चिनी समाजवाद नव्या वळणावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसमध्ये चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ, अध्यक्ष शी जिनपिंग व  माजी अध्यक्ष जियांग झेमिन व इतर.

चिनी समाजवाद नव्या वळणावर

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे.

चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील विविध क्षेत्रांतील पक्षशाखांमधून काळजीपूर्वक निवडण्यात आलेले २३०० प्रतिनिधी या आठवडाभराच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ही पंचवार्षिक काँग्रेस तीन बाबींसाठी महत्त्वाची आहे. एक, पुढील पाच वर्षांसाठी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची नेमणूक करणे. दोन, चीनच्या विकासाची सद्यःस्थिती, मुख्य समस्या आणि त्यावरील उपाय हा काँग्रेसमधील चर्चेचा गाभा आहे. तीन, कम्युनिस्ट पक्षानुसार जागतिक पटलावर चीनच्या शक्तीचे व भूमिकेचे आकलन काँग्रेसमधील चर्चेतून होणे अपेक्षित आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये पक्षाचे सरचिटणीस, पॉलिट ब्युरोची सहा किंवा सात सदस्यीय स्थायी समिती, २४ ते २६ सदस्यीय पॉलिट ब्युरो आणि २०४ सदस्यीय केंद्रीय समिती यांचा समावेश होतो. चीनचे केंद्र सरकार किंवा प्रांतीय सरकारांमध्ये महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान मिळवणे आवश्‍यक असल्याने काँग्रेसच्या  प्रतिनिधींमध्ये यासाठी नेहमीच चुरस असते. गेल्या वीस वर्षांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने स्वीकारलेल्या नेतृत्व परिवर्तनाच्या संकेतांनुसार पक्षाच्या सरचिटणीसाला प्रत्येकी पाच वर्षांचे दोन कालावधी देण्यात येतात आणि तीच व्यक्ती देशाची अध्यक्ष असते. यानुसार विद्यमान सरचिटणीस शी जिनपिंग यांची पक्ष व देशाच्या प्रमुखपदी फेरनियुक्ती होणार यात काहीच शंका नव्हती.

शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केचियांग यांनी पाच वर्षांनी निवृत्ती स्वीकारणे अपेक्षित असल्याने त्यांच्या व्यतिरिक्त ज्या चार- पाच नेत्यांचा स्थायी समितीत समावेश होईल, त्यांच्यापैकी एकाच्या हाती २०२२ मध्ये चीनची सूत्रे सोपवली जाणे अपेक्षित आहे. ६९ वर्षांवरील व्यक्तींची पॉलिट ब्युरोत नेमणूक न करण्याचा कम्युनिस्ट पक्षाचा पायंडा आहे आणि वर्तमान पॉलिट ब्युरोतील बहुतांश सदस्य यंदा निवृत्त होत असल्याने नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

