेत. राजकारण, समाजकारण, संस्कृती, मानवी नातेसंबंध, रुढी, परंपरा असे अनेक विषय त्यात हाताळले गेले. कलावंत कुठलाही असो, तो समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य करत असतो. मानवी स्वभावातील गुणदोष सांगून रसिकांचे फक्त मनोरंजनच नव्हे, तर परिस्थितीची जाणीवही करून देत असतो. मानवी विकृतीवर प्रहार करून वास्तव सांगत असतो. हे काम नाट्यकलाकृतीतून करणे सोपे नाही. कारण या कलाप्रकारात लिहिण्याचे तंत्र लेखकाला अवगत असणे आवश्‍यक आहेच, शिवाय ज्या विषयावर भाष्य करायचे आहे, त्याचा इत्थंभूत अभ्यासही व्हायला हवा. नाटक हे काल्पनिक वाटत असले, तरी ते समाजातील घटना, घडामोडींवर भाष्य करणारे माध्यम आहे. त्यामुळे नाटककाराने वास्तव मांडण्याची गरज असते. विशेषत: प्रायोगिक नाटकात येणारे माहितीचे तपशील खरे वाटले, तर रसिकांना, अभ्यासकांना ते पटते.

अन्यथा प्रेक्षकांना ते नाटक खोटे वाटायला लागते. राज्यात विविध भागात झालेल्या पाचही कार्यशाळेतील नाटककारांनी त्यांच्या-त्यांच्या कलाकृतीत आलेल्या तपशिलांचा बराच अभ्यास केला आहे. यातले काही नवखे असले, तरी त्यांच्या लिखाणात समाजाकडे बघण्याचा डोळसपणा आहे. आणखी चांगल्या नाटकांची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. या कार्यशाळेत फक्त नाटककार नाटक वाचतो आणि गज्वी बोलतात असं होत नाही. त्यात उपस्थित रंगकर्मी, नाट्यतज्ज्ञ, जाणकार त्या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर येऊन गेलेल्या नाटकांचीही चर्चा करतात. नव्या नाट्यलेखकांचे जुन्या नाटककारांशी नातेही उलगडले जातात. ते नाते आशय-विषयाशी असते, तर कधी शैलीच्या जवळ जाणारे वाटते. जुने संदर्भ नव्याने उलगडत जातात आणि रंगज्ञानात भर पडते. 

या कार्यशाळेत तज्ज्ञच नव्हे, तर नव्या पिढीचे कलावंतही हजेरी लावतात. आपलं लहानपण सांगून ते या कार्यशाळेतील नाटकावर बोलतात. असंख्य प्रश्‍न त्यांच्याही मनात दडलेले असतात. त्यांना ते विचारायचे असतात. ती संधी या कार्यशाळेत मिळते आणि २०-२२ वर्षांची तरुणी विचारते, ‘तीच तीच पात्ररचना, व्यक्तिरेखांची तीच नावं आपल्या नाटकात का येतात?’ तिच्या मनातला हा नव्या पिढीचा प्रातिनिधिक प्रश्‍न. त्याचे उत्तर नाटककारांना द्यावे लागणार आहे. नव्या पिढीसाठी नवे लिहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Mahendra Suke