दोन स्थापत्यकार

नरेंद्र मोदी हे एक स्थापत्यकार म्हणून उदयाला आले आहेत. त्यांच्या अनेक प्रकल्पांनी भारताच्या भौगोलिक नकाशामध्ये स्थान मिळविले आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal

नरेंद्र मोदी हे एक स्थापत्यकार म्हणून उदयाला आले आहेत. त्यांच्या अनेक प्रकल्पांनी भारताच्या भौगोलिक नकाशामध्ये स्थान मिळविले आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ही किमया इतर कोणाला साधली नव्हती. नवी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील सरकारी इमारतींची पुनर्रचना, नवीन संसद इमारतीची उभारणी, जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणे किंवा केन आणि बेटवा नदीजोड प्रकल्पाला मान्यता असो, मोदींनी प्रतिकात्मक आणि प्रदर्शनीय मूल्य असलेल्या भव्य प्रकल्पांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.

त्यांच्या सरकारने देशाच्या पायाभूत सुविधेलाही प्रचंड पाठबळ पुरविले. द्रुतगती महामार्ग, अतिवेगवान रेल्वे प्रकल्प, वेगवान मालवाहतूक कॉरिडॉर, नवीन विमानतळे, महत्त्वाच्या नद्यांवर मोठे पूल बांधणे, अशा सर्व प्रकल्पांमुळे आपला विस्तीर्ण देश पूर्वी कधी नव्हता, तितका जवळ आला आहे. अयोध्येत राममंदिर, वाराणसीमध्ये काशी विश्‍ननाथ धाम आणि हिमालयात चार धाम रस्ते प्रकल्प यांच्याद्वारे पंतप्रधान मोदी यांनी हिंदू मनांमध्येही आपले स्थान अढळ केले आहे. त्यांच्या सरकारच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन कसेही होवो, वास्तू उभारणीत मोदी हे एक वगळता, बाकी सर्व माजी पंतप्रधानांना मागे टाकणार, हे निश्‍चितच आहे.

बारामतीचे ट्रस्ट 'ऑक्सफर्ड'मध्ये सुरु करणार कृषी अभ्यासक्रम

मोदींच्या प्रकल्पांच्या निवडीविषयी नाही, पण त्यांच्या प्राधान्यक्रमांविषयी मात्र प्रश्‍न विचारणारे लोक आहेत. ‘मोदींनी दगडी वास्तूंची भक्कम उभारणी केली असली तरी त्यांनी सुशासनाचा संस्थात्मक पाया डळमळीत केला आहे’; ‘त्यांच्या काळात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे देश जवळ आला असला तरी, त्यांनी धार्मिकतेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली आहे,’ असे आरोप आहेत. हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण एक स्थापत्यकार या एका दृष्टीकोनातून पहायचे झाल्यास, मोदींची तुलना देशाच्या पहिल्या पंतप्रधानांबरोबर करणे संयुक्तिक ठरेल. ही तुलना केवळ संख्यात्मक नाही, तर त्या प्रकल्पांच्या स्वरुपाबाबतही आहे.

मोदींनी भौगोलिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही क्षेत्रांवर प्रभाव टाकला आहे. तसे अपेक्षितच होते, कारण सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी हा त्यांनी निवडलेल्या राजकीय दिशेचा भाग आहे, पण त्याहून अधिक म्हणजे त्यांच्या पक्षाला आणि त्यांना स्वत:लाही एक मोठा जनाधार निर्माण करण्यासाठी प्रतिमानिर्मिती करणे आवश्‍यक होते.

