दलित स्त्रीच्या आत्मभानाचा हुंकार

मुक्ता साळवेचे कल्पनाचित्र
मुक्ता साळवेचे कल्पनाचित्र

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची विद्यार्थिनी असलेल्या चौदा वर्षांच्या मुक्ता साळवे हिने त्या काळात ‘महार-मांगांच्या दुःखाविषयी’ हा निबंध लिहिला. धर्मचिकित्सेचे धाडस दाखवत सामाजिक विषमता, महिलांचं शोषण याविरुद्ध तिनं या निबंधातून आवाज उठवला. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुक्ता साळवेच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

भारताच्या सांस्कृतिक- सामाजिक इतिहासात स्रियांचं जीवन हे बालविवाह, विधवांचं केशवपन, सतीची चाल, वारसा हक्काचा अभाव अशा अनेक रूढी-परंपरांच्या दास्यात जखडलं गेलं होतं. अज्ञान हेच स्रीच्या शोषणाचं मूळ कारण आहे, हे ओळखून सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी समाजात ज्ञानाची ज्योत लावण्याचं काम केलं. स्रीच्या वाट्याला आलेलं दुःख हे शिक्षणानेच दूर होऊ शकतं, हे ओळखून या दोघांनी अनेक संघर्षातून पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या शाळेत मुक्ता साळवे ही विद्यार्थिनी होती. लहान वयातील पहिली दलित स्त्रीवादी लेखिका म्हणून मुक्ता साळवेचं नाव घेतलं जातं. मुक्ताच्या निबंधापासूनच दलित साहित्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. ब्रिटिशकाळातील आणि पेशवेकाळातील अस्पृश्‍यांच्या परिस्थितीचं सखोल विश्‍लेषण करून अतिशय लहान वयात त्या परिस्थितीकडे चिकित्सक नजरेतून बघून व्यवस्थेला सडेतोड प्रश्‍न विचारण्याचं काम मुक्तानं केलं.

जातिव्यवस्थेच्या निर्मूलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली; पण १९व्या शतकात वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी मुक्तानं ‘महार-मांगांच्या दुःखाविषयी’ हा निबंध लिहून सनातन्यांची झोप उडवली होती. हा निबंध या समाजांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करतो. ज्या काळात बाईचं व्यक्तित्व,अस्तित्व नाकारलं जात होतं, (आजही त्यात फार बदल झालेला नाही.) अशा काळात लिंगभावाच्या, तसेच जातीच्या चौकटींना भिडण्याचं धाडस मुक्तानं केलं.

शोषणाला विरोध
दुःखाचा शोध घेताना समाजव्यवस्थेची मीमांसा करावी लागते, असं धर्मानंद कोसंबी म्हणतात. आपल्या दुःखाच्या कारणांचा शोध घेण्याचं व त्याची मीमांसा करण्याचं असंच काम मुक्तानं तिच्या निबंधातून केलं. तिनं तिच्या निबंधातून हिंदू धर्मातील अस्पृश्‍यांना गुलाम बनविणाऱ्या रूढी, मूठभर लोकांचं धर्मशासन, सामाजिक असमानता, महिलांविरुद्धची हिंसा, शोषण याविरुद्ध आवाज उठवला. धर्म-संस्कृती, रूढी- परंपरांद्वारे होणाऱ्या हिंसेला प्रखर विरोध केला. ती लिहिते, ‘ब्राह्मण आम्हांला वेद वाचू देत नाहीत. ते म्हणतात, की वेद तर आमचीच मक्तेदारी आहे, आम्हीच त्याचं अवलोकन करू. ह्यावरून उघड दिसते की आम्हांस धर्मपुस्तक नाही; तर मग आम्ही धर्मरहित नाही का? मुसलमान लोक कुराणाच्या आधारे, इंग्रज लोक बायबलच्या आधारे व ब्राह्मण लोक वेदांच्या आधारे चालतात. म्हणूनच तर ते आमच्यापेक्षा सुखी नाहीत का? हे भगवान, आम्हालाही आमचा धर्म कोणता ते सांग. आम्हीही त्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे यासारखे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व अशा धर्माचा फाजील अभिमान करावा असे आमच्या मनात देखील येऊ नये.’ स्त्रीला जोखडात ठेवणाऱ्या धर्माला प्रश्‍न विचारण्याचं धाडस करून, खरा धर्म काय असू शकतो याचा प्रत्येकाला विचार करण्यास मुक्ता भाग पाडते.

