पहाटपावलं : ज्ञान, मनोवृत्ती अन्‌ कृती

Raja-Akash
Raja-Akash

गुरुकुलातील शिष्यांनी ज्ञानार्जन पूर्ण झाल्यावर गुरुदेवांकडं परवानगी मागितली, ‘‘गुरुदेव! आमचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. आम्ही परत जाऊ? गुरुदेव म्हणाले, ‘‘थांबा, शेवटची परीक्षा बाकी आहे.’’ त्यांनी आश्रमातून बाहेर जाण्याच्या सर्व वाटा बंद केल्या. केवळ एका पाऊलवाटेचा रस्ता खुला ठेवला, जेथून एका वेळी फक्‍त एकच विद्यार्थी जाऊ शकत होता. त्या वाटेनं त्यांनी विद्यार्थ्यांना जायला सांगितलं. त्या वाटेवर काटेरी झुडपं पडलेली होती. त्यामुळे काही शिष्य बाजूनं गेले, काही त्या काट्यांवरून उडी मारून गेले.

फक्‍त एकच विद्यार्थी असा होता, ज्यानं काटेरी झुडपं उचलून बाजूला फेकली आणि मग तो पुढं केला. गुरूंनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं, ‘‘बाळ, तुझं शिक्षण पूर्ण झालंय. तू परत जाऊ शकतोस.’’ फक्‍त एकाच विद्यार्थ्यांनं हा विचार केला, की मी उडी मारून निघून जाईन. पण, या रस्त्यानं माझ्यानंतर येणाऱ्या लोकांना काट्यांचा त्रास होईल. तेव्हा आताच हे काटे बाजूला करायला हवेत. गुरुवर्यांनी ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना सारखंच दिलं होतं. पण, एकच विद्यार्थी असा होता ज्यानं ते ज्ञान कृतीत उतरवलं. 

केवळ ज्ञान मिळवणं पुरेसं नाही, त्यासोबत आणखी दोन घटकही महत्त्वाचे असतात. ज्ञान मिळविल्यानंतर मनोवृत्ती बदलणं आणि मिळवलेलं ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणं. मिळालेल्या ज्ञानामुळं मनोवृत्ती बदलणार नसेल, ते ज्ञान कृतीत उतरणार नसेल तर ते कुचकामी ठरतं. ज्ञान मिळविण्याचा मूळ उद्देशच हा असतो, की त्यातून माणसांची मनोवृत्ती बदलली पाहिजे. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी शिक्षकच विद्यार्थ्यांची मनोवृत्ती बदलण्याइतके सक्षम होते. स्वत:च्या वागण्यातून, कृतीतून विद्यार्थ्यांसमोर ते आदर्श उभा करायचे.

आज चित्र बदललं आहे. आज असे फार थोडे शिक्षक आहेत, ज्यांना आदर्श म्हणता येईल आणि जे विद्यार्थ्यांची मनोवृत्ती बदलू शकतील. त्यामुळे ज्ञान मिळविण्यासाठी आपल्यालाच परिश्रम करावे लागणार. मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे मनोवृत्ती आपल्यालाच बदलावी लागणार. आपण शिकतो तो प्रत्येक विषय जीवनाशी निगडित आहे. त्या विषयांचं ज्ञान संपादन करण्यासाठी समाजानं आपल्याला मदत केली आहे. त्याची परतफेड आपण कशी करणार? ती एकाच पद्धतीनं होऊ शकते, ती म्हणजे कृतीतून.

मिळविलेल्या ज्ञानाचा फायदा आपण इतरांना दिला, तर ती समाजानं आपल्याला दिलेल्या ज्ञानाची परतफेड होईल. समाज असं म्हणत नाही, की इतरांना त्या ज्ञानाचा फायदा देताना पैसे मिळवू नका. पैसे कदाचित घ्यावेच लागतील. कारण, ते ज्ञान आपल्या चरितार्थाचं साधनही आहे. फक्‍त इतकंच म्हणता येईल, की ज्ञान इतरांना देताना प्रामाणिक राहायला हवं. मानवी दृष्टिकोन बाळगायला हवा. ज्ञान, मनोवृत्ती व कृती यांची सांगड घालणारे खूप कमी लोक आहेत. पण, जे ही सांगड घालतात ते नक्कीच यशस्वी होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com