कर्तारपूर कॉरिडॉर सद्‌भावाचे प्रतीक ठरेल?

संजय नहार
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

कर्तारपूर कॉरिडॉरच्या निमित्ताने भारतातील पंजाबी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्या प्रमाणे गुरू नानकदेव हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक होते; तसेच कर्तारपूर कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नवीन संबंधांचा पूल बनू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या निमित्ताने भारतातील पंजाबी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्या प्रमाणे गुरू नानकदेव हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक होते; तसेच कर्तारपूर कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नवीन संबंधांचा पूल बनू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

शिखांच्या दृष्टीने सर्वांत पवित्र असलेल्या पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब गुरुद्वारा हा रावी नदीवर पूल बांधून भारतातील डेरा बाबा नानक येथे जोडला गेल्याने केवळ देशभरातच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ नोव्हेंबर रोजी भारताच्या बाजूने याचे लोकार्पण करून एका ऐतिहासिक घटनेची पायाभरणी केली. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांचा ५५०वा जयंती उत्सव जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असताना हा कॉरिडॉर सुरू होणे, याचे महत्त्व केवळ शीख आणि पंजाबी बांधवांसाठीच नाही, तर सर्व भारतीयांसाठी आणि त्याचवेळी पाकिस्तानी जनतेसाठीही महत्त्वाचे आहे.

या कॉरिडॉरद्वारे भारतातून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पाकिस्तानचा व्हिसा लागणार नाही, तर त्यांना थेट जाता येईल. मात्र सूर्योदयाच्या वेळी गेलेल्या श्रद्धाळूंना सूर्यास्तापूर्वी परतावे लागेल. १९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ही मागणी केली गेली. या कॉरिडॉरद्वारे कोणीही पाकिस्तानी नागरिक भारतात येऊ शकणार नाही; मात्र त्याचा फायदा घेऊन कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शिखांच्या धार्मिक भावना भडकावल्या जाण्याची सुरक्षातज्ज्ञांना भीती वाटते. ती काही प्रमाणात खरी आहे. म्हणूनच भिंद्रनवालेच्या पोस्टरला भारताने हरकत घेतली.

आपल्याकडेही काही ठिकाणी भिंद्रनवालेचे गौरवीकरण करणारा एक वर्ग आहे. त्यांना नव्याने कोणतीही संधी मिळणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. 

पाकिस्तानी लष्कर आणि राजकीय पक्षांनाही भीती आहे की भारताकडून भाविकांच्या नावाखाली गुप्तहेर घुसविले जातील आणि पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी या कॉरिडॉरचा उपयोग केला जाईल. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पासपोर्टची शिथिल केलेली अट पाकिस्तानी लष्कराने अमान्य केली आणि भाविक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणार असल्याने पासपोर्टची अट कायम असेल, असे स्पष्ट केले आहे.

या कॉरिडॉरच्या निमित्ताने भारतातील पंजाबी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्याप्रमाणे गुरुनानक देव हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक होते; तसेच कर्तारपूर कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नवीन संबंधांचा पूल बनू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमध्ये या कॉरिडॉरबद्दल सकारात्मक अपेक्षा आहेत, तशी काळजीही आहे.

काश्‍मीरप्रश्नी ताणले गेलेले संबंध आणि अधूनमधून घडू शकणाऱ्या दहशतवादी घटनांचेही सावट या कॉरिडॉरवर असेल. आपण वाघा सीमेवर जातो तेथे रोज दोन्ही देशांचे शक्तिप्रदर्शन होत असते, मात्र कर्तारपूर कॉरिडॉर हा धर्म, भाषा आणि देश यांना जोडण्याचे प्रतीक ठरणार आहे. या कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना खूप मोठ्या प्रमाणात चेकपोस्ट आहेत; तसेच विविध सुविधांची मोठी केंद्रेही निर्माण करण्यात आली आहेत. रोज वीस हजार लोक लंगरमध्ये जेवतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे स्थळ जगातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या कॉरिडॉरमुळे या प्रक्रियेला मोठी गती मिळेल.

ऐक्‍यभावनेचा प्रसार
नानकाना साहिब आणि कर्तारपूर साहिब या गुरुद्वारांबद्दल पाकिस्तानमधील मुस्लिमांमध्येही नकारात्मक भावना नाही. तेथेही पंजाबी भाषिकांचेच वर्चस्व आहे. आपल्याकडे पंजाबी गुरुमुखीमध्ये लिहिली जाते; तर पाकिस्तानात शहामुखीमध्ये. एकूण काय तर या कॉरिडॉरमुळे गुरु नानकांच्या विचारांचा आणि कृतीचा पाकिस्तानमध्येही प्रभाव वाढणार आहे.

गुरू नानक देव हे शिखांचे पहिले गुरू. ते आजही ऐक्‍याचे आणि सामंजस्याचे प्रतीक का होऊ शकतात, हे पाहण्यासाठी त्यांच्या जीवनाचा प्रवास अभ्यासायला हवा. त्यांच्यासोबत दोन शिष्य नेहमी असत. पैकी बाला हा हिंदू होता आणि त्याने ‘जनम साखी भाई बाला’ या नावाने गुरू नानक देवांचे पहिले चरित्र लिहिले असे म्हणतात. दुसरा शिष्य मर्दाना हा मुस्लिम होता.

तो रबाब नावाचे वाद्य वाजवत असे. गुरू नानक देव यांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्हीतील ढोंगबाजी आणि कर्मकांडाचे अवडंबर यांचा सदैव धिक्कार केला. त्यांनी पूर्व-पश्‍चिम-उत्तर-दक्षिण अशा सर्व दिशांना अनेक वेळा प्रवास केला आणि ईश्वर एकच आहे आणि सर्व मानव एकमेकांचे बांधव आहेत, असा संदेश प्रसारित केला. कर्तारपूर येथे त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पार्थिवाचे दहन करावे, अशी हिंदूची इच्छा होती, तर दफन करावे असा मुस्लिमांचा आग्रह होता. असे ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या गुरू नानक देवजींना ‘हिंदुओ के गुरू अन्‌ ‘मुसलमानो के पीर’ असे म्हणत मानणारा मोठा वर्ग आजही दोन्ही धर्मांमध्ये आहे. भारत-पाकिस्तानच्या भविष्यातील संबंधांवर या कॉरिडॉरचा सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा त्यामुळेच वाटते. 
(लेखक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article by sanjay nahar about kartarpur corridor