नाममुद्रा : डोळ्यांनी बोलणारी अभिनेत्री

रजनीश जोशी
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

तिच्या आवाजात सहसा न आढळणारी लवचिकता, उच्चारात स्पष्टता व संवादफेकीत लयबद्धता आहे. कधी ती नुसती डोळ्यानंच बोलते. कधी केवळ डोक्‍यावर पदर घेण्याच्या लकबीतून तिला काय म्हणायचं आहे, ते सांगून टाकते. तिचं उभं राहणं, पाहणं आणि चालणंदेखील अभिनयाचा वस्तुपाठ आहे. एवंगुणवैशिष्ट्यानं मंडित असलेल्या रोहिणी हट्टंगडी या चतुरस्र अभिनेत्रीला यंदाचा मानाचा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ मिळणं हा त्यांचा उचित गौरव आहे.

तिच्या आवाजात सहसा न आढळणारी लवचिकता, उच्चारात स्पष्टता व संवादफेकीत लयबद्धता आहे. कधी ती नुसती डोळ्यानंच बोलते. कधी केवळ डोक्‍यावर पदर घेण्याच्या लकबीतून तिला काय म्हणायचं आहे, ते सांगून टाकते. तिचं उभं राहणं, पाहणं आणि चालणंदेखील अभिनयाचा वस्तुपाठ आहे. एवंगुणवैशिष्ट्यानं मंडित असलेल्या रोहिणी हट्टंगडी या चतुरस्र अभिनेत्रीला यंदाचा मानाचा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ मिळणं हा त्यांचा उचित गौरव आहे. हट्टंगडी यांची खासियत अशी की, त्या भूमिकेपेक्षा वेगळ्या वाटत नाहीत. कित्येक नट-नट्या कोणत्याही भूमिकेत आपलं व्यक्तिमत्त्व घेऊनच वावरत असतात.

वयाच्या २७ व्या वर्षी ‘सारांश’मध्ये ज्येष्ठ महिलेची भूमिका साकारणाऱ्या रोहिणी यांना पुढं तशाच पद्धतीच्या भूमिका मिळत राहिल्या; तरी प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. अभिनयाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. वडील अनंत, आई निर्मला आणि बंधू रवींद्र या तिघांनी मिळून ‘गावगुंड’ नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. पुण्यात पदवी घेतल्यानंतर लगेच दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्यांना जाणीव झाली की अभिनय हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. पती जयदेव हट्टंगडींच्या संगतीत त्यांच्या अभिनयाला अनेकविध पैलू पडत गेले. मग हिंदी, तेलुगू, कन्नड, गुजराती, जपानी अशा विविध भाषांतील नाटक-चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

रिचर्ड ॲटनबेरोच्या ‘गांधी’मधील कस्तुरबा त्यांनी साकारली आणि त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं. ‘ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस’चा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय अभिनेत्री. फेडरिको लॉर्काचं मूळ स्पॅनिश नाटक ‘यर्मा’चं आरती हवालदारांनी मराठीत ‘चांगुणा’ केलं आणि त्या भूमिकेचं रोहिणींनी सोनं केलं. अपत्यप्राप्तीची तळमळ त्यांनी ज्या आर्ततेनं प्रकट केली आहे ती लाजवाब आहे. ‘अपराजिता’ आणि ‘जगदंबा’मधील एकपात्री अभिनय, ‘वन्समोअर’मधील ‘आजोबा’ ही त्यांच्या अभिनयाची शिखरं म्हणता येतील. टिव्ही वाहिन्यांवरील मालिकांतूनही त्या दिसल्या. ‘अग्निपथ’, ‘चालबाज’मध्ये त्यांनी व्यावसायिक भूमिकाही केल्या. हे सगळं असलं तरी त्यांची ओळख अभिजात दर्जाची अभिनेत्री अशीच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article rajnish joshi