नवे विरोधाभासी ‘मैत्रीपर्व’

Sharad-Uddhav-Sonia
Sharad-Uddhav-Sonia

आपल्या समान शत्रूविरोधात भाजप आणि डाव्यांची युती होऊ शकते, तर मग आता काँग्रेस ते का करू शकत नाही? तसंही आता काँग्रेसकडे फारसं काही गमावण्यासारखं उरलेलं नाहीच.

युद्ध असो अथवा राजकारण, दोन्ही घटकांना एक जुनी म्हण चपखलपणे लागू पडते आणि ती म्हणजे ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो’; पण तुम्ही शस्त्रत्याग करून पूर्णपणे हतबल झालेले असता तेव्हा काय करायचं? अशा स्थितीत मात्र उपरोक्त पारंपरिक नियम येथे लागू होतोच असं नाही. पण कधीकाळी तुमच्या शत्रूचा चांगला मित्र असणारा पुढे तुमचाही चांगला मित्र होणार असेल तर काय करावं? येथे मात्र पूर्वीच्या दोन पक्षांमध्ये थोडा का होईना छेद दिसत असेल, तर आपण त्यावर घाव का घालू नये? असा विचार कुणाच्याही डोक्यात येऊ शकतो. महाराष्ट्रात नेमका हाच खेळ काँग्रेस आणि त्याचा मित्रपक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस खेळत आहेत.  हे दोन धर्मनिरपेक्ष पक्ष आता कट्टर हिंदुत्ववादी पक्षाच्या जवळ येऊ पाहत आहेत. काँग्रेससाठी हे धक्कादायक आहे, राष्ट्रवादीसाठी मात्र हा प्रयोग फारसा वेगळा नसेल.

कारण देशभरात जबरदस्त राजकीय नेटवर्क असलेल्या शरद पवारांनी कधीच कोणत्याही एका पक्षाला आपले शत्रू मानले नव्हते. राज्यात कधीकाळी त्यांनी भाजपप्रमाणेच शिवसेने सोबतदेखील दोन हात केले होते. केंद्रातील मोदी सरकारने अगदी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या मागे ‘ईडी’चे शुक्‍लकाष्ठ लावले असताना पवारांनी एकहाती किल्ला लढविला. विशेष म्हणजे हे सगळे करणाऱ्या केंद्र सरकारनेच त्यांना कधीकाळी ‘पद्मविभूषण’सारखा सन्मानही प्रदान केला होता, हे  देखील आपण लक्षात घ्यायला हवे.

हिंदुत्ववादी हेच प्रतिस्पर्धी
दोन दशकांतील सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे राजकारण लक्षात घेतले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे काँग्रेसने हिंदुत्ववादी पक्षांनाच त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले आहे. तसं पाहता काँग्रेसने अनेकदा डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. जातीय शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीही कधीकाळी काँग्रेसने एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ केला होता. नव्या ‘आघाडी’कारणामध्येही काँग्रेसने कधीकाळी भाजपचे मित्रपक्ष राहिलेल्या अन्य पक्षांसोबत जुळवून घेतले होते. यामध्ये ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांचा समावेश होता. पण कडवे हिंदुत्ववादी आणि अकाली दलासारख्या पक्षांसोबत काँग्रेसने कधीच युती केली नव्हती.

राहुल गांधी यांचे राजकीय अपयश काँग्रेसने उघडपणे मान्य केलेले नसले तरीसुद्धा ते स्पष्टपणे दिसते. भविष्यातही यातून राहुल सावरण्याची शक्‍यता तशी कमीच आहे. पक्षाला त्याचे खरे संचित हे सीबीआय आणि ‘ईडी’च्या कोठडीमध्ये संपते की काय, अशी भीती सातत्याने जाणवते आहे. या शिवाय जेएनयूमधून आयात करण्यात आलेल्या बंडखोर वृत्तीच्या पिढीला काँग्रेसचा राजकीय इतिहास नेमकेपणाने ठावूक आहे. कारण जेव्हा काँग्रेस ताकदवान होती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कमकुवत होते तेव्हाही पक्षाची धोरणे तात्त्विकदृष्ट्या विशेष लवचिक होती. याला काँग्रेस अथवा भाजपचा अपवाद नव्हता. अगदी भाजपचे १९८४ मध्ये लोकसभेमध्ये दोनच खासदार होते तेव्हाही त्यांचे धोरण तात्त्विकदृष्ट्या लवचिकच होते. पंजाबचे त्रिभाजन होईपर्यंत म्हणजे १९६६ पर्यंत हीच स्थिती कायम होती. भाजपची पितृसंघटना म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनसंघ हा तेव्हा शिरोमणी अकाली दलाचा कट्टर विरोध म्हणून ओळखला जात होता; पण पुढे १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी युती केली होती. 

इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचे राजकारण एकध्रुवीय झाले. यामुळे केवळ जनसंघ आणि समाजवादी मंडळी एकत्र आली नाही, तर तात्त्विकदृष्ट्या कोसो दूर असणारे डावेही त्यांच्याजवळ आले. एवढेच काय; पण कधीकाळी भाजप आणि डाव्या पक्षांनीही १९८९-९० मध्ये व्ही. पी. सिंह यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी हातमिळवणी केली होती, पुढे काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ सरकारचा २००८ आणि २०१२ मध्ये दोनदा पराभव करण्यासाठी भाजप आणि डावे एकत्र आले होते. यातील पहिला प्रसंग हा अमेरिकेसोबतच्या अणुकराराचा, तर दुसरा मल्टिब्रॅंड रिटेलमधील परकी गुंतवणुकीचा होता. डावे आणि भाजप एकत्र येऊ शकतात तर काँग्रेसच आता का गोंधळात पडतो आहे? कधीकाळी काँग्रेसने देशाचे राजकारण एकध्रुवीय केले होते, तेच भाजपकडून होते आहे. अशा स्थितीमध्ये जे पूर्वी भाजपने केले तेच काँग्रेस का करत नाही? या युक्तिवादावर आणखी हजारो शब्द लिहिता येतील; पण त्यामध्येही मोठी जोखीम आहे. अर्थात हा सगळा गोंधळ फक्त शरद पवारच निस्तारू शकतात, त्यांच्याशिवाय हे प्रकरण मार्गी लागणार नाही.  राज्यामध्ये एवढी अस्थिर परिस्थिती असेल तर काँग्रेसनेही कोणताही स्ट्रॉ घेऊन तो भगव्या रंगात बुडवावा. त्यात काही फारसे वावगे नाही.
(अनुवाद - गोपाळ कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com