भाष्य : निथळणारे बाजार, पसरणारे आजार...

संतोष शिंत्रे
बुधवार, 1 एप्रिल 2020

निसर्गाचे आपण करत असलेले नुकसान, लुप्त होणारे जैववैविध्य आणि हवामानबदलाविषयी निष्काळजी धोरण आदी मुद्दे आता ऐरणीवर आले आहेत. विषाणूच्या संकटाशी या गोष्टींचा संबंध आहे. चीनमधील वन्यप्राण्यांचे बाजार किती धोकादायक आहेत, हे आता समोर येत आहे.

निसर्गाचे आपण करत असलेले नुकसान, लुप्त होणारे जैववैविध्य आणि हवामानबदलाविषयी निष्काळजी धोरण आदी मुद्दे आता ऐरणीवर आले आहेत. विषाणूच्या संकटाशी या गोष्टींचा संबंध आहे. चीनमधील वन्यप्राण्यांचे बाजार किती धोकादायक आहेत, हे आता समोर येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोरोना’सारखी वैश्विक संकटे खेदजनकरीत्या काही बाबतीत इष्टापत्ती ठरून जातात. कारण एरवी जी कल्याणकारी कृती वर्षानुवर्षे कानीकपाळी ओरडूनही मानवजात करत नसते, ती असले चटके बसले की चटदिशी करून मोकळी होते. जगभरातून तस्करी करून आणलेल्या वन्यप्राण्यांना जिवंत पकडून जागीच मारून खाण्यासाठी ग्राहकाला देणाऱ्या ‘वेट मार्केट्‌स’वर चीनने नुकतीच बंदी आणली. अनेक दशके जागतिक दबाव आणूनही चीन हे बाजार बंद करत नव्हता. वर उर्मटपणे थोर चिनी वैद्यक परंपरेचे गुण गात रोजगारनिर्मितीचे तुणतुणे वाजवून अशा बाजारांना सरकारी पातळीवर प्रोत्साहनही देत होता. ‘कोरोना’मुळे चीनला हे बाजार बंद करावे लागले आहेत.

प्राण्यांच्या कलेवरावर किंवा त्यांना दाटीवाटीने कोंडलेल्या पिंजऱ्यात सतत मारले जाणारे पाणी, मृत प्राण्यांमधून वाहणारे रक्त, मांसाचे तुकडे यांच्या एकत्रित परिणामांमुळे अशा जागांची नावे ‘वेट मार्केट्‌स’ अशी पडली होती. आपण ‘निथळते’ बाजार म्हणू. कोरोना विषाणूच्या आगमनात या बाजारांचा वाटा आता सिद्ध झाला आहे. इतकी ‘स्वच्छता’ या बाजारांमध्ये असताना तो तसा असणारही होता.

