प्रतिमा सुधारण्याची सौदीची खटपट

प्रतिमा सुधारण्याची सौदीची खटपट

पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे.

सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे करार बाजूला ठेवून त्यांच्या या दौऱ्यामुळे नेमके काय साधले, हे पाहणे गरजेचे आहे.

भारत भेटीत त्यांनी दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी सौदी अरेबिया कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले असले तरी, पुलवामाचा थेट उल्लेख टाळला आहे. पाकिस्तानचा विचार करता, त्या देशातून गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या दहशतवादी गटांनी भारतात आणि इराणमध्ये हल्ले केले आहेत.

अशा संवेदनशील काळात बिन सलमान यांची भेट ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी सुखद बाब आहे. पुलवामाचे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत भारत असताना आपण अजून मित्र राखून आहोत, असा संदेश इस्लामाबादने त्यातून दिला आहे. ‘कोणासमोर पैशांसाठी कटोरा घेऊन जाणार नाही’, अशी प्रचारसभांमध्ये गर्जना करून पंतप्रधानपदी ‘बसवलेले’ इम्रान खान पाकिस्तानच्या काळवंडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ‘कर्ज द्या’ म्हणून दोन वेळा सौदीमध्ये जाऊन बिन सलमान यांचे दार ठोठावून आले. निर्विवाद सत्ता गाजवत असलेले बिन सलमान हे सौदीत सगळे निर्णय घेतात. राजे सलमान यांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. इतर अनुभवी आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या राजपुत्रांना न जुमानता बिन सलमान हे सौदीचा गाडा रेटत आहेत. जगभरातील त्यांचे दौरे आणि बड्या नेत्यांच्या गाठीभेटींतून सौदी अरेबिया म्हणजे फक्त बिन सलमान ही बाब स्पष्ट होते. तब्बल वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक करू, असे बिन सलमान यांनी पाकिस्तानात जाहीर केले आहे. असाच मोठा आकडा त्यांनी भारतात जाहीर केला; पण जाहीर करणे आणि प्रत्यक्ष पैसे ओतणे यात फरक असतो. इम्रान खान मात्र बिन सलमान आणि इतर गब्बर श्रीमंत असलेल्या अरब युवराजांचे अगत्य करण्यात मश्‍गुल आहेत. तेलाचा अस्थिर बाजार आणि सौदी अर्थव्यवस्थेची तेलावरची मदार कमी करणे, हे डोक्‍यात ठेवून बिन सलमान इतर पर्याय शोधत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून आकाराला आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत बिन सलमान आणि सौदीने प्रत्यक्ष सहभागी होणे, ही महत्त्वाची बाब आहे.

सौदी आणि पाकिस्तान यांचा जुना दोस्ताना आहे. १९५१च्या मैत्री करारानंतर त्यांची दोस्ती बहरली आहे. आर्थिक पेच, राजकीय तणावाच्या वेळी, भूकंप असो वा पूर, सौदी अरेबिया कायमच पाकिस्तानच्या मदतीला धावला आहे. ‘तालिबान’ राजवट अधिकृतपणे मान्य करण्यात संयुक्त अरब अमिरातीबरोबरच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानदेखील होते.

पाकिस्तानच्या बहुतेक आजी-माजी नेत्यांचा सौदीसोबत घरोबा आहे. जनरल परवेज मुशर्रफ यांच्या राजवटीत तत्कालीन विरोधी पक्षनेते नवाज शरीफ यांना पाकिस्तानातून हद्दपार केल्यांनतर ते सौदीच्या आश्रयाला गेले होते.