दुसऱ्या बाजूला, नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीतील लोकप्रिय नेते म्हणून प्रथमपासूनच प्रस्थापित होते आणि त्यांचा काँग्रेस पक्ष कोणतीही निवडणूक सहज जिंकण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे मतांचा विचार न करता देशाचा विकास करण्याच्या आव्हानावर ते लक्ष केंद्रीत करू शकत होते. तसेच, धर्मनिरपेक्ष राष्ट्र संकल्पनेवर गाढ विश्‍वास असल्याने नेहरूंनी, ते ज्यांना आधुनिक भारतातील मंदिरे म्हणतात, अशा वास्तूंची उभारणी करत राष्ट्र उभारणीवर भर दिला. हिंदू भावनेला हात घालून सांस्कृतिक पुनरुज्जीवन करण्याची त्यांना आवश्‍यकता नव्हती. म्हणूनच त्यांनी मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले (भाक्रा-नांगल, हिराकुड आणि इतर काही), आणि अवजड उद्योगाची पायाभरणी केली.

यातूनच पोलाद आणि इतर धातूंची निर्मिती, औष्णिक विद्युत प्रकल्प उपकरणे, वाफेवरील आणि विद्युत रेल्वे इंजिन, रेल्वेचे डबे, रणगाडे आणि इतर उद्योगांना चालना मिळाली. त्यांची चंडीगड या शहराचीही निर्मिती केली. या सर्वांहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, नेहरूंनी वास्तुरचनेपेक्षाही अधिक कशाची तरी ‘बांधणी’ केली. त्यांनी अवकाश आणि अणुऊर्जा कार्यक्रम सुरु केले, तंत्रज्ञान संस्थांची आणि नव्या कृषी विद्यापीठांची स्थापना केली, आणि आधुनिक सांख्यिकी यंत्रणा निर्माण केली. राष्ट्रीयीकरण आणि एकत्रिकरण यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय स्टेट बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तेल आणि नैसर्गिक वायू आयोग आणि एअर इंडिया (नेहरूंच्या काळात या सेवेचे फार कौतुक झाले, सिंगापूरलाही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यास त्यांनी मदत केली) अशा सशक्त कंपन्या स्थापन केल्या.

नेहरूंना जितका कालावधी मिळाला, त्याच्या निम्माच कालावधी मोदी पंतप्रधान पदावर असल्याने, या दोघांच्या कामामध्ये तुलना करणे चुकीचे आहे, असे काहींचे म्हणणे असेल. मात्र, नेहरूंच्या नावावर नोंदले गेलेल्या प्रकल्पांपैकी बहुतेक प्रकल्प आणि योजना या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या दशकातीलच आहेत. अत्यंत तुटपुंजे स्रोत, बहुसंख्य अशिक्षित जनता आणि आयुष्यमान ३० वर्षांहून खाली, अशी देशाची स्थिती असताना हे प्रकल्प झाले आहेत. विशेष म्हणजे, नेहरूंनी बचतीचे आणि गुंतवणूकीचे (एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत) प्रमाण दुप्पट करून आणि विकासाचा वेग चौपट करत अनेक समस्यांवर मात केली.

Narendra Modi
कोल्हापूर : शैक्षणिक दर्जातील सुधारणेसाठी शासनातर्फे अभ्यास गट

संस्थात्मक क्षमता विकास या पातळीवर मोदींची तुलना केल्यास, त्यांनी वित्त क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यासाठी डिजिटल पायाभूत सेवा आणि तंत्रज्ञानाची पायाभरणी केली, स्टार्टअप कंपन्यांना बळ दिले, सरकारी योजनांना अधिक नियोजनबद्ध केले. हवामान बदलाचा सामना करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेलाही तशी दिशा दिली.

अशी विविध पातळ्यांवर तुलना केल्यानंतर कोण सर्वाधिक चांगला ‘स्थापत्यकार’ ठरतो? तुमची राजकीय विचारसरणी कोणती आहे आणि तुम्ही वास्तुरचना, संस्थात्मक स्वायत्तता, सुशासनाचे नियम आणि लोकशाही स्वातंत्र्य या सर्वांना किती प्रमाणात महत्त्व देता, यावर अवलंबून आहे.

टी. एन. नैनन

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com