भाष्य : ‘कोरोना’चे राजकारण आणि पेच

प्रा. प्रकाश पवार
बुधवार, 8 एप्रिल 2020

‘कोरोना’ विषाणू साथीच्या आजारांचा प्रतिकार एकटा दुकट्याने शक्य नाही. त्यामुळे ही जबाबदारी संस्थांकडे जाते. यामध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, राज्यसंस्था, भांडवलशाही यांचा समावेश होतो. या संस्था `कोरोना`च्या निर्मूलनासाठी काम करत आहेत; परंतु या संस्था केवळ एवढेच काम करत आहेत, असे नव्हे. या आपत्तीच्या निमित्ताने या संस्था त्यांचे त्यांचे राजकारणही करत आहेत.

सध्या समोर ठाकलेल्या कोरोना विषाणूच्या साथीचे संकट सर्वव्यापी आहे. भांडवलशाही व्यवस्थेतील पेच व संघर्ष त्यातून समोर आले आहेत. त्यात वैचारिक पेचही अंतर्भूत असून राजकारणाच्या माध्यमातूनच ते सोडवावे लागणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोरोना’ विषाणू साथीच्या आजारांचा प्रतिकार एकटा दुकट्याने शक्य नाही. त्यामुळे ही जबाबदारी संस्थांकडे जाते. यामध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, राज्यसंस्था, भांडवलशाही यांचा समावेश होतो. या संस्था `कोरोना`च्या निर्मूलनासाठी काम करत आहेत; परंतु या संस्था केवळ एवढेच काम करत आहेत, असे नव्हे. या आपत्तीच्या निमित्ताने या संस्था त्यांचे त्यांचे राजकारणही करत आहेत.

निव्वळ नफेखोरीवर आणि लागेबांध्यांवर चालणारी भांडवलशाही ही संस्था तर हे राजकारण जास्त आक्रमक पवित्रा घेऊन करत आहे. तिच्या अस्तित्वाचा लढा तिने चिकाटीने सुरू ठेवला आहे. विशेषतः: चीन व पाश्चिमात्य देशात ही स्पर्धा सुरू झाली आहे. ही स्पर्धा म्हणजे ‘साटेलोटे भांडवलशाही’मधील अंतर्गत संघर्ष आहे. ती एक मोठी शोकांतिका आहे. या कथेमुळे व कोरोनामुळे भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे; तर प्रादेशिक पक्षांना थोडी मोकळी भूमिका घेता आली, असे दिसते.
कोरोनाची साथ चीनच्या भांडवलशाहीने जन्माला घातली, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हा एक ‘जैविक साम्राज्यवादा’चा प्रकार आहे. चीन हा एक जागतिक आर्थिक स्पर्धक आहे. त्यातून अमेरिकेने हा सगळा प्रकार चीनच्या डावपेचांचा एक भाग ठरवला. याविषयी आत्ताच काही ठोस विधान करणे शक्य नसले तरी यानिमित्ताने भांडवलशाही स्पर्धेची चुणूक दिसतेच. चीनने आपल्या देशातील मृतांचा आकडा खरा सांगितला आहे, असे इतर कोणी मानायला तयार नाही. ‘मांजर कोणत्या रंगाचे आहे याला महत्त्व नाही ते उंदीर मारते किंवा नाही, हे महत्त्वाचे आहे.’

या डेंग यांच्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या टप्यात चिनी आणि पाश्चिमात्य साटेलोटे भांडवलशाही यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. युरोपियन देश आणि अमेरिका यांना चिनी साटेलोटे भांडवलशाहीने घेरले. या महायुद्धात माणसाची हत्या होत आहे. यामुळे पाश्चिमात्य आणि चीनी साटेलोटे भांडवलशाही कोरोनाच्या माध्यमातून मानवतेची हत्या करत आहेत. म्हणून चिनी व अमेरिकी ही दोन्ही रुपे हिंसक आहेत. चीनमधील कंपन्या सध्या शेअर विकत घेत आहेत, हे वास्तव बोलके आहे. ‘अलीबाबा’ (१.५४ टक्के) आणि ‘टेनसेंट’ने (०.३९) नफा मिळवला आहे. या तपशिलाचा अर्थ चीन कोरोनाच्या आडून भांडवलशाहीचे हितसंबंध जपते. यासाठी त्या देशातील नेतृत्व देखील काम करते. या साटेलोटे भांडवलशाहीपेक्षा भारतीय भूमिका वेगळी आहे.

कारण भारतीय राजकारणाची दिशा आणि धारणा माणसाच्या अस्तित्वाची सतत राहिली आहे. भारताने साटेलोटे भांडवलशाहीच्या अमानवी राजकारणाविरोधात नेतृत्व केले पाहिजे. भारताने कोरोनाच्या निमित्ताने पर्याय दिला पाहिजे. या आघाडीवर पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याची एक संधी उपलब्ध आहे. ही संधी मानवतावादी राजकारण नव्यानेच सुरू करण्यासंदर्भातील आहे. भारताने साटेलोटे भांडवलशाहीच्या सुरात सूर मिसळून जाऊ नये. भारतीय राजकारणाची दिशा यामुळे पाश्चिमात्य व चिनी साटेलोटे भांडवलशाही विरोधात घडेल. या अर्थाने कोरोनाचे महायुद्ध भारतासाठी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्यापेक्षा मोठे आहे.