पूर्वी, सौदीचे राजे फैजल बिन अब्दुल अझीज इब्न सौद यांनी पाकिस्तानला बक्कळ मदत केली होती. त्यांच्या या मदतीचा मान राखत नंतर लियालपूर या शहराचे नाव पाकिस्तान सरकारने फैसलाबाद असे बदलले. २०१५ मध्ये येमेनच्या लढाईत इराणपुरस्कृत गटाचा बीमोड करण्यासाठी सौदीने समस्त सुन्नी देशांची फौज गोळा केली. त्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी खोडा घातला होता. आता शरीफ यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्याकडून बिन सलमान यांना सुन्नी देशांच्या कंपूत पाकिस्तानच्या सहभागाची अपेक्षा आहे. राजकारणात कोणीच कोणाला असे काही फुकट देत नाही. इम्रान खान यांचे सरकार तर आधीच चीनच्या राक्षसी गुंतवणुकीच्या ओझ्याखाली दबले गेले आहे. आता पैसे टाकून बिन सलमान हे पाकिस्तानची आर्थिक नाडी आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहेत.

अधिकृतपणे अणुबाँब असलेला पाकिस्तान हा एकमेव मुस्लिम-बहुल देश आहे, ही बाबही येथे लक्षात घ्यावयास हवी.

२०१७ मध्ये सौदीचे राजे सलमान यांनी ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, मालदीव, चीन आणि जपानचा दौरा केला होता. देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीचे अनेक करार या दौऱ्यात झाले होते. किंबहुना मालदीव, इंडोनेशिया, मलेशियातील गेल्या काही दशकांच्या सौदीच्या गुंतवणुकीला धार्मिक रंग आहे. सौदी पैशांमुळे उपकृत झालेले हे देश आणि त्यांची अर्थव्यवस्था आतून पोखरली गेली आहे. वहाबी जिहादचा प्रसार सौदी या  पैशांच्या जोरावर जगभर पसरवतो आहे. तोच कित्ता बिन सलमान यांनी पाकिस्तानात गिरवला. आशिया खंडाच्या पूर्वेतील मैत्रीसंबंध सौदीच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आधीपासून आहेच. त्याची चिंता बिन सलमान यांना कधीच नव्हती. मात्र, पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर पाश्‍चात्य देशांनी त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर संशय घेत त्यांच्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. याचा प्रत्यय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अर्जेंटिनात भरलेल्या ‘जी-२०’ परिषदेत आला. खशोगी प्रकरणानंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीमध्ये त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय राळ उडविली गेली. या देशांमधील सौदीची गुंतवणूक, आर्थिक हित आणि सौदीच्या तेलाचे महत्त्व पाहता ते बिन सलमान यांना पूर्ण वाळीत टाकतील, अशी अजिबात शक्‍यता नाही. पडद्याआडून त्यांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेतच; पण त्याच वेळी, या पाश्‍चात्य देशांपैकी उघडपणे कोणी आपल्या गळ्यात गळा घालणार नाही, याची जाणीव बिन सलमान यांना आहे. चार महिने उलटून गेल्यानंतरही जमाल खशोगी प्रकरणाचे भूत त्यांचा पिच्छा सोडत नाही.

त्यामुळे, इतर सौदी राजपुत्र आणि भाऊबंदांना बाजूला सारत घरच्या आघाडीवर सुसाट निघालेल्या त्यांच्या रथाची गती आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता धीमी झाली आहे. एकाकीपणाचे सावट बाजूला सारताना, जागतिक पातळीवर सुरू असलेल्या उपेक्षेला छेद देत आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. तसेच, दबावाला न जुमानता, कच न खाता आपण काम करू शकतो, हेही त्यांना स्पष्ट करायचे होते. ते या दौऱ्यामुळे साध्य झाले आहे. मित्रत्वाला नव्याने मुलामा देत ते आपली बाजू भक्कम करत आहेत. पाकिस्तान, भारत, चीन या देशांच्या दौऱ्याबाबत आणि त्याच्या फलिताबाबत बिन सलमान यांना संशय नव्हताच. आपला प्रभाव फक्त अधोरेखित करण्याचे परिमाण त्यांच्या या दौऱ्याला होते. सवंग राजकीय फायदा पाहता त्यांचे पोट कायम भरलेले होतेच, या दौऱ्यात वाईट काळातील तजवीज करून त्यांनी तृप्तीची ढेकर तेवढी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com