अग्रलेख : पक्षनिष्ठा लिलावात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. 

कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी आपल्या हातावरील घड्याळ काढून तेथे ‘शिवबंधन’ बांधून घेतले आहे.

आहिर हे शरद पवार यांचे मुंबईतील ‘ब्लू आईड बॉय’ होते, त्यामुळे ‘राष्ट्रवादी काँग्रेस’साठी हा मोठा धक्‍का आहे. त्याचवेळी ‘राष्ट्रवादी’चे आणखी एक बडे नेते छगन भुजबळ यांची वाटचालही त्याच दिशेने सुरू असल्याची चर्चाही सुरू झाली. पण दस्तुरखुद्द भुजबळांनीच त्याचा इन्कार केला. मात्र, त्याचवेळी ‘मी आता आणखी काही बोलणार नाही; पण योग्य वेळी बोलेन’ असे उद्‌गार काढून त्यांनी संशयाची फट कायम ठेवलीच. आहिर यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे राज्याच्या राजधानीत आधीच कमकुवत असलेल्या ‘राष्ट्रवादी’ला मोठे खिंडार पडले आहे. भुजबळ हेही खरे तर मुंबईचेच एके काळचे बडे नेते; पण त्यांचा या महानगरातील जनाधार केव्हाच संपला आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना आपल्याच नाशिक जिल्ह्यात पाय रोवावे लागले. गुरुवारची सकाळ अशा रीतीने ‘राष्ट्रवादी’साठी धक्‍कादायक तर ठरलीच; पण त्यामुळेच शिवसेना तसेच भाजप यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील रणनीतीही स्पष्ट झाली. सत्ताधारी आघाडीतील हे दोन प्रमुख पक्ष लोकसभा निवडणुकीतील प्रेमालाप बाजूला सारून पुनश्‍च एकवार एकमेकांशी झुंजताना दिसत असले, तरी आपले म्हणजेच ‘युती’चे महाराष्ट्रावरील राज्य पुढची आणखी किमान पाच वर्षे तरी कायमच राहणार, याची त्यांना खात्री झाली आहे. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस तसेच ‘राष्ट्रवादी’ या प्रमुख विरोधकांचे नामोनिशाणही शिल्लक राहता कामा नये, यासाठी या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी चंग बांधला आहे. आहिर यांनी हा शिवसेनाप्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी आपली ‘राष्ट्रवादी’तील काही नेत्यांशी चर्चाही झाल्याचे सांगितले. त्यांनी ही चर्चा कोणत्या नेत्यांशी केली असणार, ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात त्या पक्षाला आणखी काही मोठे हादरे बसले, तर नवल नाही. 

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून शिवसेनेचे जन्मजात वारसदार आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ सुरू झाली आहे. तर येत्या एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे ‘जनादेश यात्रा’ सुरू करत आहेत. या दोन्ही यात्रांमुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याचे चित्र प्रथमदर्शनी जरूर निर्माण झाले आहे. मात्र, ते फसवे आहे. हे दोन्ही पक्ष भले एकमेकांच्या विरोधात लढले तरी ते निकालांनंतर सत्तेसाठी एकत्र येणार, हे प्रमोद महाजन यांच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचे झाले तर ‘ते काळ्या दगडावर पांढऱ्या अक्षरांत लिहिलेले आहे’! त्यामुळे या दोन्ही यात्रांमागील उद्देश हा केवळ काँग्रेस तसेच ‘राष्ट्रवादी’ यांचा गावागावांतील पाया उखडून टाकणे, हाच आहे.

फडणवीस यांच्या यात्रेसंबंधात काहीही बोलण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आहिर यांच्या ‘शिवबंधन सोहळ्या’नंतर नकार दिला. मात्र, ‘फडणवीस यांनी तुम्हालाही या यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे!’ असे पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच, ‘आमची युती किती घट्ट आहे, तेच यावरून दिसते!’ असे उत्तर त्यांनी दिले. शिवाय, या दोन्ही यात्रा युतीची सत्ता आणण्यासाठीच आहेत, असेही त्यांनी सांगून टाकले. या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे आणि त्यामुळेच येत्या निवडणुका जिंकण्यापेक्षाही स्वपक्षातील नेत्यांना आपल्याबरोबरच ठेवण्याचे आणखी एक मोठे आव्हान काँग्रेस तसेच ‘राष्ट्रवादी’ यांच्यापुढे उभे राहिले आहे. या साऱ्या खेळखंडोब्यास या दोन्ही पक्षांतील नेत्यांची आगंतूक वक्‍तव्ये कारणीभूत ठरल्याचे दिसते.

‘राष्ट्रवादी’त अलीकडेच प्रवेश करून लोकसभा निवडणूक जिंकणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना मुंबईची जबाबदारी देण्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्‍तव्य आहिर यांना नाराज करून गेले; त्यामुळेच त्यांनी ‘मातोश्री’चा रस्ता धरला, असे सांगितले जाते. कोल्हे यांना पुढे आणण्यामागे पक्षातील सामाजिक समीकरणे नीट जुळविण्याचा ‘राष्ट्रवादी’चा प्रयत्न असू शकतो. त्यातून होणाऱ्या राजकीय परिणामांना पक्षाला तोंड द्यावे लागत आहे. 

फडणवीस यांच्या तीनशे तालुक्‍यांतून जाणाऱ्या यात्रेत गावोगावी ‘राष्ट्रवादी’ वा काँग्रेस नेत्यांचे भाजपप्रवेश बघायला मिळाल्याचे दिसू शकतात. अर्थात, शिवसेना-भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्‍तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही केले आहे! त्याची टिंगल-टवाळीही सत्ताधारी आघाडीकडून सुरू झाली आहे. त्यात बिलकूलच तथ्य नसेल, असे मानण्याचे कारण नाही. मध्य प्रदेशात दोन भाजप आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने केलेले मतदान हे वारे उलट्या दिशेनेही वाहू शकतात, याचेच निदर्शक आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच नेत्यांची ही आवक-जावक सुरू झाल्याचीच ही चिन्हे आहेत. सत्तेसाठी पक्षनिष्ठा कोणीही आणि कशाही बासनात बांधून ठेवू शकतो, त्याचे हे कमालीचे विदारक चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article on Politics