कर्तव्यावरील पोलिसांना द्या बळ

Beating-to-police
Beating-to-police

कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले म्हणजे कायदा हातात घेणे. अशा घटनांची गय न करता वेगाने कारवाई करून समाजविघातकांना धडा शिकवावा. तसेच समाजाने बघ्याची भुमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष मदत करणेच. तेही टाळावे, पोलिसांना सहाय्य करावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारने सांगितलेला कायदा राबविण्याचे कायदेशीर काम स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस करत असतात. हे कर्तव्यपुर्तीचे काम करत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी समाजातील काही पुरुष, महिला त्यांच्यावरच हल्ले करतात. त्यावेळेस सरकारने, न्यायालयाने आणि समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सर्वांनीच त्याची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे. या समाजविघातक प्रवृत्तींचा बिमोड करणे आवश्‍यक आहे. 

निंदनीय प्रकार, धाक हवाच
शुक्रवार, ता. २३ ऑक्‍टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबईतील काळबादेवी येथील गर्दीच्या भागात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या हवालदारांनी एका व्यक्तीस विना हेल्मेट मोटरसायकल चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याबद्दल थांबवले. हवालदार कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडत होते. त्याचवेळी पुरुष मोटारसायकलस्वार व महिला यांनी हुज्जत घालायला सुरवात केली. पोलिस अंमलदारावर अपशब्द वापरल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर त्या पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरुष मोटरसायकलस्वार करत होता. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला दिसतो. स्वतः नियमभंग करून उलट पोलिसांवर खोटेनाटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा हा उफराटा प्रयत्न दिसतो. त्यातूनच आम्ही पोलिसांची पर्वा करत नाही आणि आमचीच शिरजोरी चालू राहील, असा हा निंदनीय प्रकार आहे. 

दुसऱ्या एका घटनेत अंबरनाथ येथील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत चार गुन्हेगार पळून जातांना पाहून पोलिस हवालदारांनी त्यांना आडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या चार गुंडांनी भर चौकात या पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. तरीही त्या पोलिस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. अन्य एका घटनेत पंढरपूर येथील निवृत्त महिला अधिकाऱ्याने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताला चावा घेतला. 

गेल्या काही दिवसांत कोविडमुळे संचारबंदी असतानाही अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले होते. कायदा मोडायचा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करायचा ही दुर्दैवी प्रवृत्ती बळावू नये, यासाठी असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र पाठवून न्यायालयानेही अशा घटनांमध्ये तातडीने आरोपींना शिक्षा करण्याची आवश्‍यकता आहे. अमरावती येथे २०१२ मध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीला दोषी ठरविण्याचा निकाल आठ वर्षांनी २०२० मध्ये जाहीर करण्यात आला. उशीरा मिळणारा न्याय म्हणजे न्याय नाकारणे आहे, असे प्रसिद्ध तत्त्व आहे. 

बघे नकोत, हवे सक्रिय सहकार्य
कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होऊ नयेत, यासाठी हल्ला होत असतांना अशा घटनेच्या ठिकाणी उपस्थित जमावानेही पोलिसांच्या बाजूने तातडीने पुढे येणे, हस्तक्षेप करणे हे त्यांचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे. केवळ बघे म्हणून उभे राहून ते अशा समाजविघातक व्यक्तींना अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतात. याशिवाय ठिकठिकाणी बसवलेल्या सीसी टीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यास संबंधित व्यक्तींना हुज्जत घालायची संधीच मिळणार नाही. याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक करतांना दोन ते तीन पोलिस अंमलदार आणि त्यात एक महिला पोलिस कर्मचारी अशी व्यवस्था आवश्‍यक आहे. 

वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांशिवाय नाकाबंदी राबविणाऱ्या पोलिसांवरही दारू पिऊन गाडी चालविणारे, किंवा वेगाने गाडी चालविणारे, गाडी आदळतात. त्यामुळे अनेक पोलिस अंमलदार वेळोवेळी जखमी किंवा मृत झाले आहेत. ह्याशिवाय संशयित दरोडेखोर, चोर यांच्या राहण्याच्या वस्तीवर झडती घेण्यास जाणारे पोलिस हेही अनेकवेळा हल्ल्यांना बळी पडतात. अशा घटना पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्यास सहज टाळता येतील. जसे जिथे जायचे असेल त्या व्यक्तींसंबंधी, त्या जागेसंबंधी संपूर्ण माहितीचे संकलन करणे,त्या ठिकाणी जाण्यापूर्वी वरिष्ठांची पूर्वमान्यता घेणे व बरोबर पुरेसे सशस्त्र पोलीस घेऊन जाणे आवश्‍यक आहे. गणवेशात जाण्याचे बंधन कटाक्षाने पाळले पाहिजे, ज्यामुळे जमावाच्या संभाव्य हल्ल्यांपासून पोलिसांवर होणारे हल्ले नक्कीच टाळता येतील. अनेक ठिकाणी महिला आरोपीही पोलिसांवर हल्ला करतात हे ओळखून आठवणीने गणवेशातील महिला पोलिसही बरोबर नेणे गरजेचे आहे.

द्या आधुनिक यंत्रणा
पोलिसांनाही स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर, संपर्कासाठी वॉकीटॉकी आणि मोटारसायकल पुरविण्याची जबाबदारी सरकारने पार पाडणे आवश्‍यक आहे. समाजधुरीण, लोकप्रतिनिधी यांनीही आपल्या वागण्याने पोलिसांचा आणि कायदा राबवणाऱ्या संस्थांचा आदर करून समाजापुढे आदर्श ठेवण्याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्य व्यक्ती ही समाजधुरीणांच्या वर्तनाचे अनुकरण करत असते, हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. 

हल्ल्यांचे प्रसंग रोखण्यासाठी

  • हल्ल्याबाबत त्वरित दोषारोपपत्र न्यायालयात पाठवावे.
  • पोलिसांवर हल्ले होत असताना नागरिकांनीही तो रोखण्यासाठी पुढे यायला हवे.
  • पोलिसांच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा.
  • वाहतूक नियमनासाठी अधिक कर्मचारी नेमावेत.
  • पोलिस कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने पुरवावीत.
  • कारवाईसाठी जाताना पुरेशी दक्षता घेणे आवश्‍यक.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com