सायटेक : चांद्रखनिजे हवीहवीशी

प्रा. शहाजी बा. मोरे
शनिवार, 27 जुलै 2019

जगभरातील ज्या देशांनी अवकाश तंत्रज्ञानात भरारी मारली आहे, त्यांनी आपला मोर्चा चंद्राकडे वळविला आहे. अमेरिकेनेही १९७२ नंतर चांद्रमोहिमांना ब्रेक लावला होता, त्यांनीही पुन्हा चंद्राकडे लक्ष वळविले आहे.

जगभरातील ज्या देशांनी अवकाश तंत्रज्ञानात भरारी मारली आहे, त्यांनी आपला मोर्चा चंद्राकडे वळविला आहे. अमेरिकेनेही १९७२ नंतर चांद्रमोहिमांना ब्रेक लावला होता, त्यांनीही पुन्हा चंद्राकडे लक्ष वळविले आहे.

पहिल्या मानवी चांद्रसफरीचा सुवर्णमहोत्सव साजरा झाल्याबरोबर लगेच भारताने आपले ‘चांद्रयान- २’ पाठविले, ते सात सप्टेंबरला चंद्रावर उतरेल. यापूर्वी एप्रिलमध्ये इस्राईलने आपले यान ‘बेरेशित’ चंद्रावर पाठविले; पण ती मोहीम अपयशी ठरली. येत्या काही दिवसांत इस्राईल पुन्हा प्रयत्न करणार आहे. युरोपीय समुदाय २०५० पर्यंत ‘चांद्रग्राम’ (मूनव्हिलेज) वसविणार आहे.

रशिया २०३० पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याच्या प्रयत्नात आहे. डिसेंबर २०१८ मध्ये चीनने आपले ‘चांग-ई’ अवकाशयान पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून एक इतिहास घडविला. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी जाहीर केले आहे, की ‘‘अमेरिका चंद्रावर परत जाणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्वितीय कार्यकालाच्या (?) अखेरीस अमेरिकेची महिला चंद्रावर उतरेल!’’ याशिवाय भारत व चीन नजीकच्या भविष्यात मानवी चांद्रमोहिमा राबविणार आहेत. अर्थात, ज्या ज्या देशांचा अवकाश संशोधन कार्यक्रम सक्षम आहे, ते सारे देश चांद्रमोहिमा राबविण्यात वा आखण्यात गुंतले आहेत. एवढे सारे देश चंद्रावर का जाऊ इच्छितात?

अमेरिकेने १९७२ नंतर चांद्रमोहिमा थांबविल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिका व्हिएतनामबरोबरच्या युद्धामुळे आर्थिकदृष्ट्या जेरीस आली होती. त्यात अर्थसंकल्पाच्या तब्बल चार टक्के तरतूद करावी लागणारी ‘अपोलो’ चांद्रमोहीम अमेरिकेस परवडणारी नव्हती व त्यामुळे गेल्या ४६ वर्षांत अमेरिकेने चंद्राकडे दुर्लक्ष केले. अमेरिकेच्या चांद्रमोहिमेनंतर अमेरिकी जनतेत चांद्रमोहिमेबाबत उत्साह व रस राहिला नव्हता. चीनच्या मानवविरहित चांद्रमोहिमेने दाखवून दिले आहे, की मानवरहित मोहीमही खूप काही साध्य करू शकते. चंद्रावर पृथ्वीवरील १४ दिवसांचा एक दिवस असतो. अमेरिकेच्या अपोलो मोहिमा चंद्रावर दिवस असताना उतरल्या आहेत व त्यांचे नियोजनही तसेच केले होते. परंतु, चीनने आपले यान चंद्रावर उणे १८० अंश सेल्सिअस असणाऱ्या भागात उतरविले व ते विनासमस्या काम करीत आहे. पृथ्वीभोवती जसे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक फिरत आहे, तसे अमेरिकेला चंद्राभोवती एक अवकाशस्थानक फिरते ठेवायचे आहे.

‘यू. एस. लुनार गेट वे प्रोजेक्‍ट’ (अमेरिकेचे चंद्रावरील प्रवेशद्वार) असे नाव आहे. येत्या दशकात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी अमेरिकेस आशा आहे. या मोहिमेत अमेरिकेने युरोप, कॅनडा, जपान व अन्य काही देशांना आमंत्रित केले आहे. 

या मोहिमेत यंत्रमानव चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली १०-१२ किलोमीटर खोलीपर्यंत खोदकाम करणार आहे. तेथे रेडियोदुर्बिणी प्रस्थापित करण्यात येणार आहेत व चंद्रावरील खनिजांचा शोधही घेतला जाणार आहे. चंद्रावरील बर्फाचा व पाण्याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. (आपल्या चांद्रयान-१ ने पाण्याच्या अस्तित्वाची खूण सांगितली आहेच.) शिवाय, चंद्रावरील खडकांपासून एखादी वास्तू उभारता येण्यासारखी परिस्थिती असेल का, याचीही शक्‍यता पडताळणार आहे. 

चंद्राचा म्हणजेच चंद्रावरील दगड-मातीचा, भूस्तर इत्यादींचा अभ्यास विश्‍वनिर्मितीच्या अभ्यासासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरू शकतो. कारण चंद्राच्या निर्मितीपासून तेथे वातावरण नसल्यामुळे किंवा नगण्य प्रमाणात असल्यामुळे व मानवासारखा उपद्‌व्यापी प्राणी नसल्यामुळे चांद्रपृष्ठभाग तसाच आहे, असावा! पृथ्वीवर तसे होत नाही. चंद्र ४.५ अब्ज वर्षे काहाही न बदलता तसाच आहे, त्यामुळे चंद्राचा अभ्यास विश्‍वनिर्मितीच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. चंद्र म्हणजे सूर्यमालेचे वस्तुसंग्रहालयच (म्युझियम) आहे असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या मानवी व यंत्रमानव संशोधन या शाखेचे संचालक डेव्हिड पार्कर म्हणतात. मानवाला अन्य ग्रहांवरही मोहिमा राबवायच्या आहेत व अन्य ग्रहांवर मानवसुद्धा पाठविण्याचे अनेकांचे मनसुबे आहेत. तेव्हा इतक्‍या दूरच्या प्रवासातील एक पृथ्वीजवळचा थांबा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. चंद्रावरील मोहिमांमुळे अन्य ग्रहांवर मोहिमा राबविण्यासाठी ज्ञान, कौशल्य प्राप्त होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Shahaji More Chandrayan-2