पहाटपावलं : वावटळीच्या निमित्तानं

मृणालिनी चितळे
Tuesday, 17 September 2019

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जंगल. तिथं फिरताना एखादं वस्तुसंग्रहालय पाहताना जशा कधी न पाहिलेल्या गोष्टी समोर येतात, तसाच हा अनुभव. त्याचा आनंद लुटण्यासाठी गमबूट घालून चिखलातून चालण्याची आणि घामाच्या धारांनी ओलंचिंब केलं किंवा डास-पिसवांनी डसलं, तरी सहन करण्याची तयारी मात्र हवी. ती असेल तर तेथील निसर्गसौंदर्य आयुष्यभर पुरून उरेल एवढा आनंद बहाल करतं.

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जंगल. तिथं फिरताना एखादं वस्तुसंग्रहालय पाहताना जशा कधी न पाहिलेल्या गोष्टी समोर येतात, तसाच हा अनुभव. त्याचा आनंद लुटण्यासाठी गमबूट घालून चिखलातून चालण्याची आणि घामाच्या धारांनी ओलंचिंब केलं किंवा डास-पिसवांनी डसलं, तरी सहन करण्याची तयारी मात्र हवी. ती असेल तर तेथील निसर्गसौंदर्य आयुष्यभर पुरून उरेल एवढा आनंद बहाल करतं. सातशे वर्षं जुनं महाकाय वृक्ष. झाडांना विळखा घालून त्यांच्यामधील अन्नरस शोषून घेत मूळ झाडाला मारून टाकणाऱ्या ॲनाकोंडा जातीच्या वेली. वर्षाला तीस सेंटिमीटर वाढून झाडाभोवती पिंजरा तयार करणारी अजब मुळं.. साऱ्याच गोष्टी अचंबित करणाऱ्या. जंगलातून फिरताना एका तळ्याकाठी आम्ही विसावलो. अचानक वावटळ आली आणि जमिनीवर विखुरलेली पानं गोलगोल फिरायला लागली.

‘बघा, बघा ती पानं कशी फिरताहेत ते!’ मी जवळजवळ ओरडलेच. माझ्याबरोबरचे सहप्रवासी ‘यात काय बघण्यासारखं आहे?’ अशा नजरेनं माझ्याकडं पाहत राहिले. काल रात्री अनुभवलेल्या विषुववृत्तीय वादळापुढं हे काहीच नव्हतं. आदल्या दिवशी तिथल्या नियमांनुसार रात्री आठ वाजता वीजपुरवठा बंद केल्यानं आम्ही झोपून गेलो. विजांचा कडकडाट आणि ढगांचा कडकडाट यानं दचकून जाग आली. त्यापाठोपाठ शब्दश: मुसळधार पाऊस सुरू झाला. बाहेर मिट्ट काळोख. विजांच्या प्रकाशात घराबाहेरची झाडं डायनोसॉरचं रूप धारण करीत होती. त्या अनुभवापुढं ही वावटळ अगदीच चिल्लर होती. मला मात्र गोलगोल फिरणारी पानं पाहताना समर्थ रामदासांची आठवण झाली. त्यांनी ‘दासबोध’मध्ये म्हटलं आहे, की उजव्या सोंडेचा गणपती, उजवा शंख आणि झाडाला उजवीकडून डावीकडं वेढा घालणाऱ्या वेली जशा क्वचित आढळतात, तशी सज्जन माणसंही दुर्मीळ असतात. पहिल्या दोन उपमा पटल्या.

तिसऱ्या उपमेमध्ये काही तथ्य आहे काय, हे जाणून घेण्यासाठी एका वनस्पतिशास्त्रतज्ज्ञाला गाठलं. त्यानं सांगितलं की, पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे उत्तर गोलार्धात वेली डावीकडून उजवीकडं म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेनं झाडाला विळखा घालतात, तर दक्षिण गोलार्धात त्याच्या उलट, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. जी गोष्ट वेलींची, तीच वाऱ्याबरोबर गोलगोल फिरणाऱ्या पानांची. दक्षिण अमेरिकेत जाताना रामदासांच्या उक्तीची आठवण नव्हती. त्याची सत्यता पडताळून पाहावी, असा मानसही नव्हता. परंतु, वृक्षाला बिलगलेल्या वेली आणि भिरभिरणारी पानं पाहताना नकळत हात जोडले गेले. ‘दासबोधा’मधून ज्ञान, विज्ञान, व्यवहारज्ञान यांचं दर्शन घडविणाऱ्या रामदासांविषयीच्या आदरानं मन कितव्यांदा तरी भरून पावलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Mrunalini Chitale