जातीय विषमतेवर टीका
मुक्ता जातीय विषमतेवरही कडाडून टीका करते. ती म्हणते, की ‘आम्हां महार- मांगाना लुबाडून उच्च जातीतल्या लोकांनी आमच्या जमिनी बळकावल्या व त्यावर त्यांच्या इमारती बांधल्या. आम्हांला गाई-म्हशींपेक्षाही नीच मानलं गेलं. ज्या वेळी बाजीरावाचं राज्य होतं तेव्हा मांग किंवा महार तालीमखान्यासमोरून गेला तर त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून मैदानात खेळत होते. गाढवाला मारल्यावर तरी त्याचा मालक गाढवाची फटफजिती का केली? याचा जाब विचारतो. पण महार- मांगांना मारल्यावर असं विचारणारं कुणी आहे का?’ असा प्रश्‍न विचारून मुक्ता दांभिकांना हलवून सोडते. ज्या काळात जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जात होता, त्या काळात शिक्षणाचा प्रश्‍न तर लांबच राहिला. ज्या काळात या समाजांच्या लोकांच्या सावलीचाही प्रश्‍न नाकारला जात होता, तिथं त्यांना चाकरी कोण देणार? त्यांचं पोट कसं भरणार? असे अनेक प्रश्‍न आ वासून उभे असताना मुक्ता पंडितांना म्हणते, की ‘हे पंडितहो, तुमचे स्वार्थी, आपलपोटे पांडित्य पूजेसाहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याकडे लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते. म्हणून हिव, पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा.’ असे म्हणून ती एकंदरीतच स्त्रियांच्या शोषणाकडे सर्वांचं लक्ष वेधते.

दुःखावर ज्ञानरूपी औषध  
लिंगभाव असमानतेमुळे स्री वारंवार अन्यायाला सामोरं जातेच; पण त्याहीपेक्षा जातीच्या विषम उतरंडीमुळे अस्पृश्‍य स्त्रीला वारंवार जातीयवादी, पितृसत्ताक मानसिकतेला सामोरं जावं लागतं. कारण लिंगभाव असमानता आणि जातीय उतरंड हे हातात हात घालून काम करत असतात. मुक्ता ही फक्त समाजव्यवस्थेची मीमांसा करून थांबत नाही, तर ती या शोषणाधारित सामाजिक गुंतागुंतीचं निवारण आपण कसं करू शकतो यावरही लिहिते. ‘Oh, the mahars & mangs, you are poor and sick. Only the medicine of knowledge will cure and heal you.‘ ‘ज्ञानरूपी औषधच आपल्या मनातील कुकल्पना मारून टाकण्यासाठी मदत करू शकतं. ते आपल्याला दारिद्य्र व दुःखातून बाहेर काढेल’, असा विश्‍वास ती देते. आज २१ व्या शतकातही ‘ऑनर किलिंग’, बलात्कार, जाती-धर्माच्या नावावर होणारी हिंसा अशा अनेक घटना घडत असताना मुक्ता साळवेची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

स्री म्हणून लादल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या निर्बंधाना झटकून टाकण्याचं व अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ सावित्रीबाई आणि जोतिरावांच्या माध्यमातून मुक्ताला मिळालं खरं; परंतु मुक्ताचं पुढे काय झालं? तिने पुढे लिहिलं का? लिहिलं असेल तर तिचं इतर लिखाण कुठे गेलं? असे अनेक प्रश्‍न आजही अनुत्तरित आहेत. कदाचित हेच या सत्तासंरचनेचं बळ असेल काय?
संदर्भ : महार-मांगांच्या दुःखाविषयी -
मुक्ता साळवे (ज्ञानोदय, १८५५), 
महापुरुषांच्या नजरेतून स्री - मंगला आठलेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com