तसेच हा प्रश्न गंभीर आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा आणि चीनपेक्षा वेगळी दृष्टी भारताकडे आहे. ती मानवतावादी राजकारणाची दृष्टी आहे. भारतातील कोरोना विरोधातील लढा देशांतर्गत नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच विश्र्वाला नवीन दृष्टी देणारा आहे. अमेरिकेला, युरोपला थॉमस पेनच्या मानवतावादी दृष्टीचा विसर पडला आहे. तसा भारतीयांना महात्मा फुले, न्या. रानडे, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर, नेहरू यांचा विसर पडू देऊ नये.

राजकीय कोंडी
कोरोनाने भारतीय राजकारणाच्या पुढे नवीन आव्हान उभे केले आहे. या विषयावर राजकीय पक्ष, नेते आणि जनता यांच्यात मतभेद टोकाचे आहेत. राजकारणात मतभिन्नता असतेच. परंतु राष्ट्रीय व सार्वजनिक आरोग्यासाठी मतभिन्नता दूर ठेवता येते. यांचे भान राहिलेले नाही. कारण कोरोनाचा प्रश्न अजूनही गंभीरपणे घेतला गेला नाही. या संदर्भातील दोन तीन उदाहरणे लक्षवेधक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदी, टाळी व थाळी, लाकडाऊन जाहीर केला, दिवे लावण्याची ताकद दिली. ही गोष्ट चांगली कामगिरी आहे. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी याकाळात सामूहिक पूजा केली. दिल्लीतही तबलीगी समूहाने सार्वजनिक आरोग्याच्या काळजीचा भाग धाब्यावर बसवून धार्मिक भावना महत्त्वाची मानली. यामुळे दोन मुद्दे पुढे आले आहेत. एक, आरोग्यासाठी पूजा आणि व्यक्तीचे अस्तित्व यापैकी एकाची निवड करावी लागेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व पंतप्रधान या दोन्ही सत्ताधारी व्यक्ती एकाच पक्षाच्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अशा अतिशय महत्त्वाच्या दोन सत्तांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव दिसतो. हे पंतप्रधानांच्या पुढील मोठे आव्हान आहे.

यापेक्षा वेगळी घटना महाराष्ट्र आणि केरळमध्ये घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात कोरोना संदर्भात योग्य वेळी चांगले निर्णय घेतले. त्यांच्या पक्षाला हिंदुत्वाची मोठी परंपरा आहे. तरीही त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून संकटाला पायबंद घालण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्र किंवा केरळ ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळत आहेत तो राजकारणाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे. साटेलोटे भांडवलशाहीच्या विरोधात ते भूमिका घेत आहेत. शिवसेनेचा पाठीराखा समूह जवळपास कामगार, भूमिपुत्र असा कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे शिवसेनेला हे शक्य होत आहे. भाजपची या मुद्द्यावर कोंडी होत आहे. याचे कारण भाजपचा समर्थक समूह आणि भांडवलशाही यांच्यामध्ये   एक समान धागा आहे. परंपरागत समाज, व्यापारी, उच्च मध्यमवर्गीय यांच्याविरोधात भूमिका भाजपला सुस्पष्टपणे घेता येत नाही. ही मोठी कोंडी भाजपची झाली आहे.

भारतात देशबंदी, राज्यबंदी, जिल्हाबंदी, गावंबंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टींची गरज सारासार विवेकानुसार आहे. परंतु या बरोबरच गरिबांचे शहरात स्थलांतर झाले होते. अशा गरिबांना शहरात घर नाही. गावात बंदी घालण्यात आली. यामुळे गाव माणुसकीच्या विरोधात जात आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलिस अशा क्षेत्रातील नागरिक धोका पत्करून लढा चिकाटीने देत आहेत. अशा वेळी गावांनी बंदी घालणे अशा विसंगती निर्माण होतील. त्या विसंगती जास्त घातक ठरू शकतात.

महाराष्ट्र सरकार आणि सरकारी यंत्रणा कृतीशाली झाल्या आहेत. राज्यसंस्थेला गावांनी मदत करावी. कारण गाव माणुसकीचे मंदिर आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास असलेले आहे. ही दृष्टी गावाची खरी ताकद आहे. ही ताकद शहरांची नाही. महात्मा गांधी यांची ही दृष्टी होती. ती जिल्ह्याला, राज्याला, देशाला आणि जगाला साटेलोटे भांडवलशाही विरोधात लढण्याचे बळ देते. हा भारतीय राजकारणाचा चेहरा आणि विचार आहे. सध्या समोर ठाकलेल्या संकटात वैचारिक पेचही अंतर्भूत असून  राजकारणाच्या माध्यमातूनच ते सोडवावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article prakash pawar