तिवरे धरण फुटीचा धडा

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 10 जुलै 2019

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे आहे. जेणेकरून ‘तिवरे’ दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे आहे. जेणेकरून ‘तिवरे’ दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

चिपळूणपासून ४० किलोमीटरवरील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तिवरे गाव धरणफुटीमुळे चर्चेत आले आहे. खरे तर हे धरण नव्हे, तर पाझर तलाव होता; पण दुर्घटनेची तीव्रता इतकी होती, की त्यात एक अख्खी वाडी उद्‌ध्वस्त झाली. या दुर्घटनेने कोकणातील जलसंधारण कामांबाबत मोठा धडा दिला आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी पातळी राखली जावी, या हेतूने तिवरेत १९९६ मध्ये या धरणाचे काम सुरू झाले. चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचे बंधू संतोष चव्हाण यांच्या ‘खेमराज कन्स्ट्रक्‍शन’ने या मातीच्या प्रकल्पाचे काम २००० मध्ये पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या १९ वर्षांत ही दुर्घटना घडली. यामुळे कोकणातील धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. 

बहुसंख्य प्रकल्पांची दुरुस्तीच नाही
रत्नागिरी जिल्ह्यात छोटी- मोठी ६८ आणि सिंधुदुर्गात २७ अशी एकूण ९५ धरणे आहेत. या शिवाय बऱ्याच प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तिलारी, देवघर, अरुणा, कोर्ले-सातोंडी, नातूवाडी, गडनदी, अर्जुना असे काही अपवाद वगळता बहुसंख्य धरणे लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील आहेत. यातील बरेच प्रकल्प ३० ते ३५ वर्षे जुने आहेत. बहुसंख्य प्रकल्पांची दीर्घकाळ दुरुस्ती झालेली नाही. अनेक धरणे गाळाने निम्मीअधिक भरली आहेत. यामुळे त्यांच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. काही प्रकल्प तर पुरेसे पाणी साठत नसल्याने निरूपयोगी ठरले आहेत. धरणेच नव्हे, तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले बंधारे, तलाव हेही काही काळाने गाळ, निकृष्ट काम, चुकीची जागा आदी कारणांमुळे निरूपयोगी बनतात. दुसरीकडे कोकणात पाणीपातळी खालावत आहे. यामुळे जलसंधारण प्रकल्पांची गरज वाढत आहे. यातच आता धरणांबाबत अनामिक भीतीचे मोहोळ तयार झाले आहे. यातून एक विचित्र कोंडी झाली असून ‘तिवरे’च्या घटनेनंतर ती अधिक जटिल झाली आहे.

ही कोंडी फोडण्यासाठीची बरीचशी उत्तरे येथील वैशिष्ट्यपूर्ण भूरूप रचनेत आहेत. महाराष्ट्रात जलसंधारण कामांचे स्वरूप सर्वत्र सारखेच आहे. यामुळे कोकणात उर्वरित महाराष्ट्राच्या रचनेचा प्राधान्याने विचार करून धरणे, बंधारे उभारले जातात. याचाच भाग म्हणून येथे सर्रास मातीची धरणे, कोल्हापूर टाईप बंधारे यावर कोट्यवधीचा खर्च झाला आहे. प्रत्यक्षात कोकणातील भौगोलिक रचना, नद्या, त्यांचा वेग, लांबी यात इतर भागाच्या तुलनेत मोठा फरक आहे. इतर भागात संथ वाहणाऱ्या मोठ्या, लांबलचक नद्यांची संख्या जास्त आहे. फारसे तीव्र उतार नाहीत. जमिनीची जलधारण क्षमता वेगळी आहे. 

