esakal | अग्रलेख  : जमलंय की जमवलंय?
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-bjp

युतीतील जागावाटपात भाजपचा वरचष्मा स्पष्ट झाला आहे. त्याचवेळी शिवसेनेने मात्र नमते घेऊन लढाईआधीच तलवार म्यान करून आपण यापुढे सत्तेविना राहू शकत नाही, हेच दाखवून दिले आहे.

अग्रलेख  : जमलंय की जमवलंय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत सहभागी असूनही गेली पाच वर्षे विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून ‘आमचं ठरलंय!’ या एकाच वाक्‍याचा धोशा लावला होता. प्रत्यक्षात बरीच ‘भवति न भवति’ झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी अखेर युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या तहनाम्याचा जो मसुदा समोर आला आहे; तो बघता त्यावरील भाजपचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. शिवाय, त्याचवेळी शिवसेना नेतृत्वाने करून घेतलेली स्वतःची फरपटही जगजाहीर झाली आहे. खरे तर ‘यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावरच लढवेल. युतीत आमची २५ वर्षे सडली!’ अशी घोषणा उद्धव यांनी शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच केली होती. त्यानंतर अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडली आणि पुन्हा  शिवसेनेने भाजपच्या गळ्यात गळा घालून नांदायला सुरवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे ‘आमचा ५०-५० टक्‍क्‍यांचा फॉर्म्युला ठरला आहे!’ असे सांगत होते. मात्र, आताचे चित्र बघता भाजपने आपल्या अटींवर शिवसेनेला शरणागती पत्करायला भाग पाडल्याचे दिसते. शिवसेनेला सत्तेत सोडाच; उमेदवारीतही ५० टक्‍के जागा मिळालेल्या नाहीत आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद तर राहू देत ‘उपमुख्यमंत्रिपद देण्याचाही निर्णय झालेला नाही!’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगून टाकले आहे. त्यापलीकडे या निवडणुकीचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या रूपाने प्रथमच ठाकरे घराणे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. किंबहुना, त्यामुळेच उद्धव यांना भाजपने पुढे केलेल्या तहनाम्यावर स्वाक्षरी करणे भाग पडले असावे.

युतीतील जागावाटपाचा घोळ संपल्यावर आणि वाट्याला आलेले मतदारसंघ बघितल्यावर शिवसैनिकांच्या मनात एकच प्रश्‍न उभा आहे आणि तो म्हणजे ‘जमलंय की कसंबसं जमवलंय?’ पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबई या प्रमुख शहरांत गेल्या विधानसभेत शिवसेना विरोधात असतानाही भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. या वेळी त्यापैकी किमान काही जागा आपल्याला मिळाव्यात, असा शिवसेनेचा हट्ट होता. मात्र, त्याबाबतही भाजपने शिवसेनेच्या तोंडाला पानेच पुसली. आता या प्रमुख शहरांत शिवसेनेचा एकही उमेदवार रिंगणात नसेल. १९८५ मध्ये मुंबई महापालिकेवर कब्जा केल्यानंतर ‘आता घोडदौड महाराष्ट्रात!’ अशी घोषणा देत त्यानंतर लढवलेल्या सर्व विधानसभा निवडणुकांत असे कधीही झाले नव्हते. मुंबई या शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावरही भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा स्वत:कडे राखत मोठाच हल्ला चढवला आहे. मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या तोडीस तोड कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे आता पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा हा गड काबीज करण्याचे भाजपचे ‘अर्थपूर्ण’ मनसुबेही स्पष्ट झाले आहेत. हा घाव शिवसेनेच्या मर्मी लागणारा असेल. भाजपने आता जाहीर केलेली आपल्या उमेदवारांची पहिली यादी बघता, आता प्रदेश भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे स्पष्ट दिसते. विद्यमान मंत्री विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे पहिल्या यादीत नसणे, हा मोठाच धक्‍का आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यादीत नाव नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल करणे, हा नेतृत्वासाठी धक्‍का असू शकतो. भाजप आणि शिवसेनेचे जे उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांचा समावेश लक्षणीय आहे. त्यामुळे ज्यांची संधी डावलली गेली, त्या निष्ठावंतांची नाराजी ओढवणार, हे उघड आहे. पण, अलीकडे एकूणच भाजपने ‘राजकीय व्यवस्थापना’वर दिलेला भर लक्षात घेता हा असंतोषही हाताळण्याचे तंत्रही ते वापरतील.

आदित्य यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेने एका नव्या पर्वात पाऊल टाकले आहे. स्वत: सत्तेच्या बाहेर राहून बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हातात ‘रिमोट कंट्रोल’ ठेवण्याचे धोरण यापुढे चालविता येणार नाहीच; शिवाय बाळासाहेबांच्या हातातील ‘रिमोट’मध्ये जी काही ‘पॉवर’ होती, ती आपल्या हातात नाही, हेही आता ठाकरे कुटुंबीयांच्या लक्षात आलेले दिसते. आदित्य थेट रिंगणात असल्यामुळे आता शिवसेनेला भाजपच्या अन्य काही गोष्टीही सहन कराव्या लागतील. त्यामुळे युतीतील या दोन्ही पक्षांमध्ये बंडाची निशाणे फडकली असली, तरी शिवसेनेच्या बंडोबांना थंडोबा करण्याचे काम उद्धव यांना भाजप करायला लावेल, यात शंका नाही. एकंदरीत, चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच स्पष्ट होणार असले, तरीही आताचे चित्र हे फडणवीस व चंद्रकांतदादा यांनी जागावाटपाच्या वाटाघाटीत बाजी मारली आहे, असेच आहे. शिवसेनेने मात्र सत्तेविना राहू शकत नाही, हे लोकसभेप्रमाणे या वेळीही दाखवून दिले आहे. उद्धव यांनी हिंदुत्व, तसेच अयोध्येतील राम मंदिर यासाठीच आपण युती केल्याचे प्रचारात कितीही ओरडून सांगितले, तरी युतीमागे प्रामुख्याने कोणती गणिते आहेत, हे लपून राहणारे नाही.

loading image