पहाटपावलं : यशाच्या मार्गातील गतिरोधक

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

समीर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. अचानक एक दिवस त्यानं औषधाच्या ७० गोळ्या खाल्ल्या. त्याच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं की समीर विचित्र वागतो आहे. त्यानं समीरचे ड्रॉवर तपासले, तेव्हा गोळ्यांच्या रिकाम्या स्ट्रीप्स दिसल्या. त्यानं तत्काळ समीरला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. समीर बारावीपर्यंत हुशार विद्यार्थी. दरवर्षी वर्गात पहिला नंबर मिळवणारा. बारावीत चांगले गुण मिळवून तो पास झाला. त्यानं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

समीर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. अचानक एक दिवस त्यानं औषधाच्या ७० गोळ्या खाल्ल्या. त्याच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं की समीर विचित्र वागतो आहे. त्यानं समीरचे ड्रॉवर तपासले, तेव्हा गोळ्यांच्या रिकाम्या स्ट्रीप्स दिसल्या. त्यानं तत्काळ समीरला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. समीर बारावीपर्यंत हुशार विद्यार्थी. दरवर्षी वर्गात पहिला नंबर मिळवणारा. बारावीत चांगले गुण मिळवून तो पास झाला. त्यानं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. समीरचे मित्र नियमित पास होत गेले, पण समीर सतत नापास होत गेला. आपण काहीच करू शकत नाही, आपण नालायक आहोत असं त्याला वाटायचं. तो स्वत:ला दूषणं द्यायचा. हळूहळू त्याचा अभ्यासातला इंटरेस्ट कमी होऊ लागला. आपण चुकीचं वागतोय हे त्याला कळायचं, पण यातून बाहेर कसं पडायचं हे त्याला कळत नव्हतं...

आयुष्य खूप मोठं असतं. जन्माला आल्यापासून सुमारे ७० वर्षांपर्यंतच्या आपल्या आयुष्यात सतत वेगवेगळ्या घटना घडत असतात. यापैकी काही घटना आनंद देणाऱ्या असतात, तर काही दु:ख देणाऱ्या. काही गोष्टींमध्ये आपण यशस्वी होत असतो, तर काही ठिकाणी अपयश पदरात पडतं. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत सतत यशस्वीच होत गेलो, असं कधीच होत नसतं व जन्मापासून मरेपर्यंत अपयशीच होत गेलो, असंही कधी होत नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात यश आणि अपयश, आनंद आणि दु:ख या दोन्ही गोष्टी येतच असतात.

एखाद्या परीक्षेत येणारं अपयश म्हणजे संपूर्ण आयुष्याचं अपयश असं समीकरण कधीच होऊ शकत नाही. आपल्या भोवताली असे अनेक लोक आहेत, जे अभ्यासात खूप मागे होते, पण स्वत:च्या जीवनात मात्र ते खूप यशस्वी झाले. त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तर काही यशस्वी व्यावसायिक झाले. समाजात त्यांना सन्मान व प्रतिष्ठा मिळाली. त्यांचं अभ्यासातील अपयश त्यांच्या जीवनातल्या यशाच्या कधीच आडवं आलं नाही. असेदेखील अनेक लोक आहेत जे अभ्यासात नेहमी पुढे असायचे, परीक्षेत खूप चांगले गुण मिळवायचे, पण त्यांना नोकरीत अथवा व्यवसायात स्थिर होता आलं नाही. मोठ्या पदव्या असूनसुद्धा त्यांच्या आयुष्यात खूप समस्या आल्या. रस्त्यावर गतिरोधक असतात, तसंच अपयश हा यशाच्या मार्गातील एक गतिरोधक आहे. रस्त्यात गतिरोधक आला म्हणून आपण प्रवास थांबवत नाही. तसंच जीवनात अपयश आल्यानंतर हताश होऊन थांबायचं नसतं. अपयशावर मात करून यशाच्या मार्गानं पुढे जायचं असतं. आपल्या व्यक्‍तिमत्त्वातला कणखरपणा अशा अपयशातूनच वाढत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article raja akash