वुहानमध्ये असाच एक बाजार होता. म्हणायला ते ‘सी फूड मार्केट’ होते. पण त्यात साप, रकून, कुत्री, साळू, लांडग्याची पिल्ले, अनेक पक्षी, ऊदमांजरे, खवल्यामांजरे, हरणे इत्यादी नामी पक्षी-प्राणीही विकले-मारले जात होते. मुंगसे, कोल्हे, कासवे, तितर, शहामृग, लाल चोचीचे हंस, बांबूतील उंदीर, विविध कबुतरे, बदके या सर्वांनाही दाटीवाटीने पिंजऱ्यात कोंबलेले होते. विषाणूच्या उद्रेकानंतर लगेचच डिसेंबरमध्येच चीनने हे निथळते बाजार आणि त्यांना ‘माल’ जिवंत पुरवणारी तब्बल वीस हजार कृत्रिम पैदास करणारी केंद्रे बंद पाडली. वन्यप्राणी खायला मनाई केली असली, तरी ‘थोर’ चिनी परंपरेनुसार चिनी वैद्यकात त्यांचा, अथवा त्यांच्या अवयवांचा वापर करायला परवानगी मात्र अबाधित ठेवली. या सर्व बाजारांद्वारे, अवयवांच्या तस्करीद्वारे चीनची होणारी उलाढाल आहे/होती ७३ अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक, तर अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सक्रिय पाठिंबा दिलेल्या खुळचट चिनी वैद्यकाची एकूण उलाढाल आहे तेरा कोटी डॉलर!  बंदीनंतर काही काळ या सर्व विक्रेत्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीचे जोरदार प्रयत्न केले. पण पहिल्याच महिन्यात वन्यजीवनाशी /अवयवांशी संबंधित एक लाख चाळीस हजार विविध वस्तू विकणारे, सतरा हजार ऑनलाइन प्लॅटफॉर्मदेखील सरकारने बंद पाडले. त्याआधीच IFAW आणि WWF  या दोन निसर्ग संघटनांनी ‘अलिबाबा,’ ‘टेनसेंट,’ ‘जेडी डॉट कॉम’ इत्यादी कंपन्यांशी बोलून प्राणी- पक्षी पकडायला साह्य करणारे-पक्षी-जाळी, सापळे, पक्ष्यांचे आवाज काढून त्यांना पकडणारी यंत्रे, विंचू पकडायचे स्पेशल चिमटे अशी उत्पादने ऑनलाइन विक्रीपासून रोखली होतीच.

आता आपण हे सर्व इतके सविस्तर का पाहतो आहोत?-तर या विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत इतर सर्व बाबींची चर्चा होते, पण निसर्गाचे आपण करत असलेले अपरिवर्तनीय नुकसान, लुप्त होत चाललेले जैववैविध्य आणि हवामानबदलाविषयी निष्काळजी धोरण या सर्व घटकांमुळेच तो आपल्या दारात आला, हे आवश्‍यक तितक्‍या तीव्रतेने भारतात समोर येत नाही. निव्वळ एखाद्या प्रासंगिकतेपेक्षा विज्ञान पत्रकारितेत त्यामागील कारणीभूत असलेल्या प्रक्रियेचा प्रामुख्याने वेध घ्यायचा असतो. काही चिनी संशोधकांनी, ‘सापडलेला विषाणू खवलेमांजरामधील विषाणूच्या ‘फक्त’ ९०.३ टक्केच सारखा आहे’ आणि त्यामुळे काहीच कसे सिद्ध होत नाही; जिथून तस्करी होऊन हे प्राणी आले होते तिथल्या लोकांना कसा काहीच त्रास झाला नाही, वगैरे ओरड सुरू केली. हे म्हणजे ‘निर्भया’च्या मारेकऱ्यांनी दिल्लीतील मुलीऐवजी आपल्या मूळ गावातील मुलीला का त्रास दिला नाही, असं विचारण्याइतकंच उफराटं अन्‌ विपर्यस्त आहे.

‘सार्स’च्या विषाणूच्या जनुकीय नकाशापैकी ९९.८ टक्के भाग मागे ऊदमांजरामधील कोरोना विषाणूशी साम्य असलेला होता. ही सगळी आहे ती प्रासंगिकता. मागील वेळी ‘सार्स’ होता, आता ‘कोविड-१९’. आणि तो कुठल्यातरी वन्यप्राण्याशी अनैसर्गिक रीतीने (वेट मार्केट इत्यादी) झालेल्या कृत्रिम जवळिकीमुळे आहे.‍ कृत्रिम जवळीक घडून येण्याची मानवनिर्मित कारणे शोधणे, म्हणजे त्यामागे कारणीभूत असलेल्या प्रक्रियेचा शोध घेणे. तो जगभर घेतला जात आहे. व्यक्तिगत आरोग्याचा पृथ्वीच्या आरोग्याशी नक्की कसा, किती निकटचा संबंध आहे हे स्पष्ट करणारी Planet Health नावाची आंतरविद्याशाखीय वैद्यकशाखा जोमाने कार्यरत होते आहे. इबोला, झिका, निपाह असे जे मोठे विषाणू प्रादुर्भाव आजवर झाले, त्यापैकी ३१ टक्के जंगलतोडीमुळे आणि ७५ टक्के वन्यप्राण्यांमधून आलेल्या विषाणूंमुळे झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.