सरचिटणीस शी जिनपिंग यांनी काँग्रेसपुढे सादर केलेल्या पंचवार्षिक अहवालात चीनमधील समाजवाद नव्या युगात प्रवेश करत असल्याचे ठासून सांगितले. त्यांनी सव्वा तीन तासांच्या प्रदीर्घ भाषणात तीन बाबींवर भर देत चीनच्या पुढील वाटचालीचे सूतोवाच केले. एक, एकविसाव्या शतकातील दोन निर्धारित उद्दिष्टे प्राप्त करण्याची सुवर्णसंधी चीनकडे आहे. ‘मध्यम समृद्ध समाजाचे निर्माण’ हे पहिले उद्दिष्ट २०२१ पर्यंत साध्य होईल, अशी ग्वाही शी जिनपिंग यांनी दिली आहे. २०२१मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याचा अर्थ, पुढील चार वर्षांमध्ये देशातील गरिबीचे समूळ उच्चाटन करावे लागेल. सध्या चीनमध्ये गरिबी रेषेखालील लोकांची अधिकृत संख्या सात कोटी आहे. याशिवाय, सर्वांना परवडणारे शिक्षण व आरोग्यसुविधा आणि ज्येष्ठांना पेन्शन सुनिश्‍चित करावे लागेल. या शतकातील दुसरे उद्दिष्ट आहे ‘महान आधुनिक समाजवादी व्यवस्थे’ची स्थापना करणे! २०२१नंतर चीनची या दिशेने वाटचाल सुरू होईल आणि २०४९ मध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. त्यावर्षी चीनमध्ये माओ त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी गणराज्याची स्थापना झाल्याला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. ही ‘आधुनिक समाजवादी व्यवस्था’ नेमकी कशी असेल, याचे शी जिनपिंग यांनी वर्णन केलेले नाही. चीनच्या आधुनिकीकरणाचे प्रणेते तेंग शिओपिंग यांनी म्हटल्याप्रमाणे समाजवादाची प्राथमिक अवस्था प्राप्त होण्याचा तो काळ असेल असा कयास आपण बांधू शकतो. मात्र, हे मार्गक्रमण सोपे नसेल, असा शी जिनपिंग यांनी दिलेला इशारा ही चीनच्या नव्या युगासंदर्भातील दुसरी महत्त्वाची बाब आहे.

एकीकडे असंतुलित व अपुरा विकास आणि दुसरीकडे लोकांच्या चांगल्या जीवनमानासाठीच्या सतत वाढत असलेल्या गरजा हा चीनमधील मुख्य विरोधाभास आणि कम्युनिस्ट पक्षापुढील प्रमुख आव्हान असल्याचे शी जिनपिंग यांनी प्रतिपादित केले आहे. नव्या युगाबाबत त्यांनी मांडलेला तिसरा मंत्र म्हणजे कायद्यांच्या चौकटी निर्माण करत त्यांची अंमलबजावणी कम्युनिस्ट पक्षाच्या यंत्रणेद्वारे करण्यात येईल. म्हणजेच कायद्याची चौकट व कम्युनिस्ट पक्षाची चौकट एकमेकांमध्ये गुंफलेली असेल. अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजवादी कायदे व त्यांचे सिद्धांत विकसित करण्याची गरज शी जिनपिंग यांनी बोलून दाखवली आहे.

एकोणीसाव्या काँग्रेसने साम्यवादी पक्षाच्या घटनेत ‘शी जिनपिंग यांचे चिनी वैशिष्ट्यांच्या समाजवादाच्या नव्या युगाचे विचार’ अशी ओळ अंतर्भूत करत शी जिनपिंग यांना माओ व तेंग यांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. त्यांच्या आधीचे पक्षाचे सरचिटणीस व राष्ट्राध्यक्ष राहिलेले जिआंग झेमिन आणि हु जिंताव यांच्या उपस्थितीत शी जिनपिंग यांनी ही किमया करून दाखवली, हे विशेष!

कम्युनिस्ट पक्षाच्या या काँग्रेसमधील चर्चांचा सूर हा चीनचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील आत्मविश्वास व आक्रमकता कायम ठेवण्याकडेच होता. ‘वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्था चीन-केंद्रित करण्याचा मानस शी जिनपिंग यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे व्यक्त केला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, चीनच्या विकासाचे मॉडेल इतर विकसनशील देशांच्या उपयोगाचे असल्याचे माओनंतरच्या काळात प्रथमच कम्युनिस्ट पक्षाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे चिनी संस्कृती व सभ्यतेतून इतर देशांना प्रेरणा मिळू शकेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. विसाव्या शतकात ज्याप्रमाणे अमेरिकी संस्कृती व सोव्हिएत सभ्यता यांचा जोरकस प्रचार झाला होता, त्याप्रकारे चिनी संस्कृती व सभ्यतेचा चांगुलपणा जगावर बिंबवण्याचा विडा कम्युनिस्ट पक्षाने उचलल्याचे सूचित झाले आहे.

एकंदरीत, कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून चीनच्या राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस १९ व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे.