पहाटपावलं : वृद्धत्व आणि स्मरणशक्‍ती

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

जोपर्यंत माणसाच्या जगण्याचा उत्साह कायम असतो, जीवनाबाबतच्या तीव्र प्रेरणा त्याच्या मनात असतात, तोपर्यंत कुठल्याच वयाचा माणूस म्हातारा होत नाही. माझे एक मित्र, वर्षे ६०. सायंकाळ झाली की मुलांसोबत क्रिकेट खेळायला बाहेर जातात. धावतात. बॉलिंग करतात. दिवसातील आठ तास मनुष्यबळ विकासाचे ट्रेनिंग सेशन्स घेतात. योग, व्यायाम करतात.

जोपर्यंत माणसाच्या जगण्याचा उत्साह कायम असतो, जीवनाबाबतच्या तीव्र प्रेरणा त्याच्या मनात असतात, तोपर्यंत कुठल्याच वयाचा माणूस म्हातारा होत नाही. माझे एक मित्र, वर्षे ६०. सायंकाळ झाली की मुलांसोबत क्रिकेट खेळायला बाहेर जातात. धावतात. बॉलिंग करतात. दिवसातील आठ तास मनुष्यबळ विकासाचे ट्रेनिंग सेशन्स घेतात. योग, व्यायाम करतात.

पाच-सहा किलोमीटर फिरायला जातात. दिवसातील १४ ते १६ तास उत्साहाने काम करतात. मी त्यांना एकदा म्हणालो, ‘‘तुमच्या वयाचे लोक या वयात रिटायरमेंट घेतात, भजनपूजन करतात. तुम्ही इतके उत्साही कसे? त्याचं उत्तरं मिळालं, ‘‘राजा, मला म्हातारं व्हायला वेळच नाही.’’

म्हातारपण हे शरीरापेक्षा विचारांचं जास्त असतं. अनेकांनी मला प्रश्‍न विचारला की वय वाढलं म्हणजे माणसाची स्मरणशक्‍ती कमी होत असते का? वयाचा आणि स्मरणशक्‍तीचा काही संबंध आहं का? मी स्मरणशक्‍ती या विषयावरील अनेक पुस्तकं अभ्यासलीत. पण सर्व पुस्तकांमध्ये सांगितलंय की स्मरणशक्‍ती आणि वय वाढणं याचा संबंध नाही. वय वाढल्यामुळे स्मरणशक्‍ती कमी होते ही भ्रामक कल्पना आहे. थॉमस अल्वा एडीसन यांचं संशोधनकार्य ८० व्या वर्षानंतरदेखील जोमाने सुरू होतं. फ्रीझ क्रिसलर आपलं व्हायोलिन वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील सुरेख वाजवायचा, जितंक तो तारुण्यात वाजवत होता. जॉर्ज बर्नाड शॉ वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत लिखाण करत होते. भारतातही सामाजिक, राजकीय, साहित्यिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी वयाच्या ६० - ७० वर्षानंतरदेखील आपलं कार्य उत्साहात सुरू ठेवलं. अनेक लोक तक्रार करतात की, जसं त्यांचं वय वाढत जातंय तशी त्यांची स्मरणशक्‍ती कमी होते.

विशेषत: कुठलीही नवीन माहिती लक्षात ठेवण्याबाबत ही समस्या त्यांना जाणवते. पण त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्‍तींची नावं, चेहरे, महत्त्वाच्या घटना इत्यादी बाबतची त्यांची स्मरणशक्‍ती तरुणांनादेखील लाजवेल इतकी चांगली असते. मुळात म्हातारपणी स्मरणशक्‍ती कमी होते असं म्हणणं ही अतिशयोक्‍ती आहे.

माणसाला होणारे निरनिराळे आजार आणि जीवनात येणारं नैराश्‍य ही स्मरणशक्‍ती कमी होण्यामागची खरी कारणं आहेत. ज्या वेळी आपल्याला नैराश्‍य येतं, उदास वाटतं, त्या वेळी आपण बाह्य जगापासून आपल्याला तोडून टाकतो आणि स्वत:च्या कोशात जातो. असं नैराश्‍य आलेलं असताना कुठलीही नवीन माहिती, नवीन विषय लक्षात ठेवण्यात आपल्याला रुची राहत नाही. म्हणून म्हातारपणामुळे स्मरणशक्‍ती कमी होते हा मेंटल ब्लॉक काढून टाकला पाहिजे. स्वत:मध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. जितकी आपण स्वत:च्या जीवनामध्ये रुची घ्यायला सुरवात करू, तितकी स्मरणशक्‍ती प्रभावीपणे काम करू लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Raja Akash