तीव्र उतारामुळे नद्यांचा वेग जास्त
कोकणाची निर्मितीच मुळात वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्वालामुखीपासून बसलेल्या कोकण किनारपट्टीवर कठीण अशा बेसॉल्ट खडकाचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी कोकणाची निर्मिती सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंगापासून झाली असल्याने काही भागात भूगर्भ कमकुवत आहे. सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंतची लांबी अवघी ८०-९० किलोमीटरची आहे. इथल्या नद्याही उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. बहुसंख्य नद्या पश्‍चिमवाहिनी असून, त्या सह्याद्रीमध्ये उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. उगमापासून मुखापर्यंतचा नदीचा प्रवाह एकंदर तीन टप्प्यांत विभागला जातो. नद्याच्या उगमापासून पर्वत पायथ्यापर्यंत नदीचा वरचा टप्पा म्हणजे युवावस्था, पायथ्यानंतरची मंद उताराची प्रौढावस्था व सपाट, मंद उताराच्या प्रदेशातील नदीचा प्रवास म्हणजे वृद्धावस्था. कोकणात तीव्र उतारामुळे नद्यांची युवावस्था अधिक असते. तीव्र वेगातील नद्यांमुळे खनन किंवा अपक्षरण कार्य जास्त होते.

सर्वेक्षणाचा केवळ सोपस्कार 
कोकणात धरण बांधताना सर्रास दोन डोंगरांमधील चिंचोळ्या दरीचा भाग निवडला जातो. साहजिकच तेथे नदी युवा अवस्थेमुळे वेगवान असते. अशा ठिकाणी जलसंधारण प्रकल्प राबवायचा झाल्यास पाया मजबूत असणे आवश्‍यक असते. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भूगर्भातल्या खडकांचा प्रकार, पायाकरिता योग्य खडकापर्यंत पोचण्यासाठी वरच्या थरांची खोली, खडकांची घनता, त्याची पारगम्यता, त्यातील पाण्याचे प्रमाण, वजन पेलण्याची क्षमता किंवा ताकद असे खडकांचे अभियांत्रिकी गुणधर्म माहीत करून घेऊन जागा निश्‍चित करणे आवश्‍यक असते; मात्र सर्रास आधी धरणाची जागा निश्‍चित केली जाते, पुनर्वसन, भूसंपादन यांचा विचार होतो आणि मग भूरूप व इतर सर्वेक्षणाचा केवळ सोपस्कार पार पाडला जातो.

कमी खर्च असल्याने मातीच्या धरणाला व इतर जलसंधारण प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. मातीचे धरण बांधतानाही मधल्या भागात चिकट मजबूत राहणाऱ्या काळ्या मातीचा वापर अपेक्षित असतो; मात्र कोकणात काळी माती कमी मिळत असल्याने बऱ्याचदा उपलब्ध लाल माती वापरली जाते. जलसाठा क्षेत्रात साचणाऱ्या गाळाचा, धरण देखभालीचा फारसा विचार होत नाही.

अशा प्रकल्पांसाठी भूकंप हाही अडचणीचा असतो. धरण किंवा जलसाठवणीच्या प्रकल्पांत पायावर प्रचंड ताण असतो. छोट्या भूकंपाचाही या पायावर परिणाम होतो. कोकणात भूकंपाचा फार परिणाम होत नाही, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र भूकंपाचा अशा प्रकल्पांच्या बांधकामावर परिणाम होतो, हे धरण क्षेत्रातील भूकंपाचे आकडेच सांगतात. कोयनेच्या क्षेत्रात १९६७ ते २०१७ या काळात भूकंपाचे छोटे-मोठे एक लाख २० हजार ३१५ धक्के बसले. यावरून अशा प्रकल्पाच्या बांधकामात या घटकाचा किती विचार करायला हवा याची कल्पना येते. प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार होतो काय हा प्रश्‍नच आहे.

एकूणच कोकणासाठी जलसंधारण प्रकल्पांची गरज आहेच; मात्र ते उभारताना येथील भौगोलिक स्थितीचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. ज्या जागेत जोड आणि प्रस्तरभंग आहेत, त्यांची आजची स्थिती, पुन्हा भूकंप होण्याची शक्‍यता आणि त्यांची क्षमता अभ्यासणे गरजेचे असते. गाळ साचण्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांचा ठराविक काळानंतर उपसा करण्याची व्यवस्था मूळ प्रकल्पात असणे गरजेचे आहे. पक्के बंधारे बांधण्यासाठीही कोकणाकरिता स्वतंत्र तंत्रज्ञान, धोरण निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे. थोडक्‍यात, कोकणासाठी स्वतंत्र जलसंधारण धोरण आखण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Shivprasad Desai on Tiware Dam