अग्रलेख : भाषा‘शक्ती’ची उपासना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

‘अमृताशी पैज लावली, तरी ती माझी मराठी भाषाच जिंकेल,’ असा आशावाद व्यक्त करून ज्ञानोबारायांनी ज्या भाषेबद्दलच्या आपल्या अभिमानाची पायाभरणी केली, तिच्या गौरवाचा आज दिवस.

‘अमृताशी पैज लावली, तरी ती माझी मराठी भाषाच जिंकेल,’ असा आशावाद व्यक्त करून ज्ञानोबारायांनी ज्या भाषेबद्दलच्या आपल्या अभिमानाची पायाभरणी केली, तिच्या गौरवाचा आज दिवस. साहित्याचे सामाजिक प्रयोजन मांडणाऱ्या कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणूनही पाळला जातो. शालेय स्तरावर मराठी सक्तीचे करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने पावले टाकली आहेत आणि यंदाच्या मराठी गौरवाला त्याची पार्श्‍वभूमी आहे. खरे म्हणजे  सक्ती आणि बंदीने कशातच फारसे यश मिळाल्याचा अनुभव नाही. तरीही सरकार फक्त सक्ती करून समाधान मानत असेल, तर ते चुकीचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दशकभरात ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ची टूम आपल्याकडे आली आहे. त्यादिवशी एक दिवस प्रेम व्यक्त करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. त्याच धर्तीवर मराठीविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘मराठी राजभाषा दिन’ झाला आहे. या दिवशी मराठीचे गौरव सोहळे; नंतर मग पुन्हा तीच उदासीनता. वास्तव असे असेल तर शाळांमधून कितीही सक्ती केली, तरी मराठीचे दिवस पालटण्याची शक्‍यता नाही. भाषाशास्त्राचे अभ्यासक असे मानतात, की शासन-प्रशासन, लष्कर आणि व्यापार या तीन प्रणालींमध्ये प्रामुख्याने ज्या भाषेचा वापर होतो, ती भाषा टप्प्याटप्प्याने लोकांच्या अंगवळणी पडते. मराठी ही शासन-प्रशासनाची भाषा थोडीफार असेल कदाचित; पण इतर दोन बाबतीत तसे म्हणता येणार नाही, त्यामुळे महत्त्वाच्या क्षेत्रांत मराठीचा वापर जास्तीत जास्त कसा होईल, हे पाहण्याची गरज आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही व्यापार-उदिमाची भाषा प्रामुख्याने इंग्रजी आहे. काही प्रमाणात हिंदीचे प्राबल्य आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे ऐकायला छान वाटते. पण, आमच्या पिलापिलांत आता मराठी जन्मत नाही. मुलांना थेट इंग्रजी माध्यमात किंवा कॉन्व्हेन्टमध्ये घातले जाते. नंतर ते करिअरसाठी जे काही शिकतात, ते प्रामुख्याने इंग्रजीतूनच. सोबत व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग म्हणूनही त्याच भाषेतून बोलण्याचे सरावपाठ घेतले जातात. आधुनिक विद्याशाखांमधील संदर्भसाहित्य, पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. हे चित्र बदलण्याचे आव्हान खूप व्यापक आहे आणि ते पेलण्यासाठी सरकार, सर्वसामान्य लोक, शिक्षणसंस्थांच्या चालकांसह शिक्षणाशी संबंधित सर्व घटक, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मोठे भाषांतर प्रकल्प हाती घ्यायला हवेत. सोप्या भाषेत तांत्रिक परिभाषा सांगणारे शब्दकोश तयार करण्यापासून ज्ञानकोशांचे अद्ययावतीकरण करण्यापर्यंत अनेक कामे समोर दिसत आहेत. गरज आहे ती त्यात उत्साहाने, चिकाटीने आणि ध्येयवादाने काम करणाऱ्या अभ्यासक- कार्यकर्त्यांच्या फळीची. मध्यंतरीच्या अर्धशतकात प्रचंड वेगाने वाढलेल्या, तंत्रज्ञानात्मक विद्याशाखांकडून पुन्हा एकवार मानव्यविद्यांच्या अभ्यासाकडे वळण्याचा प्रवाह प्रबळ होताना दिसतो आहे; मात्र त्याचवेळी भाषाशिक्षणाचा दर्जा मात्र काळजी वाटावी, एवढा घसरतो आहे. याची झळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच मराठीलाही बसते आहे. काही अभ्यासक तर अशी शंका व्यक्त करतात, की लोक पुन्हा एकदा चिन्हांकडे किंवा चित्रात्मक भाषेकडे (साइन लॅंग्वेज) वळू लागलेले असल्याने कदाचित भविष्यात सध्याच्या स्वरूपातील भाषांचा वापरच थांबेल. ‘इमोजी’वरूनच भावना (इमोशन्स) कळू लागल्या तर भाषेची गरज राहणार नाही, असा धोका त्यांना भेडसावतोय.

वास्तविक भाषांनी मानवाच्या साऱ्या जगण्यालाच सौंदर्य प्रदान केले. भाषा फक्त संवादासाठी नसते. भाषेतून संस्कृती प्रवाहित, तर लोकजीवन आणि लोकव्यवहार विकसित होत असतो. येत्या काही काळात मराठी पार निकालात निघेल आणि ती संपेल, असा गळा काढणे निरर्थक आहे. दहा-बारा कोटी लोक जी भाषा वापरतात, ती अचानक संपणार नाही. मात्र, ती आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावी असे वाटत असेल, तर ती विकसित होत राहणे आणि त्यासाठी ती ज्ञानभाषा, तंत्रभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून नावारूपाला येणे गरजेचे आहे, त्यासाठी सक्तीच्या उपायाला अन्य प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. त्यासाठीचे मार्ग वेगळे आहेत. राज्यात अनेक विद्यापीठे आहेत. आरोग्य विद्यापीठ आहे, तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठे आहेत, संस्कृत विद्यापीठही आहे, हिंदीचेही आहे; पण मराठीचे नाही. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मोठा खटाटोप सुरू आहे आणि त्याचवेळी जे आपण या भाषेसाठी करू शकतो, ते करण्याची कुणाची तयारी नाही. फडणवीस सरकारच्या काळात ‘मराठी विद्यापीठा’चा विचार झाला होता, त्याचे पुढे काय झाले? आरंभशूरपणा आणि वार्षिक सोपस्कार पार पाडण्याची वृत्ती ही समाजाच्या सर्व घटकांमध्ये ठासून भरलेली असेल, तर भाषा बिचारी काय करणार? मराठीविषयी निरर्थक गळे काढण्याचे एक टोक आणि ‘अभिजात दर्जाच हवा’ या आग्रहाचे दुसरे टोक यांच्या मध्येदेखील पावले उचलण्यासारखे बरेच काही आहे. सक्तीचा उपाय फार फार तर तात्कालिक म्हणून सयुक्तिक ठरेलही; पण खरी गरज आहे ती भाषाशक्तीच्या उपासनेची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article Marathi Language Day