अग्रलेख  : पुरलेल्या नाल्यांचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

या वर्षीच्या पावसाने जाता जाता स्पष्ट सांगावा दिला. वातावरणातील बदलावर आणि पर्यावरण व्यवस्थेच्या अपरिमित हानीवर निसर्गाने जणू भाष्य केले. प्रश्‍न आहे तो त्यापासून आपण धडा घेणार का, हाच.

या वर्षीच्या पावसाने जाता जाता स्पष्ट सांगावा दिला. वातावरणातील बदलावर आणि पर्यावरण व्यवस्थेच्या अपरिमित हानीवर निसर्गाने जणू भाष्य केले. प्रश्‍न आहे तो त्यापासून आपण धडा घेणार का, हाच.

अनिर्बंध नागरीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या शहरांना भोगाव्या लागणाऱ्या  यातनांची झलक बुधवारी रात्री पुण्याला अनुभवायला मिळाली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले.तो थरारक, वेदनादायी अनुभव या शहरातील हजारो नागरिकांनी घेतला. पावसाने घातलेल्या थैमानात शेकडो संसार वाहून गेले. पै पै साठवून घेतलेली वाहने पाण्याच्या प्रवाहाने ठोकरून चुरून कुठच्या कुठे नेली. निरपराधांचे बळी गेले. कामावरून घरी परतणारे शेकडो नागरिक रस्त्यात अधेमधे अडकून पडले आणि त्यांची कुटुंबे रात्रभर काळजीने तगमगत राहिली. पहाटे जाग आली, तेव्हा दिसली प्रामुख्याने दक्षिणेकडील विकसित होऊ पाहणाऱ्या उपनगरांमध्ये रात्रीच्या रौद्र पावसाने झालेली अफाट हानी. सोमवारी आणि मंगळवारी रात्रीच्या पावसाने एकूण परिस्थितीची झलक दाखविली होती. बुधवारी रात्री कहर झाला. रात्री नऊनंतर सुरू झालेला पाऊस पुढचे तीन-चार तास अक्षरशः कोसळत राहिला. विशेषतः दक्षिण पुण्यातील आंबील ओढा आणि त्याला जोडणाऱ्या नाल्यांनी बांध सोडला. रस्त्यांनाच ओढ्यांचे स्वरूप आले. पाहता पाहता पुण्याचा मोठा भौगोलिक परिसर अकल्पित संकटात सापडला. वर्दळीच्या सी. डी. देशमुख रस्ता (सातारा रस्ता), तानाजी मालुसरे पथ (सिंहगड रस्ता) या दोन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली. शंकर महाराज उड्डाणपुलावर पाणी साठले. मेट्रोचे बांधकाम सुरू असलेला कर्वे रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे मंदावला. अवघ्या तीन तासांमध्ये रस्ते आणि ओढे-नाले यातील भेद मिटून गेला. संपूर्ण परिसर जलमय झाला. मंगळवारी रात्री महानगरीच्या पश्‍चिमेकडे पिंपरी चिंचवडच्या उपनगरांमधील रस्ते पुरसदृश स्थितीमुळे बंद पडले. जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान केंद्र हिंजवडीत हजारो कर्मचारी वाहतूक कोंडीत तीन तासांहून अधिक काळ अडकून पडले. एकूणच यावर्षीच्या पावसाने जाता जाता स्पष्ट सांगावा दिला. वातावरणातील बदलावर आणि पर्यावरण व्यवस्थेच्या अपरिमीत हानीवर निसर्गाने भाष्य केले. ज्या त्या भौगोलिक परिसराची स्वतःची नैसर्गिक परिसंस्था असते. ही परिसंस्था भीषण गतीने नष्ट करण्याची चढाओढ सुरू आहे. सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरून डोंगर तोडून, टेकड्या सफाचाट करून, नाले-ओढे जमिनीत पुरून आणि शक्‍य तितके प्रदूषण नदीच्या हवाली करून पुढे जाण्याची घाई लागली आहे. याच घाईला विकास असे गोंडस नाव देऊ केले आहे. पावसाने दाखवून दिलेली भयावह वस्तुस्थिती या गोंडस नावाने झाकता येणार नाही. नाले, ओढे, नदी, टेकड्या आणि डोंगरांचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास हेच आजच्या हाहाकाराचे प्रमुख कारण आहे. या कारणापासून पळ काढता येणार नाही आणि ढगफुटीकडेही बोट करता येणार नाही, हा स्पष्ट सांगावा पावसाने दिला. 

गेल्या तीन दशकांमध्ये जगाच्या नकाशावर पुणे महानगराचा बिंदू विस्तारतो आहे. नागरीकरणाचा वेग मोजण्यासाठी साधने अपुरी पडतील, अशी वेळ आहे. परवा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान भासणारी जमीन आज टोलेजंग इमारतींनी व्यापते आहे. याच इमारतींच्या समोरील टेकड्यांचे उतार झोपडपट्ट्यांनी चितारले जात आहेत. पुण्यात तब्बल बावन्न नाले आहेत. जमेल तेथे ते नाले जमिनीखाली पुरून अथवा त्यांची दिशा बदलून त्यांना नकाशावरूनच गायब करण्याचे अचाट प्रयोग सातत्याने होत आहेत. ओढे, नाल्यांना पुरून, मोडून त्यांच्या काठावर वसाहतींच्या वसाहती उभ्या राहात आहेत. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार वर्षानुवर्षे नवनवी नावे देऊन नवनवे प्रकल्प महानगरांसाठी आखते आहे. स्मार्ट, इंटिग्रेटेड वगैरे चकचकीत वेष्टनांखाली हे प्रकल्प अनिर्बंध नागरीकरणाला आणखी गती देत आहेत. पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा सक्षम आणि बळकट करत नेणे, इमारतींना परवानग्या देताना भौगोलिक स्थिती तपासणे आदी महापालिकेची प्राथमिक कामे आहेत. झगझगीत वेष्टनांमध्ये अडकण्याची मानसिकता तयार झाल्यावर प्राथमिक कामे गौण वाटू लागतात. त्याबद्दलची शिथिलता येते. त्यातून अशा काळरात्री जन्म घेतात आणि मग हजारो नागरीकांचा जीव संकटात सापडतो. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरवातीला पुण्यात आणि मुंबईत संरक्षक भिंती, इमारती कोसळून मोठी जीवितहानी झाली. त्यानंतर राज्यावर महापुराचे संकट ओढवले. प्रत्येक परिस्थितीला तत्कालिक उपायांवर आणि चमकदार घोषणांवर काम भागणार नाही. मुंबई, पुण्यासारखी महानगरे महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतात. अशी महानगरे बंद पडतात तेव्हा तो मोठा आर्थिक धक्काही असतो. तेथील नागरिकांना रोजचे जगणे सुरक्षित वाटत नाही, तेव्हा नवे गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न जन्म घेतात. या प्रश्नांची व्याप्ती महानगरांपलीकडे पसरते. त्यामुळे, यंदाच्या पावसाने दिलेला सांगावा निमूटपणाने ऐकावा लागणार आहे. अन्यथा, पुरलेले नाले पुन्हा कधीतरी उसळी मारून वर येतील आणि नागरी वस्त्यांना पुन्हा झटका देतील, हे निश्‍चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article pune flood