जंगलतोडीमुळे वन्यजीव आणि फक्त त्यांच्या शरीरापुरतेच गुण्यागोविंदाने नांदणारे विषाणू त्यांच्या नैसर्गिक अधिवासांबाहेर फेकले जाऊन मानवी लोकसंख्येच्या जवळ येतात. त्यामुळे ते मानवी शरीरात प्रवेश करण्याची शक्‍यता बळावते. वटवाघळांचे वसतिस्थान असलेली जंगले तोडली जातात, तेव्हा त्यांना आपल्या परसदारी किंवा शेतांमध्ये वस्ती करणे भाग पडते. एकूण मानवी संपर्काची शक्‍यता वाढते. म्हणजे वाघुळाची लाळ लागलेले एखादे फळ चुकून कुणी खाल्ले किंवा चीनसारखे पकडून त्याचे सूप वगैरे बनवले की वाघूळांच्या उतींपुरते मर्यादित राहणारे इबोला, निपाह, मारबुर्ग हे सगळे विषाणू आपसूक माणसामध्ये प्रवेश करते होतात.

अनेक डास-प्रसारित विषाणूजन्य आजारांचाही जंगलतोडीशी संबंध आहे. जंगल नष्ट होते, तसे तेथील अधिवास नष्ट झाल्याने तिथले भूचित्रच बदलते. पानगळ आणि वृक्षांची मुळे नाहीशी होतात. त्यामुळे गाळ, अवसाद, आणि पाणी तुटक्‍या जंगलाच्या पृष्ठभागावरून अधिक सहजपणे वाहू लागते. एरवी मिळाला नसता तो सूर्यप्रकाशाचा झोत उपलब्ध होतो. हिवताप आणि अन्य विषाणूजन्य आजारही पसरवणाऱ्या डासांची फौज त्यामुळे निर्माण होऊ शकते. हा कल्पनाविलास नाही. बारा देशांमधील संशोधनांनुसार, जंगलतोड झालेल्या भूभागांची असे रोग-संक्रमक डास निर्माण करण्याची क्षमता एकसंध जंगले असणाऱ्या प्रदेशांपेक्षा दुपटीने जास्त असते.

वन्यप्राण्यांच्या मांसाच्या विकृत लोभापायी आफ्रिका खंडाइतके मोठे क्षेत्रफळ उजाड झाले. लेगॉस, चीन इथल्या ‘वेट मार्केट्‌स’मध्ये त्यांना पिंजऱ्यात जिवंत पोहोचवले. विभिन्न अधिवास व परिस्थितीतील हे प्राणी- जे एरवी कधीही एकमेकांच्या इतके निकट संपर्कात आले नसते-ते आता दाटीवाटीने अरूंद पिंजऱ्यात अत्यंत अशास्त्रीय प्रकारे संपर्कात आले. जीवाणू, विषाणू यांना एका प्रजातीवरून दुसरीत उडी मारणे त्यामुळे शक्‍य झाले. २००२-२००३ च्या ‘सार्स’च्या मर्यादित साथीचे हेच कारण होते हे नंतर सिद्ध झाले. आताही निश्‍चितपणे तेच झाले आहे. फक्त कुठल्या प्रजातीतून आणि कोण्या ‘मध्यस्था’द्वारे कोविड-१९ माणसात शिरला हे नक्की होणे बाकी आहे. ते सापडेलच. पण तोपर्यंत शहाण्यासुरत्या मानवजातीने वन्यप्राणी खाण्याचे भयानक परिणाम ओळखावेत. जात्यातले भरडले जाती, सुपातले हसती... हे लक्षात असू दे.
(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article santosh shintre